गणिताचा सखोल वापर इतिहासात करणे शक्य आहे का? गरजेचे आहे का? – हे प्रश्न स्वाभाविक आहेत. त्यांचे ‘होय’ असे उत्तर लिओ टॉलस्टॉय (सन १८२८-१९१०) यांनी नेपोलियनच्या रशियास्वारीवर आधारित ‘वॉर अ‍ॅण्ड पीस’ या सुप्रसिद्ध कादंबरीत गणित-भौतिकीतील अनेक संज्ञा वापरून दिले आहे. एक व्यक्ती इतिहास घडवत नसून तो असंख्य सामान्य व्यक्तींच्या क्रिया-प्रतिक्रियांतून घडत जातो, आणि त्या सर्वांना एकत्र करण्यासाठी संकलन गणनशास्त्राचा (इंटिग्रल कॅलक्युलस) आधार घेऊन इतिहास मांडला गेला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.

या संदर्भात अलीकडेच उदयास आलेल्या ‘क्लिओडायनॅमिक्स’ या ज्ञानशाखेची दखल घेतली पाहिजे. यातील ‘क्लिओ’ ही संज्ञा इतिहास आणि डायनॅमिक्स ही गतिमानता दर्शवते. गणिती रीतींचा वापर प्रदीर्घ कालखंडाच्या ऐतिहासिक माहितीसाठ्यावर (डेटाबेस) करून इतिहासाला विश्लेषणात्मक अनुमानशास्त्र अशी ओळख देणे हे तिचे उद्दिष्ट आहे; शांतता राखण्यासाठीही त्यामुळे मार्गदर्शन मिळू शकते. जसे ‘लोटका-व्होल्टेरा’ समीकरणांनी परिसंस्थेतील (इकोलॉजिकल व्यवस्था) वन्य पशु-पक्षी समूहांच्या गतिकीचे विश्लेषण केले जाते, त्याचप्रमाणे मानवी समूहांचे विस्तारीकरण, स्थलांतर असे बदल कुठल्या घटकांनी प्रभावित होतात हे गणिती मांडणीने समजणे हा तिचा गाभा आहे. ‘क्लिओडायनॅमिक्स’ नावाची विशेष शोधपत्रिकाही सन २०१० पासून प्रसिद्ध होत आहे.

ऐतिहासिक आणि पुरातत्त्वशास्त्रीय (आर्किओलॉजिकल) संख्यात्मक माहितीला समीकरणांनी व्यक्त करून चक्रीय पद्धतीने उदयास्त होत गेलेली साम्राज्ये, शहरे, धर्म आदींची कारणमीमांसा करून क्लिओडायनॅमिक्समध्ये सांख्यिकीच्या मदतीने भविष्यानुमान केले जाते. या ज्ञानशाखेचे आधारस्तंभ, मूळचे रशियन शास्त्रज्ञ पीटर तुर्चीन यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह मागील दहा हजार वर्षांचा जागतिक, सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्थांच्या आकडेवारीचा ‘सशत (Seshat) नावाचा अंकीय माहितीसाठा २०११ मध्ये निर्माण करण्यास सुरुवात केली. विदा खननतंत्र (डेटा मायनिंग) आणि संरचनात्मक-लोकसंख्याशास्त्रीय सिद्धान्त (स्ट्रक्चरल-डेमोग्राफिक थिअरी) या पद्धतींनी त्यांचा तुलनात्मक अभ्यास सुरू आहे. त्यावरून विविध कालखंडांत आणि भूभागांत मानव समाजाची जडणघडण कुठल्या नियमांनी झाली, हे शोधले जात आहे. त्यानुसार, भविष्यात उच्च पदे वा स्थान मिळवण्याची समाजातील श्रेष्ठजनांतील (एलीट) जीवघेणी स्पर्धा समाजातील व्यामिश्रता (कॉम्प्लेक्सिटी) वाढवून मोठे संघर्ष निर्माण करणारी ठरेल, असे घडण्याची दाट शक्यता आहे. त्यावर मात करण्यासाठी काही उपायही सुचवले आहेत; त्यांत काही वेगळे निर्देशांक निर्माण करावे अशी सूचना आहे. अनिश्चित मानवी वर्तणूक संख्यात्मक नियमांत बसवणे शक्य आहे का, याबद्दल दुमत असले तरी, ‘प्रगत गणिताने इतिहासाचा अभ्यास’ हे संशोधनाचे नवे दालन उघडले गेले आहे. – डॉ. विवेक पाटकर

 

मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org