वेगवेगळ्या किडी आणि रोगांसाठी वेगवेगळे उपाय आहेत. झाडांचा इजा झालेला भाग नष्ट करावा लागतो, कारण किडीच्या जीवनावस्था (अळी, कोष) या भागांत आढळतात. तसेच शेतातील काडी-कचऱ्यामुळे किडी किंवा बुरशीचे संवर्धन होते. धान्यातही किडी आणि रोगराईचे जंतू सुप्तावस्थेत वावरतात. त्यासाठी शेत आणि भोवतालची जागा (विशेषत: बांध) साफ ठेवावी. किडलेले किंवा रोगट अवयव जाळून टाकावेत. मोठय़ा अळ्या हाताने वेचून नष्ट कराव्यात. अलीकडे रासायनिक संयुगे वापरून लंगिक सापळ्यांद्वारे किडींची संख्या कमी करता येते. वेगवेगळ्या आकाराचे प्रकाश सापळे वापरल्यास प्रकाशाकडे आकर्षति होणाऱ्या फक्त उडणाऱ्या किडय़ांची संख्या घटते.
उन्हाळ्यात शेतात खोल नांगरणी केल्यास जमिनीत सुप्तावस्थेत असलेले जीवाणू पृष्ठभागावर येतात आणि अति उष्णतेने मरतात. आंतरपिके आणि मिश्रपिके घेतल्यास मुख्य पिकावरील किडीचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव कमी होतो. उशिरा पेरणी आणि दाट लागवड करणे, गरजेपेक्षा रासायनिक खतांची मात्रा अधिक प्रमाणात वापरणे, ओलीत अधिक संख्येत करणे या बाबींमुळे प्रादुर्भाव वाढतो.
 विशिष्ट किडी किंवा रोगासाठी पिकांचे प्रतिकारक्षम वाण विकसित करतात. त्यामुळे पीक संरक्षणावरील खर्च कमी करता येतो. वातावरणाला धोका पोहोचत नाही. पिकाच्या उत्पादनात भर पडते.
कडुनिंब, निवडुंग, जंगली एरंडी, तुळशी, गाजर गवत, लॅन्टाना इत्यादी वनस्पतींची पाने, फुले, फळे यांच्यापासून रसायने काढून किंवा फक्त अर्क काढून फवारणी केल्यास किडी आणि रोगांचे प्रमाण कमी होते.
निसर्गामध्ये परोपकारी कीटक, जंतू असतात. यामध्ये भक्षक आणि परजिवी सूक्ष्मकृमी आणि बुरशी उपयुक्त ठरतात. यामुळे नसíगक संतुलनही आपोआप कायम राहाते.
रासायनिक कीडनाशके सहजपणे उपलब्ध असून अत्यंत परिणामकारक असतात. परंतु यामुळे मित्रकीटकांची/ जिवाणूंची संख्या कमी होते, वातावरण प्रदूषित होते आणि किडीमध्ये विशिष्ट रसायनासाठी प्रतिकारशक्ती वाढल्यास ते औषध कुचकामी ठरते. धान्यामध्ये रासायनिक अवशेष राहिल्यास मानवी जीवनास धोका पोहोचतो. त्यामुळे अलीकडे एकात्मिक पीक व्यवस्थापनाची शिफारस केली जाते.                
– डॉ. रूपराव गहूकर (नागपूर)
मराठी विज्ञान परिषद,  वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

जे देखे रवी..       नर आणि मादी
‘कुमार विश्वकोश’ (संकलन: विजया वाड) मधील कोकीळ या पक्ष्याची नोंद काल बघितली. या पक्ष्यात नर आणि मादी यांच्यातला फरक लक्षणीय असतो. कोकीळ तकतकीत काळा तर कोकिळा तपकिरी, परंतु तिच्यावर पांढरे ठिपके किंवा पट्टे असतात. नर कुहूऽऽ कुहू अशी साद घालतो, मादी डब डब असा आवाज करते. कावळ्याचा आणि यांचा विणीचा काळ एकच (मार्चनंतर) त्यावेळी अंडी घातलेल्या कावळ्यांच्या घरटय़ाजवळ कोकीळ शिटय़ा मारत बसतो. तेव्हा कावळ्यांना संशय येतो म्हणून त्याचा पाठलाग करत हुसकावून लावण्याचा प्रयत्न होतो. तेवढय़ात कोकिळीणबाई आपले अंग मोडून त्या घरटय़ात शिरतात. कावळ्याचे एक अंडे चोचीने ढकलून खाली पाडून फोडतात व स्वत:चे अंडे तिथे घालून गपचीप बाहेर येतात. पिल्लांमध्ये फारसा फरक नसतो तेव्हा कोकीळ दाम्पत्याचे काम फत्ते होते.
