आवर्तसारणीतील शतकवीर फर्मीअमचा पाठचा भाऊ म्हणजे मेंडेलीविअम होय. फर्मीअमच्या शोधाचे मुख्य श्रेय ज्या अल्बर्ट घिओर्सो यांना जाते त्यांनाच मेंडेलीविअमच्या शोधाचे मुख्य श्रेय जाते. मेंडेलीविअमच्या शोधासाठी अल्बर्ट घिओर्सो, ग्लेन सीबोर्ग, ग्रेगरी चॉपिन, बर्नार्ड हार्वे आणि स्टॅन्ली थाँप्सन यांनी नियोजनबद्ध आखणी करून बर्कले येथील कॅलिफोíनया विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत वेगवेगळे प्रयोग केले.

मेंडेलीविअमची निर्मिती हलक्या मूलद्रव्यांवर न्यूट्रॉनचा मारा करून करता येणे अशक्य आहे. त्याऐवजी कण प्रवेगकामध्ये (‘पार्टिकल एक्सिलरेटर’मध्ये) हलक्या मूलद्रव्यांवर भारांकित कणांचा मारा करून त्याची निर्मिती करता येते. मेंडेलीविअमची निर्मिती १९५५ साली आइन्स्टाइनिअम या मूलद्रव्यावर अल्फा कणांचा मारा करून करण्यात आली. शास्त्रज्ञांनी १८ फेब्रुवारी १९५५ रोजी रात्रभर आइन्स्टाइनिअम-२५३ या मूलद्रव्यावर अल्फा कणांचा मारा केला. यात त्यांना मेंडेलीविअम-२५६चे केवळ १७ अणू मिळाले. अर्थात पुढे या संख्येत काही प्रमाणात वाढ करण्यात त्यांना यश मिळाले.

मेंडेलीविअम या मूलद्रव्याच्या नामकरणाचा इतिहास रोमांचक आहे. या मूलद्रव्याला आधुनिक आवर्तसारणीचा जनक रशियन शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव्ह यांचे नाव देण्यात यावे अशी शास्त्रज्ञांची इच्छा  होती. परंतु त्यावेळी असलेल्या शीतयुद्धाच्या परिस्थितीमुळे ते साशंक होते. सीबोर्ग यांनी अमेरिकन सरकारला तसे विनंतीपत्र पाठविले आणि आश्चर्य म्हणजे तशी परवानगी मिळाली.

मेंडेलीविअमची सोळा समस्थानिके असून त्यापकी मेंडेलीविअम-२५८ हे सर्वात जास्त म्हणजे ५२  दिवसांचा अर्धायुष्यकाल असलेले समस्थानिक आहे. असे असले तरी मेंडेलीविअम-२५६ हे १.१७ तासांचा अर्धायुष्यकाल असलेले समस्थानिक जास्त प्रमाणात बनवता येत असल्यामुळे संशोधन करण्यासाठी वापरतात. किरणोत्सारी असलेले हे मूलद्रव्य रासायनिकदृष्टय़ा अ‍ॅक्टिनाइडच्या शृंखलेत मागील टोकाकडे आढळणाऱ्या इतर मूलद्रव्यांसारखे आहे. मेंडेलीविअम मुबलक प्रमाणात बनवता येत नसल्यामुळे त्याचे रासायनिक व भौतिक गुणधर्म अभ्यासणे अवघड आहे. मेंडेलीविअमचा अनुमानित वितलनांक ८२७ अंश सेल्सिअस इतका आहे. मेंडेलीविअम अत्यंत कमी प्रमाणात बनविता येत असल्यामुळे आणि त्याच्या समस्थानिकांचे अर्धायुष्य अत्यल्प असल्यामुळे या मूलद्रव्याचा  व्यवहारात सध्या तरी विशेष उपयोग होत नाही. परंतु मूलभूत संशोधनात त्याचा वापर होतो.

– डॉ. शिवराम गर्जे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org