News Flash

कुतूहल : गणिती अर्थशास्त्रज्ञ जॉन नॅश

मेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामधील ब्ल्यू फील्ड येथे १३ जून १९२८ रोजी नॅश जन्मले

कुतूहल : गणिती अर्थशास्त्रज्ञ जॉन नॅश

जॉन नॅश म्हटले की, स्मरण होते त्यांच्या गणिती-अर्थशास्त्रातील उत्तुंग कर्तृत्वाला मिळालेल्या नोबेल पारितोषिकाचे, तसेच त्यांचे जीवनचरित्र ‘अ ब्यूटिफुल माइण्ड’ व त्यावरील २००१ सालच्या ऑस्कर विजेत्या सिनेमाचे! अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनियामधील ब्ल्यू फील्ड येथे १३ जून १९२८ रोजी नॅश जन्मले. गणितातील विलक्षण प्रतिभेमुळे १९४८ साली कार्नेगी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीने त्यांना ‘बी.एस.’बरोबरच ‘एम.एस.’ पदवीही दिली. पुढील केवळ दोन वर्षांत त्यांनी द्यूत सिद्धान्त (गेम थिअरी) अर्थशास्त्राच्या अंगाने अभ्यासला. १९५० मध्ये प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीला सादर केलेल्या २७ पानी ‘नॉन-कोऑपरेटिव्ह गेम्स’ या गणिती-अर्थशास्त्रीय प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. पदवी मिळाली. १९५१ मध्ये नॅश मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) गणित विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यांनी अंशत: विकलक (पॅराबोलिक पार्शिअल डिफरेन्शिअल) समीकरणे आणि विकलक भूमितीतील (डिफरेन्शिअल जॉमेट्री) दीर्घकाल न सुटलेल्या समस्या सोडवल्या. तसेच संकेतन सिद्धान्तात (कोडिंग थिअरी) काळाच्या पुढे असे कार्य केले. मात्र, गंभीर स्किझोफ्रेनियामुळे १९५९ साली त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. १९९० मध्ये ते स्किझोफ्रेनियातून पूर्ण बरे झाले होते.

नॅश यांनी आपल्या प्रबंधात सहकारी आणि असहकारी खेळांतील प्रतिस्पर्धी जिंकण्यासाठी आपले डावपेच कसे वापरू शकतात, त्यासंबंधीचा गणिती सिद्धान्त मांडला होता. सहकारी खेळात सहभागींतील अलिखित करारानुसार खेळ होत असल्यामुळे, सर्वानाच लाभ होऊ शकतो. असहकारी खेळांत (उदा. बुद्धिबळ, लिलाव) सहभागींमध्ये कोणताही करार नसल्याने, एकाचा सर्वनाशही उद्भवतो. सहभागींचे हित ध्यानात घेऊन संभाव्यतेच्या गणिताने तोडगा निघू शकतो, हे नॅश यांनी दाखवले. नॅश यांची ‘नॅश समतोल (नॅश इक्विलिब्रियम)’ ही संकल्पना, सहभागींकडून स्पर्धात्मक परिस्थितीत घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबद्दल एक उपयुक्त निरीक्षण सांगते. त्यानुसार, एखाद्या परिस्थितीत सहभागींना जरी अनेक पर्याय उपलब्ध असले, तरी सर्वाच्या इष्टतम फायद्याच्या निर्णयापासून फारकत घेऊन कोणी स्वत:च्या लाभासाठी स्वतंत्रपणे घेतलेला निर्णय त्याच्यासाठी घातक ठरू शकतो. या संकल्पनेवरील नॅश यांचा अवघ्या ३१७ शब्दांचा शोधनिबंध एका प्रतिष्ठित शोधपत्रिकेमध्ये १९५० साली प्रकाशित झाला. नंतरच्या काळात अर्थशास्त्रच नव्हे तर संगणक, कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), जैव-उत्क्रांती, भ्रष्टाचार, युद्ध आदी वैविध्यपूर्ण क्षेत्रांत ‘नॅश समतोल’ उपयुक्त ठरला. यासाठी १९७८ मध्ये त्यांना ‘जॉन फॉन न्यूमन थिअरी प्राइझ’ मिळाले.

नॅश यांच्या द्यूत सिद्धान्तातील महत्त्वपूर्ण योगदानाची उपयुक्तता जगातील अर्थशास्त्रज्ञांच्या प्रकर्षांने लक्षात आल्यावर, १९९४ मध्ये इतर दोन अर्थशास्त्रज्ञांसह नॅश यांना ‘अर्थशास्त्राचे नोबेल’ पारितोषिक दिले गेले. भूमिती आणि अरेषीय अंशत: विकलक समीकरणांवरील कामासाठी २०१५ साली त्यांना गणितातला अतिशय मानाचा ‘आबेल पुरस्कार’ मिळाला. २३ मे २०१५ रोजी तो पुरस्कार घेऊन घरी परतताना त्यांचे अपघाती निधन झाले.

– डॉ. विद्या ना. वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2021 12:21 am

Web Title: mathematical economist john nash zws 70
Next Stories
1 नवदेशांचा उदयास्त : मालदीव बेटांवर परकीय-प्रवेश
2 कुतूहल – जॉन फॉन नॉयमन
3 नवदेशांचा उदयास्त – मालदीवज्
Just Now!
X