मायकेल रेमंड हा एक धाडसी फ्रेंच तरुण हिंदुस्थानात आला तो पाँडिचेरीत दुकान थाटून व्यापार करण्याच्या इराद्यानं. प्रथम व्यापार सुरू करून पुढे तो फ्रेंच लष्कर, म्हैसूर राज्याचे लष्कर आणि नंतर हैदराबादच्या निजामी लष्करातून एक तज्ज्ञ लष्करी प्रशासक, लष्करी तंत्रज्ञ म्हणून विख्यात झाला. विशेष म्हणजे याच काळात तिकडे फ्रान्समध्ये त्याच्या मायदेशी फ्रेंच राज्यक्रांती (१७८९-९०) ऐन धामधुमीत असताना तसेच नेपोलियनचा उदय होत असताना हा मायकेल रेमंड हैदराबादेत निजामाचे लष्कर अद्ययावत करण्यात गर्क होता!

मायकेलने निजामाच्या लष्कराचा केलेला कायापालट, आधुनिकीकरण यामुळे प्रभावीत झालेल्या निजामाने मायकेलवर ‘अमीर जिनसी’, ‘अझदर जंग’, ‘अझदर उद्दौला’ अशा मोठय़ा खिताबांची खैरात केली! आपल्या छावणीत शाही सलामीनं स्वागत होण्याचा बहुमानही त्याला होता आणि त्याची पलटण ‘कोअर फ्रान्स्का डी रेमंड’ या त्याच्या नावानेच ओळखली जाई. जनरल मायकेल रेमंडचा आब आणि रुबाब निजामाच्या दरबारात चांगलाच वधारला. स्वत निजाम आणि त्याचा निजामशाहीचा वारस सिकंदर जाह (याच्याच नावाने सिकंदराबाद ओळखले जाते) या दोघांचाही मायकेलवर पूर्ण विश्वास होता. इतका विश्वास की सिकंदर जाह शपथ घ्यायची वेळ आली की मायकेलच्या डोक्याची शपथ घेई! एकदा निजामाच्या दुसऱ्या पुत्राने, मीर अली जाहने बापाविरुद्ध बंड पुकारलं. त्याचा बीमोड मायकेलनं उत्तमरीत्या केल्यामुळे निजामानं त्याला सहा लाख पंचाऐंशी हजार रुपयांची वार्षकि आमदनी देणारी मेदक परगण्याची जहागीर बहाल केली.तरीही जनरल मायकेल रेमंडने हैदराबादेतील सामान्य लोकांशी मिळून मिसळून वागत प्रेमाचे अनुबंध जोडले, स्वतचा ख्रिश्चन धर्म त्यागला. त्यामुळे स्थानिक हिंदू जनतेत तो मुसाराम म्हणून तर मुस्लीम समाजात तो मुसा रहिम म्हणून प्यारा होता! परंतु पुढे ब्रिटिशांचे वर्चस्व हैदराबाद संस्थानावर आल्यानंतर वैफल्यग्रस्त होऊन मायकेल रेमंडनं १७९८ साली स्वत:वर गोळी झाडून आपला जीवन प्रवास संपवला!

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com