हे वर्णन वाचून मला एका बॉनी आणि क्लाइड या भुरटय़ा चोरी करणाऱ्या प्रेमी युगुलाची आठवण झाली. त्या सिनेमात दोघे पुढे बँकांवर दरोडे घालतात. त्यात बॉनी गोळी लागून मरतो तेव्हा मरताना म्हणतो क्लाइड ‘तुला मी शरीर सुख मात्र देऊ शकलो नाही तशी इच्छाच झाली नाही’ तेव्हा क्लाइड म्हणते  ‘खऱ्या प्रेमाला शरीरसुखाची काय गरज?’ शेवटचा संवाद सूचित आहे. नागडं सत्य न सांगण्याचा तो जमाना होता.
त्याच दिवशी जॉर्ज बर्नार्ड शॉ या सुप्रसिद्ध नाटककाराच्या लिखाणाचा आढावा घेतला. त्यात कॅन्डिडा नाटकात तिचे लग्न समाजवादी विचारसरणीच्या एका मठ्ठ कारकुनाशी झालेले असते. तिच्या आयुष्यात एक भावुक कवी येतो आणि ही ढळण्याच्या बेतात असताना शेवटी त्या कारकुनालाच बिलगते. इथेच मी सुरक्षित आहे. हा एक विचार आणि हा कारकून कमजोरच राहणार आहे तेव्हा आपल्या हातात राहील हा दुसरा विचार.You Can Never Tell  या नाटकातली  स्त्री तर्कनिष्ठ आणि व्यवहारी असते आणि तिला एक लैंगिक स्वैराचारावर विश्वास असलेला तरुण भेटतो. खूप चर्चा, भांडणे आणि आदळआपट झाल्यावर ती आपल्या जैविक ऊर्मीना वाट करून देते आणि उलट हा लग्नाच्या बेडीत अडकतो अशी गोष्ट आहे.
शॉचे अर्थात सर्वात सुप्रसिद्ध नाटक Pygmallion  त्यावरचा सिनेमा My Fair Lady एका गावरान अशुद्ध भाषा बोलणाऱ्या फुलवालीला एक मालदार भाषातज्ज्ञ जवळजवळ विकतच घेतो. तिला प्रचंड मेहनत करून कधी कधी तिच्या मनाविरुद्ध, धाकदपटशा दाखवून अस्खलित बोलायला शिकवतो. या भानगडीत तो तिच्या प्रेमात पडतो, पण पुरुषी अहंकारामुळे तसे म्हणू शकत नाही. ही मात्र एका प्रेमिकाला झिडकारून त्या वयाने मोठय़ा माणसाच्या स्वाधीन होते अशी गोष्ट.  हा मामला अध्यात्मापेक्षा अवघड.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस- हृद्रोग व प्राणवहस्रोतसे
थोर शारंगधर ग्रंथकाराने हृदयाच्या वर्णनाकरिता कमलपुष्पाची उपमा वापरलेली आहे. आपल्या शरीरात अनेक नाजूक अवयव आहेत. नेत्र, जिव्हा, कर्ण, स्त्री-पुरुष मूत्रेंद्रिय तसेच अन्य काही ठणठणीत अवयवदेखील आहेत. आपला खूप खूप स्निग्ध व महत्त्वाचा अवयव मेंदू, डोक्याच्या भक्कम कवटीत पूर्णपणे सुरक्षित असतो. जन्मापासून प्रत्येकजण अनेकदा धडपडतो, डोक्याला मार लागतो, पण मेंदूला सहसा इजा पोचत नाही.
