मर्सरायिझग प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे कसे पार केले जातात ते आपण समजून घेऊ या. कापडावर ही प्रक्रिया करण्यापूर्वी कापड पूर्ण ओले केले जाते. त्याकरिता मोठय़ा हौदासारखा ट्रे वापरतात. त्यामधे कापड सतत ओले ठेवले जाते. याकरिता वापरलेल्या पाण्याचे तापमान जेवढे जास्त तेवढी प्रक्रिया चांगली होते. मर्सरायिझगसाठी कॉस्टिक सोडय़ाच्या द्रावणात बुडवण्यापूर्वी हे कापड पूर्ण ओले होणे श्रेयस्कर असते. थंड पाण्यात कापड बुडवून जर ते कॉस्टिक सोडय़ाच्या द्रावणात बुडवले तर त्याची द्राव शोषून घेण्याची क्षमता २० टक्के कमी असते. जिथे शक्य असेल तिथे हा द्राव पहिल्या कापड ओले करण्याच्या ट्रेमधे वापरता येतो. जेणेकरून तिथे नव्याने पाणी घेऊन घालावे लागत नाही. तसेच हे पाणी ६० अंश सेल्सिअस एवढे गरम असते म्हणून ते गरम करावे लागत नाही.
कापडाच्या वजनानुसार २२० ते २४० ग्रॅम प्रतिकिलो इतक्या प्रमाणात १०० टक्के कॉस्टिक सोडय़ाचा वापर करतात. गरम पाण्यातील प्रक्रियेसाठी ६० ते ६५ अंश सेल्सिअस तापमान लागते. थंड पाण्यातील प्रक्रियेसाठी १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान असते. गरम पाण्यातील प्रक्रिया रंगीत कपडय़ावर करावयाची असेल तर मात्र तापमान ४५ अंश सेल्सिअस पर्यंतच ठेवावे लागते अन्यथा रंगावर परिणाम होण्याची शक्यता असते.
मर्सरायिझगमधील यांत्रिक क्रिया म्हणजे आटलेले कापड पुन्हा मूळ पदावर आणणे. कापड पध्दतशीरपणे ताणण्यासाठी स्टेन्टर या यंत्राचा वापर केला जातो. प्रथम कापडाच्या मोजमापाचा अंदाज घेतला जातो. सोडियम हायड्रॉक्साइड द्रावणाची कापडातील तीव्रता पाण्याचे फवारे मारून कमी केली जाते. त्यामुळे कापड आटण्याला पायबंद घातला जातो. आणि त्यानंतर ते कापड ताणले जाते. कापडाचे मोजमाप पुन्हा पूर्वपदावर आणणे आणि नेहमीच्या वापरात ते तसेच राहील, अगदी घरगुती धुलाईच्यावेळीसुद्धा, याची तजवीज करावी लागते.
कापडाच्या तयार पन्ह्याची निश्चिती आधीच केलेली असते. त्यानुसार कापडाची रुंदी मिळवण्यासाठी स्टेन्टरवर कापड ताणले जाते. कापड ताणले जाण्याच्या मर्यादा असतात. वजनदार कापडापेक्षा शìटगसारखे वजनाला हलके कापड तुलनेने सहज ताणले जाऊ शकते. स्टेन्टर मशीनवर रुंदी-कमी जास्त करून कापडाची योग्य रुंदी मिळवली जाते.

सतीश दिंडे (इचलकरंजी)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org

 

संस्थानांची बखर

पंतसचिव शंकररावांचे प्रशासन

भोर संस्थानाचे राज्यक्षेत्र २४००० चौ.कि.मी. असे विशाल होते. संस्थानात एकूण ४८० खेडी अंतर्भूत होती. ही सर्व खेडी शिरवळ, नसरापूर, वेल्हे, कोळवण आणि पाली या पाच महालांमध्ये विभागून प्रशासकीय कारभार चालत असे. पंतसचिव शंकरराव चिमणाजी यांचे प्रशासन इ.स. १८७१ ते १९२२ असे झाले. बुद्धिमान, करारी, निरलस असा हा राज्यकर्ता अत्यंत तापट होता. राज्यात रस्ते, धर्मशाळा, विहिरी, हायस्कूल आणि ६० प्राथमिक शाळा स्थापन करणारे शंकरराव ऊर्फ रावसाहेब अत्यंत धार्मिक होते. रामनवमी उत्सवासाठी त्यांनी २८ गावे तोडून दिली. काटकसरी स्वभावाचे रावसाहेब सर्व खात्यांतील कामे स्वत: पाहात आणि त्यांच्या या एकतंत्री कारभारामुळे कर्मचाऱ्यांना स्वत: जबाबदारीने काम करण्याची सवय राहिली नाही.
महायुद्ध समाप्तीनंतर ब्रिटिश िहदुस्थानातील प्रजेत स्वातंत्र्यचे वारे वाहू लागले, अधिकारांविषयी जागृती येऊ लागली. त्याच काळात खालसा मुलखात मॉण्टफर्ड सुधारणा अमलात येऊन द्विदल राज्यपद्धती सुरू झाली. संस्थानी प्रजेपेक्षा खालसा संस्थानातल्या प्रजेला त्यामुळे अधिक हक्क प्राप्त झाले आणि संस्थानात असंतोष पसरू लागला. दक्षिण महाराष्ट्रातील १८ संस्थानांचा एक गट तयार करून त्यांचे विलीनीकरण व्हावे आणि या गटाला मॉण्टफर्ड सुधारणा लागू कराव्यात म्हणून ‘दक्षिण संस्थान प्रजा परिषद’ ही चळवळ १९२१ साली स्थापन झाली. दक्षिण संस्थानांपकी भोरव्यतिरिक्त सर्वानी प्रजा परिषदेच्या कार्यकर्त्यांना बऱ्यापकी प्रतिसाद दिला; परंतु भोरचे पंतसचिव शंकररावांनी मात्र ही चळवळ दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. राज्यात सभाबंदी कायदा करून त्यांनी भोरातले परिषदेचे प्रमुख गोपीनाथराव पोतनीस, शेटय़े वगरेंना अटक करून राजबंदी केले. पुढची तीन वष्रे संस्थानात सत्याग्रह, कायदेभंग आणि दडपशाहीचे प्रकार सतत घडत होते. राज्यातल्या वाढत्या असंतोषामुळे झालेल्या त्रस्त मन:स्थितीतच १९२२ मध्ये शंकररावांचे निधन झाले.
> सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com