News Flash

कुतूहल : प्रज्ञावंत मरियम मिर्झाखानी

‘आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड’मध्ये मिर्झाखानी यांनी इराणला १९९४ व १९९५ साली सुवर्णपदके मिळवून दिली.

नोबेल पारितोषिकाच्या तोडीचे गणितातील फील्ड्स पदक मिळविणारी पहिली स्त्री आणि इराणी व्यक्ती मरियम मिर्झाखानी यांचा जन्म तेहरानमध्ये १२ मे १९७७ रोजी झाला. शालेय जीवनातच त्यांचे गणितावरील प्रभुत्व सिद्ध झाले. ‘आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड’मध्ये मिर्झाखानी यांनी इराणला १९९४ व १९९५ साली सुवर्णपदके मिळवून दिली. त्यानंतर तेहरानमधील ‘शरीफ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’मधून १९९९ मध्ये पदवी मिळवून उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या. २००४  साली हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी ‘सिम्पल जिओडेसिक्स ऑन हायपरबोलिक सर्फेसेस अँड व्हॉल्यूम ऑफ द मोडय़ुलाय स्पेस ऑफ कव्‍‌र्हज्’ या प्रबंधावर पीएच. डी. पदवी मिळवली.

या प्रबंधात अपास्तिक पृष्ठांशी (हायपरबोलिक सर्फेसेस) संबंधित अनेक गहन समस्या सोडविलेल्या होत्या. यासंदर्भात त्यांनी निर्माण केलेल्या सूत्रातून अपास्तिक पृष्ठावरील अल्पतम वक्राची लांबी जशी वाढते, तशी त्यांची संख्याही वाढते, हे सिद्ध झाले. प्रबंधातील आणखी वेधक गोष्ट म्हणजे ‘एडवर्ड विटेन अटकळी’ला दिलेली नवी सिद्धता! गणितातील या दोन महत्त्वाच्या संकल्पनांमध्ये त्यांनी दाखवलेला संबंध अनेक विषयांवर प्रभाव टाकणारा ठरला. नामवंत गणितींच्या मते, या दोन्ही समस्या एकाच दमात सोडवणे हे केवळ अद्भुतच होते. या प्रबंधातून प्रेरित असलेले त्यांचे अनेक शोधनिबंध प्रथितयश नियतकालिकांतून प्रकाशित झाले. त्यामुळे ‘क्ले मॅथेमॅटिक्स इन्स्टिटय़ूट’च्या संशोधन छात्रवृत्तीसह मिर्झाखानी यांना प्रिन्स्टन विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापकपद मिळाले. अपास्तिक भूमिती, संस्थिती (टोपोलॉजी) आणि गतिशास्त्र या विषयांवरील त्यांची हुकमत पाहून स्टॅनफोर्ड विद्यापीठाने २००८ मध्ये त्यांना पूर्ण प्राध्यापकपद दिले.

२००६ मध्ये त्यांनी नतिलंब-सरक भूकंपासारख्या (स्ट्राइक-स्लिप अर्थक्वेक) कार्यतंत्राने जर अपास्तिक पृष्ठाची भूमिती विरूपित (डीफॉर्मड्) केली तर त्याचे काय होईल, ही श्रेष्ठ गणितींनाही अशक्य वाटणारी समस्या केवळ एका ओळीच्या सिद्धतेने सोडवली. बिलियर्ड चेंडूचा बहुभुज मेजावरील गतिमार्ग (ट्रॅजेक्टरी) गणिताने निश्चित करण्याच्या समस्यांवरही मिर्झाखानी यांनी सहगणितींसोबत उत्तरे मिळवली.

मिर्झाखानींना अनेक मानसन्मान मिळाले. २०१४ मध्ये त्यांना ‘गतिशास्त्र, रीमान पृष्ठीय भूमिती, रीमानपृष्ठांचे विमानक अवकाश (मोडय़ुली स्पेस)’ यातील असामान्य कर्तृत्वासाठी ‘फील्ड्स पदक’ मिळाले. ‘जर्नल ऑफ अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटी’च्या त्या संपादक होत्या.

जेमतेम ४० वर्षे आयुष्य लाभलेल्या, पण गणितात नवे युग निर्माण करणाऱ्या मिर्झाखानी १४ जुलै २०१७ रोजी कर्करोगाने निवर्तल्या. अमेरिकन मॅथेमेटिकल सोसायटीने त्यांच्या स्मरणार्थ व्याख्यानाची आणि ‘द नेक्स्टजनरेशन’ निधीची स्थापना केली आहे. २०१९ पासून १२ मे हा त्यांचा जन्मदिवस ‘गणिती महिलांचा दिवस’ म्हणून साजरा होतो.

– डॉ. विद्या ना. वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 1:09 am

Web Title: maryam mirzakhani gold medal winner at the international mathematical olympiad zws 70
Next Stories
1 नवदेशांचा उदयास्त : सुरीनाम
2 कुतूहल : संख्याशास्त्रज्ञ परिचारिका
3 नवदेशांचा उदयास्त : खनिजसमृद्ध, पण गरीब कॉँगो
Just Now!
X