श्रुती पानसे

‘पहिल्यांदा इंटरव्ह्य़ू दिला तेव्हा खूप भीती वाटली होती, पण दुसरा इंटरव्ह्य़ू चांगला झाला.’ ‘आधी काय करायचं हे कळलंच नाही, पण नंतर आईने सांगितलेलं आठवलं.’ अशा प्रकारची वाक्यं आपण नेहमी ऐकतो. याचा अर्थ एखाद्या अवघड, अनपेक्षित अनुभवांना सामोरं जाणं ताणाचं असतं. पण अशावेळी काय करायचं आहे हे माहीत असेल तर तीच कामगिरी सोपी होते.

स्वतला आयुष्यामध्ये विविध प्रसंगांसाठी तयार करावं लागतं. अनेक नव्या अनुभवांना सामोरं जाण्यासाठी स्वतला जाणीवपूर्वक घडवावं लागतं. त्याच प्रकारे मुलांना देखील असंच अनुभवांसाठी तयार करावं लागतं. अशा वेळी त्यांची वाट सोपी करण्यासाठी एक युक्ती करता येते. ती म्हणजे एखादा भविष्यातला प्रसंग प्रत्यक्ष घडवून आणणं किंवा मनात त्याचं चित्र उभं करणं. (व्हिज्युअलायझेशन)

उदाहरणार्थ, ही विशेष कामगिरी आपण कशी पार पाडणार आहोत, याचं पायरीपायरीने चित्र डोळ्यासमोर आणून गोष्टींची उजळणी केली तर त्यांची चांगली तयारी होईल. कोणकोणत्या गोष्टी अनपेक्षितपणे घडू शकतात आणि त्यांना तोंड कसं द्यायचं आहे याची तयारी आधी केली तर ते सोपं जाऊ शकतं.

एखादा अपघात घडला तर अशावेळेला नक्की काय करायचं आहे हे सुचत नाही. त्या वेळेला मेंदू गोंधळून जाऊन कदाचित चुकीचे निर्णय घेऊ शकतो. मात्र  अशा अवघड प्रसंगी आपण काय करू शकतो हे माहिती असेल आणि त्याप्रमाणे मनाची काही प्रमाणात तयारी झालेली असेल तर मेंदू जास्त प्रमाणात गोंधळणार नाही. कारण अशा प्रसंगात कसं वागायचं आहे, काय करायचं आहे आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत हे त्याला आधीच माहिती असेल.

या सर्व गोष्टी प्रोसिजरल मेमरीच्या अंतर्गत घडतात. याला आपत्ती व्यवस्थापनात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आपत्ती घडल्यानंतर चुका टाळण्यासाठी आणि योग्य प्रकारे वागण्यासाठी या प्रकारच्या पूर्वतयारीची मेंदूला मदतच होते. हा उपाय वैयक्तिक पातळीवर आणि सामूहिक पातळीवरही चांगलाच उपयोगी पडतो. दहावीच्या बोर्ड परीक्षेआधी घेतली जाणारी प्रीलिम परीक्षा हा त्याचाच एक प्रकार आहे. परीक्षेच्या प्रत्यक्ष अनुभवातून गेलं तर मेंदूचा गोंधळ आणि ताण दोन्ही काही प्रमाणात कमी होतं.

contact@shrutipanse.com