News Flash

कुतूहल – परभणीचे ‘मराठवाडा कृषि विद्यापीठ’

मराठवाडय़ातील कृषी क्षेत्राच्या विशेष गरजा लक्षात घेऊन १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठ कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार या तीन

| May 28, 2013 05:18 am

कुतूहल –    परभणीचे ‘मराठवाडा कृषि विद्यापीठ’

मराठवाडय़ातील कृषी क्षेत्राच्या विशेष गरजा लक्षात घेऊन १८ मे १९७२ रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठ कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार या तीन क्षेत्रांत कार्य करते. विद्यापीठांतर्गत अनेक महाविद्यालये तसेच कृषीतंत्र विद्यालये आहेत. विद्यापीठामध्ये कृषी, उद्यानविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी अभियांत्रिकी, गृहविज्ञान, अन्न तंत्रज्ञान असे अनेक अभ्यासक्रम राबविण्यात येतात. येथील शिक्षणविषयक विविध सुविधेमुळे पदव्युत्तर व आचार्य पदवीसाठी परराष्ट्रातील विद्यार्थीही येथे शिक्षणासाठी धाव घेतात. विद्यार्थ्यांची कार्यकुशलता वाढावी, कार्यकुशल मनुष्यबळ निर्माण व्हावे म्हणून राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन संस्था, हैद्राबाद या संस्थेशी विद्यापीठाने द्विपदवी कार्यक्रमासंबंधी सामंजस्य करार केला आहे. याप्रकारचा द्विपदवी सामंजस्य करार करणारे राज्यातील हे पहिलेच कृषी विद्यापीठ आहे.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने विद्यापीठाच्या सूर्यफूल व करडई या पिकांसंबंधित संशोधन प्रकल्पांना राष्ट्रीय स्तरावर मानांकन दिले आहे. विद्यापीठाने संशोधनाच्या आधारे आजपर्यंत विविध पिकांचे १२५ वाण, २० कृषी अवजारे विकसित केली असून ७१५ तंत्रज्ञान शिफारसी शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्या आहेत. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत अधिक जलद गतीने व परिणामकारकरीत्या पोहोचण्याचे कार्य विस्तार शिक्षण गट, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, विभागीय कृषी विस्तार केंद्र तसेच घटक व अशासकीय कृषी विज्ञान केंद्र करतात. विद्यापीठ दरवर्षी विद्यापीठ वर्धापन दिनी खरीप पीक मेळावा व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी रब्बी पीक मेळावा घेते. शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामाबाबत मार्गदर्शन करते व विद्यापीठ निर्मित बियाणाचे वाटप करते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ३ जानेवारी रोजी विद्यापीठात महिला शेतकरी मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो. विद्यापीठाद्वारे दरवर्षी कृषी दैनंदिनी, कृषी दिनदíशका, विविध विषयांवरील पुस्तिका, घडीपत्रिका, शेती-भाती हे मासिक, यांचे प्रकाशन करण्यात येते. विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जलदगतीने व प्रभावीपणे पोहोचण्यासाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये नवचतन्य निर्माण करण्यासाठी ‘विद्यापीठ आपल्या दारी तंत्रज्ञान शेतावरी’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम विद्यापीठामार्फत राबवला जातो.

