संगणक वापरायचं  मुख्य कारण असतं काम भराभर पार पाडणं.अर्थात त्यासाठी संगणकाचा वेग महत्त्वाचा ठरतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संगणकाच्या वेगासाठी त्यातला सीपीयू (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट – मध्यवर्ती संस्करण यंत्रणा) माहितीवर किती पटापट संस्करण करू शकतो हे पाहावं लागतं. सीपीयूमध्ये एक घडय़ाळ, म्हणजे एक क्वार्ट्झ स्फटिक असतो. या स्फटिकाच्या स्पंदनाच्या आवर्तनांमध्ये माहितीवर संस्करण होत असतं. या स्फटिकाची सेकंदाला जितकी स्पंदनं होतात, त्याला सीपीयू घडय़ाळाची वारंवारता (क्लॉक फ्रिक्वन्सी) म्हणतात. ही वारंवारता हर्ट्झमध्ये मोजली जाते आणि एका अर्थाने संगणकाचा वेग दाखवते. अर्थात हा वेग स्मृतीक्षमता, ऑपरेटिंग सिस्टम यावरदेखील अवलंबून असतो.

ऐंशीच्या सुमारास डेस्कटॉप संगणकाचा वेग ४ मेगाहर्ट्झच्या आसपास असायचा. आज आपल्या रोजच्या वापरातल्या लॅपटॉपचा वेग साधारण १ ते ३ गिगाहर्ट्झ (१ गिगाहर्ट्झ = १००० मेगाहर्ट्झ) असतो.

संशोधनासाठी किंवा प्रचंड प्रमाणात आकडेमोड करण्यासाठी महासंगणकांची गरज भासते. या महासंगणकांमध्ये अनेक संगणक समांतर काम करत असतात. त्यामुळे केवळ प्रत्येकाच्या घडय़ाळाची वारंवारता ही वेगाच्या मोजमापासाठी पुरेशी ठरू शकत नाही. जोडीने संगणकांची मांडणी, कार्यपद्धती, संबंधित आज्ञावली आणि इतर गोष्टींचाही विचार करावा लागतो.

या सगळ्याचा एकत्र विचार करून महासंगणकासाठी वेग म्हणजे गणिती क्रिया करण्याचा वेग बघितला जातो, आणि तो फ्लॉपमध्ये मोजतात. फ्लॉप म्हणजे फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स पर सेकंड. एका सेकंदात हा महासंगणक किती क्लिष्ट गणिती क्रिया पार पाडू शकतो याचं ते मोजमाप आहे.

महासंगणकांच्या संदर्भात नेहमी फ्लॉप्सची गुणक एककं वापरली जातात – गिगाफ्लॉप्स, टेराफ्लॉप्स, पेटाफ्लॉप्स अशी. भारताचा पहिला महासंगणक होता परम ८०००. त्याची क्षमता एक गिगाफ्लॉप्सच्या आसपास होती, तर आता इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधल्या सहस्र-टी या महासंगणकाची क्षमता आहे १.४ पेटाफ्लॉप्स, अर्थात १,४०० टेराफ्लॉप्स, म्हणजे परमच्या १,४००,००० पट! सहस्र-टीच्या नावातच हजार टेराफ्लॉप्स असं कौतुकाने गुंफण्यात आलं आहे.

आजघडीला जगातला सर्वात वेगवान महासंगणक आहे चीनमधला सनवे टिहूलाइट. त्याचा आकडेमोडीचा वेग आहे ९३ पेटाफ्लॉप्स, सहस्र-टीच्या पन्नास पटीहून अधिक! हा वेग पुढे आणखी वाढत जाणार हे निश्चित!

मेघश्री दळवी

 मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

शहरयार’ – साहित्य-सन्मान

साठोत्तरी कवितेतील एक प्रमुख कवी, शायर, गीतकार शहरयार यांनी गज़्‍ाल आणि नज्म्म (कविता) या दोन्ही प्रकारांत विपुल लेखन केले आहे. १९६५ मध्ये त्यांचा ‘इस्म-ए-आज़्‍ाम’ हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर ‘सातवाँ दर’ (१९७०), ‘हिज्रके मौसम’ (१९७८), ‘ख्वाब का दर बंद है’ (१९८५) प्रसिद्ध झाला. या संग्रहाला १९८७ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यानंतर हा काव्यसंग्रह हिन्दीतही प्रसिद्ध झाला. ‘काफिले यादों के’ (१९८७) इ. असे एकूण उर्दूतील दहा संग्रह, ‘मेरे हिस्से की जमीन’ (१९९८), ‘मिलता रहूँगा ख्वाब में’ इ. चार हिन्दी काव्यसंग्रह, ‘द गेटवे टू ड्रीम्स इज क्लोज्ड’ (१९९७) इ. इंग्रजी अनुवादित तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

शहरयार यांच्या शायरीमध्ये ‘ख्वाब’ (सपना), ‘आगाही’ (आभास), ‘वक्त’ (समय) आणि ‘मौत’ (मृत्यू) ही प्रतीके तसेच ‘परछाइयाँ’ (सावल्या) अनेकदा येतात. यावरील अनेक कविता, शेर त्यांनी लिहिले आहेत. या सावल्यांनाही अस्तित्व असते असे त्यांना वाटते. एका गज़्‍ालमध्ये ते म्हणतात-

‘उनके पीछे न चलो, उनकी तमन्ना न करो

साये फिर साये है, कुछ देर में ढल जायेंगे’

सावल्यांबरोबरच एकटेपणावरही शहरयार यांनी अनेक ठिकाणी लिहिले आहे-

‘मैंअकेला सही मगर कैसे

नंगी परछाइयों के बीच रहूँ?’

शहरयार यांनी हिन्दी चित्रपट गीते लिहिली आणि खूप गाजलीही.

लखनौच्या परंपरेवर, रीतिरिवाजांवर एखादा चित्रपट मुझफ्फर अलींना काढायचा होता. तेव्हा शहरयार यांनीच त्यांना ‘उमराव जान’ची कहाणी ऐकवली. मग यावरच त्यांनी चित्रपट बनवला. या चित्रपटातील सहाही गज़्‍ाला खूप गाजल्या. आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. उदा.- ‘दिल चीज क्या है, आप मेरी जान लिजिए’, ‘इन आँखों की मस्ती के, मस्ताने हजारों है’, ‘ये क्या जगह है दोस्तों? ये कौनसा दयार है?’ इ. त्यानंतरही मुझफ्फर अलींचे काही चित्रपट आणि चोप्रांच्या ‘फासले’ चित्रपटाची गाणी शहरयार यांनी लिहिली, पण नंतर मात्र त्यांनी नकार दिला.  हैदराबाद विद्यापीठाने त्यांना डी.लिट. प्रदान केली. तसेच साहित्य अकादमी पुरस्कार, उर्दू अकादमी पुरस्कार, फिराक सन्मान, गालिब इन्स्टिटय़ूट पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Megahertz to petaflops
First published on: 20-11-2017 at 00:38 IST