आपल्या हृदयाची फुफ्फुसातील सुरक्षित व्यवस्था अशीच अनाकलनीय आहे. ज्या पुफ्फुसाच्या बळावर ‘बोल्ट’सारखे जागतिक धावपटू विक्रमाचे डोंगर रचतात; त्यांचे हृदय प्रचंड, अति प्रचंड वेगात धावूनही सुरक्षित असते. एककाळ भारतीय धावपटू मिल्खा सिंगने ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे नाव आपल्या अति वेगवान धावण्याने मोठेच उज्ज्वल केले होते. शेरपा तेनसिंगने माऊंट एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केले. एवढेच कशाला आज आपले भारतीय जवान लडाख, तिबेट, अरुणाचल अशा अत्यंत थंड वातावरणात उंच उंच पर्वतराजीमध्ये भारताच्या सीमा संरक्षणाचे काम मोठय़ा धैर्याने करत असतात. या मंडळींना आसपासच्या वातावरणातील थंड हवा, बोचरे वारे, बर्फाळ वातावरण, बदलते हवामान यांचा त्रास हृदयाला अजिबात होऊ नये म्हणून त्यांचा फुफ्फुसाचा िपजरा खूप मोठे योगदान देत असतो. मी स्वत: काश्मीर, अरुणाचल प्रदेश अशा ठिकाणी नित्य बदलणाऱ्या वातावरणातही फुफ्फुसाची क्षमता दीर्घश्वसन, प्राणायाम, सूर्यनमस्काराने कशी टिकवता येते हे तीन वर्षे अनुभवले आहे.
ज्या व्यक्तींना हृदयरोगाबरोबर प्राणवहस्रोतसाच्या सर्दी, पडसे, खोकला, दमा, राजयक्ष्मा, ब्रॉन्कायटिस, स्वरभंग अशा विकारांची पाश्र्वभूमी आहे त्यांनी नेहमीचय हृद्रोगाच्या औषधांच्या एकवेळच्या सेवनाखेरीज लक्ष्मीनारायण, ज्वरांकुश, दमागोळी, लवंगादि, अभ्रकमिश्रण, नागरादिकषाय, वासापाक, एलादिवटी यांची मदत घ्यावी. पुदीना, आले, ओली हळद, तुळसपाने यांना विसरू नये.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत   – २० नोव्हेंबर
१८५४ > रोज एक कविता, याप्रमाणे आयुष्यभरात दहा ते १२ हजार कविता लिहिणारे कवी, निबंधकार व नाटककार मोरो गणेश लोंढे यांचा जन्म. दहा पुस्तके व ‘दुर्दैवी सून’ हे सामाजिक नाटक त्यांच्या नावावर आहे.
१९५२ > महानुभाव पंथाच्या परंपरा व वाङ्मयाचे गाढे अभ्यासक यशवंत खुशाल देशपांडे यांचे निधन.
१९७३ > ‘ग्रामण्याचा इतिहास’, ‘देवळांचा धर्म व धर्माची देवळे’, ‘देवांची परिषद’ अशी ज्यांची पुस्तके आजही वाचली जातात, ते ‘प्रबोधनकार’ ठाकरे कालवश. ‘प्रबोधन’ या साप्ताहिकाचे संस्थापक-संपादक, व्यंगचित्रकार, समाजसुधारक, पट्टीचे वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक अग्रणी म्हणून प्रबोधनकारांची- केशव सीताराम ठाकरे यांची ओळख आहे. कुमारिकांचे शाप, भिक्षुकशाहीचे बंड हे त्यांचे लिखाण तत्कालीन समाजात खळबळ निर्माण करणारे ठरले, तर संगीत सीताशुद्धी खरा ब्राह्मण, विधिनिषेध, टाकलेले पोर ही त्यांची नाटके रंगभूमीवर गाजली नसली तरी खटकेबाज संवादांसाठी संस्मरणीय ठरली. ब्राह्मणेतर चळवळीला आक्रमक चेहरा देणाऱ्या ठाकरे यांचे समग्र लिखाण ‘प्रबोधनकार.कॉम’वर उपलब्ध आहे.
– संजय वझरेकर