जे देखे रवी.. – गीता
गीता तशी मितभाषी. एवढे सारे भारतीय वैदिक संचित अशा तऱ्हेने मांडण्याचे श्रेय सौती नावाच्या माणसाचे. हा सन २००च्या आसपासचा, याने दर अध्यायानंतर हा मजकूर उपनिषद आहे असे नोंदून ठेवले. उपनिषदे उत्स्फूर्त आणि त्यातल्या अनेक लेखकांची नावे माहीतही नाहीत. परंतु गीता नावाचे उपनिषद श्रीकृष्णार्जुन संवादच आहे हे मात्र त्याने अधोरेखित करून ठेवले. उपनिषद या शब्दाचा गोळाबेरीज अर्थ ‘इथे ये जवळ बसून बोलू’ असा आहे. तेव्हा संवादाचे स्वरूप ठेवायचे म्हणून अर्जुन हा एक होतकरू आणि सुयोग्य विद्यार्थी आणि त्याला शिकवणारा एक अनुभवी, हरहुन्नरी, तत्त्वज्ञानी म्हणजे श्रीकृष्ण असे दृश्य उभे केले गेले. दुसऱ्या अध्यायात तू मला तत्त्वज्ञान शिकवू नकोस असे खडे बोल श्रीकृष्ण अर्जुनाला सुनावतो आणि एकदम सखोल ज्ञान अर्जुनाला सांगायला लागतो तेव्हा मग अर्जुन भांबावल्यावर ‘माझे चुकले मी घाई केली’ अशी कबुली दिल्यावर कर्म, काम, कर्तव्य या शिवाय कोणालाच तरणोपाय नाही अशी ब्रीद वाक्ये श्रीकृष्ण सांगतो. ‘कर्म ही आपोआप उत्पन्न झालेली गोष्ट आहे तेव्हा मीच जर अकर्ता आहे तर तुझे कसले काय? या आपोआप गोष्टीत सगळ्यांना सहभागी होणे अपरिहार्य ठरते. त्यात श्रीकृष्ण म्हणजे मीही आलो’ असे तो स्वत: कबूल करतो. ‘मनावर ताबा ठेवून चलबिचल न होता काम करणे म्हणजे कर्मकौशल्य, तोच योगी असतो. संन्याशी वगैरे खास- स्पेशल- काही नसते आणि योगी तोच संन्याशी’ असे बोधवाक्य सांगितले जाते. सहाव्यात मनावर विस्तृत व्याख्यान येते पण तिथेही अतिरेक टाळा मर्यादेत राहा असाच निरोप मिळतो. ध्यानधारणेबद्दल उल्लेख आहेत पण ते संसारी सामान्यांना परवडणारे नाहीत असा अप्रत्यक्ष सल्ला पाश्र्वसंगीतासारखा वाजत राहतो. सातव्यात शेवटी ज्ञान मिळवायचे असेल तर विज्ञान म्हणजे प्रपंचाचे ज्ञानच समजावून घ्यावे लागते असा खणखणीत इशारा दिलेला आहे. पक्षी उडून भुर्रकन फांदीवर बसतो तसे सामान्य माणसाला शक्य नसते. त्याला हळूहळू एकेक पाऊल टाकतच चढावे लागते अशी याबद्दल ज्ञानेश्वरांची ओवी आहे. त्याबद्दल अठराव्यात थोडासा दुर्लक्षित असा क्रममार्ग सांगितला आहे. आपल्या छोटय़ाशा विश्वाबद्दल माणूस सजग असेल तर कर्म करता करता हळूहळू खऱ्या अर्थाने जागा होतो त्याबद्दल ज्ञानेश्वर म्हणतात-
रात्रीचे प्रहर संपता। जसा उगवतो सूर्य। किंवा फळांचा घड लगडता। केळीची वाढ होते बंद।। हीच कर्म सातत्याची अवस्था. मग गुरू आपणहूनच भेट देतात म्हणजे विवेक भेटतो. शंकराचार्य म्हणजे भारताचे जगतगुरू. मराठी माणसांचे जगतगुरू ज्ञानेश्वर (ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी). त्यांच्या पहिल्याच भन्नाट ओवीबद्दल पुढच्या काही लेखांत.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस  – मनोविकार : भाग -३ / आत्मविश्वास नसणे
लक्षणे – नेहमीचे मर्यादित काम जेमतेम करणे. अधिक काम पडल्यास गडबडून जाणे. संकटकाळात किंवा थोडेसे नुकसान होताच अवसान गळणे. कामात आपणहून पुढाकार न घेणे.
कारणे – रस व रक्त धातूवर काही कारणाने आघात होणे, दुबळेपणा येणे, कामाचा एकदम भार वाढणे, वातावरण सदैव निरुत्साही असणे. व्यायामाची सवय नसणे. छातीचा घेर लहान असणे. घात, अपघात याने आकस्मिक खचून जाणे, संतती नसणे.
