अठराव्या शतकातल्या मोजक्या गणितज्ञ महिलांपैकी एक होत्या १६ मे १७१८ रोजी इटलीत जन्मलेल्या मारिया अ‍ॅग्नेसी! उच्चशिक्षित आणि श्रीमंत वडिलांनी मारियांची जन्मजात प्रतिभा ओळखून सर्वोत्तम शिक्षकांतर्फे त्यांना घरीच ग्रीक, हिब्रू, लॅटिन, फ्रेंच व स्पॅनिश या भाषा शिकवल्या. तत्त्वज्ञान आणि विज्ञानही शिकवले. वडिलांच्या विद्वान मित्रांबरोबरच्या बौद्धिक चर्चात किशोरवयीन अ‍ॅग्नेसी सामील होत. त्यावर आधारित त्यांनी लिहिलेले काही लेख सन १७३८ मध्ये ‘Propositiones Philosophicae’ या पुस्तकात प्रकाशित झाले.

याच सुमारास वडिलांनी अ‍ॅग्नेसींवर लहान भावंडांना शिकविण्याची जबाबदारी टाकली. गणित शिकविण्यासाठी अ‍ॅग्नेसींनी एक सर्वसमावेशक पाठय़पुस्तकच लिहायला घेतले, ज्याला दहा वर्षे लागली. या पुस्तकात बीजगणितापासून कलनशास्त्रापर्यंतचे अनेक जटिल विषय उदाहरणांसह सोपेपणाने समजावले आहेत. भरपूर मजकुराचे अ‍ॅग्नेसी यांचे ‘Instituzioni Analitiche Ad Uso Della Gioventù Italiana’ हे पुस्तक सन १७४८ मध्ये दोन भागांत प्रकाशित झाले. पहिल्या भागात अंकगणित, त्रिकोणमिती, बीजगणित, वैश्लेषिक भूमिती आणि कलन, तर दुसऱ्या भागात अनंत श्रेणी आणि विकलक समीकरणे हे विषय हाताळले आहेत. सान्त आणि अनंत संख्यांच्या विश्लेषणावरील हे पुस्तक पहिले तसेच परिपूर्णतेच्या जवळ जाणारे ठरले. विशेष म्हणजे, या पुस्तकातून गणितींचे कार्य अतिशय पद्धतशीरपणे अ‍ॅग्नेसी यांनी स्वत:च्या स्पष्टीकरणासह एकत्र आणले. हे पुस्तक इटलीत प्राथमिक गणित शिकविण्यासाठी वापरले जाऊ लागले. यथावकाश युरोप व पाश्चात्त्य जगात त्याची भाषांतरे गणिताचे सर्वोत्तम पाठय़पुस्तक म्हणून वापरली गेली.

फर्माने सन १६३० मध्ये वर्णन केलेला ‘घन वक्र’ अ‍ॅग्नेसी यांनी या पुस्तकात खोलवर अभ्यासला. दिलेल्या ‘अ’साठी त्याचे सूत्र असे आहे :  या वक्राला त्यांनी ‘versier’(वक्र) हा इटालियन शब्द  वापरला होता. परंतु इंग्रजी अनुवादकाने चुकून तो ‘avversier’(चेटूक) असा घेऊन वक्राला ‘अ‍ॅग्नेसीचे चेटूक’ म्हटले, जे रूढ झाले! प्रकाशीय रेषा आणि क्ष-किरणांच्या पंक्तीय रेषा यांचे वितरण मांडण्यात अ‍ॅग्नेसी यांचे सूत्र उपयोगी ठरले आहे.

गणितातील अपूर्व कार्याचा सन्मान म्हणून सन १७५० मध्ये बोलोन्या विद्यापीठाच्या गणित विभागाच्या प्रमुखपदी अ‍ॅग्नेसी यांची निवड झाली, जी त्यांनी अव्हेरली. विद्यापीठात गणिताचे प्राध्यापकत्व मिळविणाऱ्या त्या जगातील पहिल्या स्त्री ठरल्या. स्त्रियांना उच्च शिक्षण देण्यास आडकाठी असू नये हे त्यांच्या कर्तृत्वावरून सिद्ध झाले. सन १७५२ मध्ये वडिलांच्या मृत्युपश्चात त्यांनी गणितात काम करणे सोडले. पुढे धर्मशास्त्राला व गरीब स्त्रियांच्या सेवेला वाहून घेणाऱ्या गणिती अ‍ॅग्नेसी यांनी ९ जानेवारी १७९९ रोजी जगाचा निरोप घेतला.

– डॉ. विद्या ना. वाडदेकर

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org