१७७५ साली हिंदुस्थानातील फ्रेंच वसाहत पाँडिचेरी येथे येऊन दुकान उघडून व्यापार करणारा मायकेल रेमंड आपला व्यवसाय सोडून फ्रेंच सन्यात भरती झाला. पाँडिचेरीत या फ्रेंच सत्तेचा अस्त झाल्यावर मायकेल प्रथम म्हैसूरच्या हैदरअलीच्या लष्करात आणि पुढे हैदराबादच्या निजामाच्या लष्करात दाखल झाला.

दुसरा निजाम अलीखान याच्या फौजेत दाखल झालेल्या मायकेलला युरोपियन धर्तीवर स्थानिक सनिकांची एक पलटण उभारण्याची कल्पना सुचली. या योजनेला निजामाने होकार दिल्यावर मायकेलने प्रथम ५०० सनिकांची तुकडी या पद्धतीने उभी केली. या तुकडीची सनिकी शिस्त आणि कार्यक्षमता पाहून निजामाने मायकेलला प्रोत्साहन दिल्यावर पुढच्या पाच-सहा वर्षांमध्ये १४ हजार सनिकांच्या २० तुकडय़ा त्याने उभ्या केल्या. अतिशय शिस्तबद्ध, प्रशिक्षित, कवायती पलटण म्हणून मायकेलच्या पलटणीचा लौकिक सर्वत्र पसरला. या तुकडय़ांच्या नियंत्रणासाठी मायकेलने १२५ युरोपियन सेनाधिकारी नियुक्त केले. मायकेलच्या मुत्सद्देगिरीची, त्याच्या लष्करी डावपेचांची तत्कालीन फ्रेंच सेनानी ब्युसी, पेटॉन वगरेंनी प्रशंसा केली आहे.  मायकेलनं निजामाच्या फौजेचे नेतृत्व करून अनेक लढायांमध्ये त्याला विजय मिळवून दिले. पण १७९५ च्या खडर्य़ाच्या लढाईत मराठय़ांनी निजामाचा पराभव केल्यावर मात्र निजामाने जनरल मायकेलच्या अधिपत्याखाली राज्याचं पूर्ण शस्त्रागार सोपवलं. तसेच मायकेलनं शस्त्रे आणि दारूगोळ्याच्या निर्मितीसाठी कारखाना काढून तिथं फ्रेंच तंत्रज्ञानानुसार अत्याधुनिक शस्त्रात्रांची धडाक्यात निर्मिती सुरू केली. त्यानं उभारलेल्या तोफांच्या कारखान्यात बनलेल्या तोफांच्या उत्तम गुणवत्तेची नोंद माल्कमसारख्या विख्यात ब्रिटिश सेनानीनंही घेतलेली आहे. हैदराबादच्या ज्या भागात मायकेलनं लोखंडी तोफांच्या ओतकामासाठी कारखाना उघडला होता तो भाग हैद्राबादेत आजही ओळखला जातो तो ‘गनफाउंड्री’ या नावानंच! निजामानं मायकेलला आपल्या लष्कराच्या प्रमुखपदी नियुक्त केलंच, पण त्याबरोबर ‘अमीर जिनसी’ म्हणजे शस्त्रागार आणि दारूगोळानिर्मिती प्रमुख असा वैशिष्टय़पूर्ण किताबही त्याला दिला!

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com