शरीर व परीक्षण – डोक्याच्या मागच्या भागाची वाढ पुरेशी आहे का? याचे परीक्षण शरीराच्या एकूण उंची-आकारमानावरून करावे.
उपचारांची दिशा – या विकारात आश्वासन म्हणजे ‘तू सुधारशील, लवकरच गुण येईल’ असे सांगणे नितांत आवश्यक असते. व्यायाम, खेळ, योग, प्राणायाम, सूर्यनमस्कार, मोकळी हवा यांचा अभाव जिथे असेल, तेथे त्याची योजना अगोदरच करावी.
अनुभविक उपचार – सुवर्णमाक्षिकादि वटी व ब्राह्मीवटी प्र. ३ गोळ्या २ वेळा व कुष्मांडपाक ३ चमचे २ वेळा घ्यावा. जेवणानंतर द्राक्षासव वा द्राक्षरिष्ट घ्यावे. झोपेची तक्रार असल्यास निद्राकर वटी ६ गोळ्या रात्री दुधाबरोबर घ्याव्यात. आंघोळीच्या अगोदर सकाळी झोपताना सर्वागाला शतावरी सिद्धतेल किंवा महानारायण तेलाने मसाज करावा. नियमितपणे सूर्यनमस्कार, वज्रासन, दीर्घश्वसन व प्राणायाम यांचा अभ्यास करावा. मैदानी खेळ खेळावेत. सर्व शरीरास सशास्त्र अभ्यंग करवून मग निरूहबस्ति घ्यावा. वायूची शुद्धी झाल्यावर वातातपिक म्हणजे नेहमीचे व्यवहार सांभाळून करता येण्यासारखे रसायन प्रयोग करावेत. आपल्या मनाला उभारी आणणे आपल्याच हातात असते. याकरिता मनोनिग्रह, प्राणायाम, सूर्यनमस्कार व गायत्रीमंत्र, श्रीरामरक्षास्रोत्र, पिंपळ प्रदक्षिणा यांचा नेमाने अवलंब करावा. शरीराने दणकट पण मनाने नेभळट अशा माणसांनी आपल्या घरात; ‘दोरीने टांगलेल्या उशिला पाच पंचवीस बॉक्सिंगसारखे ठोके नियमीतपणे मारावे’, मारताना जय बजरंग असे म्हणावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – २८ मे
१८८३ > ‘हिंदुपदपातशाही’, ‘सहा सोनेरी पाने’, ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’, ‘जोसेफ मॅझिनीचे चरित्र’, असे प्रेरक इतिहासकथन, ‘गांधीगोंधळ’, ‘मोपल्यांचे बंड अथवा मला काय त्याचे’ यांतून प्रचलित राजकारणावरील टीका, जात्युच्छेदक निबंध, भाषा-शुद्धी लेख व विज्ञाननिष्ठ निबंध , हिंदुराष्ट्रदर्शन अशी सैद्धान्तिक पुस्तके; माझी जन्मठेप, लंडनची बातमीपत्रे आदी प्रेरणादायी, संघर्षशील व अनुभवाधारित लेखन; कमला , गोमांतक ही खंडकाव्ये, अनेक स्फुट कविता आणि ‘संन्यस्त खड्ग’, ‘उ:शाप’, ‘उत्तरक्रिया’ ही संगीत नाटके अशा उत्तुंग ग्रंथसंपदेचे कर्ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म.
१९३८ > प्रज्ञावंत कादंबरीकार, समीक्षक व कवी भालचंद्र नेमाडे यांचा जन्म. ‘कोसला’ ही मराठी साहित्यविश्व ढवळून काढणारी त्यांची कादंबरी (१९६३). ‘देखणी’ आणि ‘मेलडी’ या काव्यसंग्रहांतील त्यांच्या कविता जगण्यातील अमानुषपणावरही भाष्य करतात. ‘साहित्याची भाषा’ व ‘टीकास्वयंवर’ हे त्यांचे टीकाग्रंथ, तर ‘बिढार’, ‘जरीला’, ‘झूल’ (पुढे झूल / हूल) या कादंबऱ्या सांस्कृतिक-सामाजिक भाष्य वाचकांपर्यंत पोहोचवतात. ‘हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीचा पुढला भाग ते लिहीत आहेत.
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2013 5:18 am

Web Title: marathwada agricultural university parbhani maharashtra
टॅग : Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल – ऊर्जादायी शेतीशास्त्रज्ञ : डॉ. आ. दि. कर्वे
2 कुतूहल : शेतकऱ्याला मार्गदर्शन हवेच
3 कुतूहल : मूरघास-पशुसंवर्धनासाठी एक उत्तम खाद्य
Just Now!
X