संगणक म्हटला की हार्डवेअरच्या जोडीने सॉफ्टवेअर येतंच. वेगवेगळ्या प्रोग्रामिंगच्या भाषा, निरनिराळे प्लॅटफॉम्र्स, आणि प्रोग्राम लिहिणाऱ्याची क्षमता यानुसार सॉफ्टवेअर अगदी भिन्न भिन्न प्रकारे घडू शकतं. त्यामुळे सॉफ्टवेअरचं मोजमापन करणं, हे तसं कठीणच असतं. त्यातून सॉफ्टवेअर किती कार्यक्षम आहे आणि त्यात अत्यावश्यक/अनावश्यक गोष्टी किती आहेत हेही पाहावं लागतं.

तरीही सॉफ्टवेअरच्या मोजमापनासाठी लाइन्स ऑफ कोड, म्हणजे किती ओळींचा प्रोग्राम ही संकल्पना बऱ्याचदा वापरली जाते. अनेक कसोटय़ांमधून यशस्वी होऊन बाहेर पडणारा अंतिम प्रोग्राम किती गुंतागुंतीचा आहे याचा अंदाज या मापनावरून लावता येतो.

फेसबुकच घ्या. सर्वाच्या लाडक्या या सोशल मीडिया अ‍ॅप्लिकेशनचं कोड आहे ६ कोटी ओळींचं! त्यात रोज भर पडत असते ती वेगळीच! विंडोज १० या प्रणालीचं कोड त्याच प्रमाणात, म्हणजे ५ कोटी ओळींचं आहे.

संगणक खेळ हे या प्रणालींपेक्षा जास्त किचकट असतात. त्यात वेगवेगळया शक्यता गृहित धरून खेळाच्या पुढील पायऱ्या लिहायच्या असतात. सोबत उत्तम दृकश्राव्य परिणाम देण्यासाठीही भरपूर कोड लिहावं लागतं. याचा परिणाम म्हणून ग्रँड थेफ्ट ऑटो या संगणक खेळाचं कोड चक्क १० कोटी ओळींचं आहे! विंडोज १०च्या दुप्पट! इतका क्लिष्ट प्रोग्राम लिहून, त्याच्या चाचण्या करून, मग तो परिपूर्ण बनवणे म्हणजे किती कष्टाचं आणि वेळखाऊ काम असेल याचा अदमास आलाच असेल!

त्यामानाने आपल्याला गहन वाटणाऱ्या अवकाश मोहीमांच्या यंत्रणांचं कोड मात्र कमी ओळींचं असतं. याचं कारण म्हणजे त्या यंत्रणा एका ठराविक कामासाठी बनवलेल्या असतात, आणि त्यांनी पाठवलेल्या माहितीचं विश्लेषण हे इथे पृथ्वीवर होतं. एखाद्या स्पेस शटलच्या प्रोग्रामचं कोड सुमारे ४ लाख ओळींचं होईल, तर हबल दुर्बणिीत सुमारे २० लाख ओळींचं कोड आहे.

सर्वात जास्त ओळींचा प्रोग्राम कोणता असेल? गुगलचं नाव अजून कसं आलं नाही याचं आश्चर्य वाटत असेल ना? अगदी बरोबर! आज गुगलच्या सगळ्या सुविधा मिळून एकूण २०० कोटी ओळींचे प्रोग्राम आहेत. अर्थात तुम्ही हे वाचेपर्यंत ही संख्या आणखी वर गेलेली असेल!

– मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

अमरकान्त- कादंबरी लेखन

अमरकान्त यांच्या एकूण ११ कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘सूखा पत्ता’ कादंबरी १९५९ मध्ये प्रकाशित झाली आणि आतापर्यंत त्याच्या चार आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. काले उजले दिन, कँटीली रात के फूल, ग्रामसेविका, सुख-जीवी, बीच की दीवार, आकाशपक्षी, लहरे, बिदा की रात आणि इन्ही हथियारों से या कादंबऱ्या कथा लेखनाइतक्याच समर्थ आहेत. पण कथालेखनापुढे त्या थोडय़ा मागे पडलेल्या वाटतात.

‘इन्ही हथियारों से’ ही कादंबरी बालिया जिल्ह्यतील भारत छोडो आंदोलनावर आधारित आहे. पण त्यात स्वातंत्र्य चळवळीतील राष्ट्रीय नेत्यांच्या चित्रणापेक्षा, स्वातंत्र्याचं स्वप्न साकार करण्यासाठी जिवावर उदार होऊन लढणाऱ्या गावातील जीवनाशी एकरूप असलेल्या सामान्य स्त्री-पुरुषाचं चित्रण ठळक आहे. या वाचकप्रिय कादंबरीला २००७ चा साहित्य अकादमी पुरस्कार आणि व्यास सन्मान प्राप्त झाला आहे.

१९५९ मध्ये प्रकाशित झालेली अमरकान्त यांची ‘सूखा पत्ता’ ही कादंबरीही त्या काळातील श्रेष्ठ कादंबरी मानली जाते. ही त्यांच्या मित्राचीच कथा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात उत्तर प्रदेशातील गावांचा चेहरा, रूप आणि कथानायक कृष्णची ही कथा आहे. किशोरवयातून तारुण्यात प्रवेश केल्यावर विद्यार्थी मनातील तरंग, अनुभव याचं चित्रण करीत त्यांनी कृष्ण-ऊर्मिला प्रेमकथा लिहिली असली तरी त्यानिमित्ताने त्यांनी, कृष्णाचा मित्र मनमोहनच्या व्यक्तिरेखेतून या वयातील मानसिक विकृती, कृष्णाच्या क्रांतिकारी चित्रणातून युवावस्थेतील अपरिपक्वता चित्रित केली आहे. तसंच कृष्ण-ऊर्मिला प्रेमकथेच्या संदर्भात समाजातील मानवविरोधी रूढी-परंपरांवर तीक्ष्ण प्रहार केले आहेत. अत्यंत सूक्ष्मपणे पण तरीही अत्यंत सहजशैलीत असे चित्रण अमरकान्त यांनी केले आहे.

कथा असो, कादंबरी लेखन, जीवन जसे आहे तसंच ते चित्रित करतात. समर्थ लेखकाचं वैशिष्टय़ आहे की, लेखक आपल्या नायक-खलनायकाची तरफदारी किंवा निंदा करीत नाही. उलट त्यांच्याभोवतीच्या परिस्थितीच्या संघर्षांतून असं काही ते ठळकपणे पुढे येतं की वाचकच या स्थितीच्या निष्कर्षांपर्यंत जाऊन पोहोचतात आणि असं हे वास्तव परिस्थितीतून वर आणण्याची खास वास्तववादी शैली हे अमरकान्त यांच्या लेखनाचं वैशिष्टय़ आहे. म्हणूनच ते हिंदीतील एक समर्थ, वाचकप्रिय लेखक आहेत.

– मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com