इ.स. १२७७ ते १४५० या काळात मिलानो परगण्यावर अ‍ॅम्ब्रोसियन गणराज्याचे सरकार होते. मिलान शहराचे ग्रामदैवत सेंट अ‍ॅम्ब्रोसच्या नावावरून या गणराज्याने आपले अ‍ॅम्ब्रोसियन हे नाव घेतले. या काळात विसकोंती या घराण्याचेच नेतृत्व सरकारात होते. १४४७ साली मिलानच्या डय़ूक फिलिपो विसकोंतीचा विनावारस मृत्यू झाल्यावर इ.स. १४५० ते १४९२ या काळात मिलानची सत्ता फ्रान्सिस्को स्पोर्जा याच्याकडे होती. पुढे मिलान, फ्रेंच राजा फ्रान्सिस प्रथम याच्या अमलाखाली इ.स. १५२५ पर्यंत आले. हॅप्सबर्ग घराण्याचा राजा चार्ल्स पंचमने फ्रान्सिसचा पराभव केल्यावर मिलानसहित पूर्ण उत्तर इटली हॅप्सबर्ग घराण्याच्या अमलाखाली आले. या राजांनी शहराच्या विकासाची काही कामे केली; परंतु १६२९-१६३१ या काळात आलेल्या प्लेगच्या भयंकर साथीमुळे लोकसंख्या एक लाख तीस हजारांवरून फक्त साठ हजारांवर आली. १७०० साली हॅप्सबर्ग घराण्याच्या चार्ल्स द्वितीय याच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी झालेल्या लढाईत हॅप्सबर्ग घराण्याच्या ऑस्ट्रियन शाखेकडे मिलानचे प्रभुत्व आले. १७९६ ते १८१५ या काळात मिलान आणि लोम्बार्डी प्रांत नेपोलियनच्या इटालियन साम्राज्यात सामील झाले. व्हिएन्ना काँग्रेसनंतर मिलान आणि लोम्बार्डी परत एकदा ऑस्ट्रियाच्या नियंत्रणाखाली आले. मिलानच्या जनतेला ऑस्ट्रियाच्या सत्तेखाली राहण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी फ्रान्स आणि सार्डीनिया साम्राज्याचे साहाय्य घेऊन ऑस्ट्रियाला लढाईत पराभूत केले. १८६१ साली मिलान आणि लोम्बार्डी प्रांत इटलीच्या साम्राज्यात विलीन झाले. यापाठोपाठ मिलान १८७० साली संयुक्त इटलीच्या प्रजासत्ताकाचा भाग बनले. पुढे बेनिटो मुसोलिनीने ‘ब्लॅक शर्ट’चे फॅसिस्ट आंदोलन सुरू केले. त्याचा प्रमुख तळ मिलानमध्येच होता. १९२२ साली मुसोलिनीने मिलानमधून रोमकडे मोर्चा नेला. दुसऱ्या विश्वयुद्धात दोस्त राष्ट्रांकडून झालेल्या बॉम्बवर्षांवात उत्तर इटलीचे आणि प्रामुख्याने मिलान शहराचे प्रचंड नुकसान झाले.

– सुनीत पोतनीस
sunitpotnis@rediffmail.com

 

 

प्रा. मधुलिका शशिभूषण अग्रवाल

प्रा. मधुलिका अग्रवाल यांचे शिक्षण बनारस िहदू विद्यापीठातून झाले. पीएच.डी.साठी त्यांनी प्रा. ध्रुव राव यांच्याकडे ‘वायू प्रदूषणाचा वनस्पतींवर परिणाम’ या विषयात संशोधन केले. हवा, पाणी व जमीन या विषयांत संशोधन पुढे चालू ठेवून आज त्या भारतातील या विषयातील अग्रगण्य संशोधक मानल्या जातात. जड धातूमुळे शेतीवर आणि अन्नमालिकेवर होणारा परिणाम हाही त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. ओझोन प्रदूषणामुळे गव्हासारख्या धान्यपदार्थाच्या निरनिराळ्या जातींच्या उत्पादनात होणारी घट मापून औद्योगिक क्षेत्राजवळ धान्याच्या कोणत्या जाती लावल्यास नुकसान कमी होईल याचा अंदाज बांधला.

पृथ्वीच्या तापमानात होणारी वाढ विचारात घेऊन डॉ. अग्रवाल यांचे ‘‘अति-नील ‘ब’ किरण आणि वाढीव कार्बनडाय ऑक्साइड यांचा महत्त्वाच्या धान्यांच्या निरनिराळ्या जातींवर होणारा परिणाम’’ या विषयातील संशोधन महत्त्वाचे ठरले असून त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल घेतली गेली आहे.

अमेरिकेतील फुलब्राइट फेलोशिप मिळाल्यावर डॉ. अग्रवाल यांनी मेरिलंडमधील बेलटविल अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च सेंटरमध्ये संशोधन केले. इंग्लंडमध्ये लंकास्तर येथे रॉयल सोसायटी – इंडियन नॅशनल सायन्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना फेलोशिप मिळाली. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले आहेत. युनेस्को-रोस्तास्का यांचा यंग सायन्टिस्ट  पुरस्कार, इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा प्रा. हिरालाल चक्रवर्ती पुरस्कार, विद्यापीठ अनुदान आयोगाचा पर्यावरणातील संशोधनासाठी देण्यात येणारा स्वामी प्रणवानंद सरस्वती राष्ट्रीय पुरस्कार इत्यादी. त्या नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसच्या आणि नॅशनल अकादमी ऑफ अ‍ॅग्रिकल्चरल सायन्सेसच्या सदस्य आहेत.

डॉ. अग्रवाल यांनी पर्यावरण मंत्रालय, यू.जी.सी., डी.एस.टी., सी.एस.आय.आर. (सर्व दिल्लीतील) आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट विभाग, यू.के. स्टोकहोम एन्व्हायर्नमेंट इन्स्टिटय़ूट, यॉर्क, यू.के. रिसर्च कौन्सिल, नॉर्वे, यांनी पुरस्कृत केलेल्या प्रकल्पांवर संशोधन केले आहे. त्यांनी २६ विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केलेले असून, सध्या दहा-एक विद्यार्थी काम करीत आहेत.

२२० शोधनिबंध, २ पुस्तके (त्यातील एक लेविस पब्लिकेशन, यू.एस.ए.) त्यांच्या नावावर असून, ‘यूएनईपी’च्या एशियन  ब्राऊन क्लाऊड या प्रकल्पात त्यांनी भाग घेतला होता.

– प्रा. शरद चाफेकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई<br /> office@mavipamumbai.org