आर्थिक विषमता आणि त्यातून निर्माण झालेले सर्वसामान्यांचे अस्तित्वाचे प्रश्न हिंदी चित्रपटांमधून प्रभावीपणे मांडणारे पहिले दिग्गज दिग्दर्शक म्हणून मेहबूब खान यांचं नाव आजही घेतलं जातं. तसंच भारतातील पूर्ण लांबीचा, पहिला रंगीत चित्रपट ‘आन’ निर्माण करण्याचं श्रेयही त्यांना दिलं जातं. अफगाणिस्तानातून आलेल्या पठाण पूर्वजांच्या घराण्यात गुजरातमधील बिलिमोरा येथे १९०७ साली त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव मेहबूब खान रमझान खान.

वडिलांची आर्थिक परिस्थिती यथातथाच. जुजबी शिक्षण झाले आणि त्या काळात त्यांना चित्रपटांचे आकर्षण होते. त्यांच्या गावचे म्हणजे बिलिमोराचे नूर मोहम्मद अली मोहम्मद शिप्रा यांचा मुंबईत एक मोठा घोडय़ांचा तबेला होता. या तबेल्यातले घोडे चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी भाडय़ाने देण्याचा व्यवसाय हा नूर मोहम्मद करीत असे. मेहबूब खानचा आणि नूर मोहम्मदचा चांगला परिचय होता. या गरीब घरच्या मुलाला काही कामधंद्याला लावावे म्हणून तो तरुण मेहबूब खानला मुंबईला घेऊन गेला आणि आपल्या तबेल्यात घोडय़ांना नाल लावण्याच्या कामासाठी त्याला नोकरीस ठेवले.

मेहबूब खान अनेक वेळा सिनेमा शूटिंगच्या ठिकाणी घोडे घेऊन जाई आणि स्टुडिओच्या लोकांशी गप्पा मारताना शूटिंगसंबंधात काही सूचना बोलून दाखवत असे. चंद्रशेखर या दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शकाला या तरुण मुलाच्या कल्पनाशक्तीबद्दल, हरहुन्नरी स्वभावाबद्दल मोठे अप्रूप होते. चंद्रशेखरने नूर मोहम्मद, ज्याच्याकडे मेहबूब नोकरीला होता त्यांना सुचवलं की, हा मुलगा गुणी आहे. याला माझ्याकडे शूटिंगसाठी नोकरीस पाठवलं तर हा मोठी प्रगती करेल. नूर मोहम्मदने मान्यता दिल्यावर मेहबूब खान चंद्रशेखरांकडे स्टुडिओतल्या किरकोळ कामांसाठी नोकरीस लागला. त्याच्या अंगच्या गुणांनी प्रगतीचे एक एक टप्पे गाठत मेहबूब खान लवकरच चंद्रशेखरांचा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागला. मेहबूब खान चंद्रशेखरांचा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करीत असताना अर्देशीर इराणींच्या इंपीरियल फिल्म कंपनीत एक्स्ट्रा म्हणूनही काम करीत असे. ते दिवस मूक चित्रपटांचे होते.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com