रोम ही इटालीची राजधानी असली तरी देशाची अर्थकारणाची सर्व सूत्रे मिलान आणि बाकी लोम्बार्डी प्रांताच्या हातात आहेत. इटालीतील एकूण अर्थव्यवहारांपकी पंधरा टक्क्यांहून अधिक व्यवहार मिलानमध्ये होतात. फॅशनची जागतिक राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या मिलान शहरात फॅशनची वस्त्रे, पादत्राणे, जडजवाहर आणि इतर वस्तू बनविणारे एकूण १२ हजार मोठे उत्पादक असून त्यांची ६ हजार भव्य विक्री केंद्रे आहेत. मिलानच्या अर्थव्यवस्थेत अल्फा आणि पिरेली या वाहन उत्पादकांचा मोठा वाटा आहे. याशिवाय मिलानमध्ये केमिकल, औषधे, यंत्रे, प्लॅस्टिकचेही मोठे उद्योग आहेत. विविध आरोग्यविज्ञान आणि औषधे या क्षेत्रांमधील प्रसिद्ध संशोधन संस्था आणि औषध उत्पादन हा मिलानमधील एक महत्त्वाचा उद्योग आहे. त्याचप्रमाणे येथील रसायन उद्योग आणि अभियांत्रिकी उद्योगही युरोपातील महत्त्वाचे उद्योग समजले जातात. उद्योग-धंदे वाढल्यावर मिलानमध्ये त्यांना अर्थसाहाय्य करणाऱ्या १९८ बँक आणि इतर संस्थांचे जाळेच तयार झालेय. या १९८ संस्थांपकी परदेशी बँकांची संख्या ४० आहे! मिलान हे एक जागतिक महत्त्वाचे वाहन उत्पादक शहर आहे. त्यापकी ‘पिरेली अँड कंपनी’ या जगातल्या नामवंत टायर उत्पादक कंपनीच्या जागतिक बाजारपेठेत १६० शाखा आहेत. ‘फियाट’ मोटारगाडय़ांचे उत्पादक ‘अल्फा रोमिओ’ या कंपनीची शाखा मिलानमध्येच आहे. १९९६ साली स्थापन झालेली ही कंपनी लहान मोटर गाडय़ांशिवाय ट्रक, मिलिटरीसाठी वाहने, जीप, बसेस, रेल्वेचे डबे, ट्रम, विमानाची आणि बोटींची इंजिने इत्यादी उत्पादनातही विख्यात आहे. या उत्पादनांशिवाय मिलान तिथल्या फíनचर व्यवसायासाठीही प्रसिद्ध आहे. वर्षांतून दोन वेळा येथे ‘मिलान फíनचर वीक’ साजरा केला जातो. जगभरातून यासाठी येथे फíनचर खरेदीदारांची हजेरी लागते.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

मेंदीच्या पानावर..

सणा-समारंभात महत्त्वाचे स्थान मिळवलेली मेंदी, अगदी सगळ्यांनाच परिचित असलेली ही वनस्पती. हात किंवा केस रंगवायला वापरण्यात येणारी मेंदीची पावडर ही मेंदीच्या पानांपासून बनविली जाते. मेंदीचे झाड मुळचे आफ्रिकेतले असले तरी ऑस्ट्रेलिया, युरोप, कॅनडा, पाकिस्तान, इजिप्तपासून आखाती देशापर्यंत प्रसिद्ध आहे. वाळवंटी प्रदेशातले हे झाड भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या भागांत आढळते. मेंदीची रोपे बियांपासून तसेच छाट कलमांद्वारेही तयार करतात. ती कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकतात. वाळवंटी प्रदेशातले हे झाड असले तरी ते समुद्रकिनारीही छान वाढते. कोरडय़ा, उष्ण किंवा थंड हवामानातही तग धरू शकते. मुळे बऱ्यापकी खोलवर जात असल्यामुळे पूर्ण वाढलेल्या झाडाला पाणीही फारसे घालावे लागत नाही.

शास्त्रीयदृष्टय़ा मेंदीचा समावेश लिथ्रेसी कुळामध्ये होतो. ‘लॉसोनिया अल्बा’ आणि ‘लॉसोनिया इनरमिस’ Lawsonia inermis ही मेंदीची शास्त्रीय नावे आहेत. मेंदीची झाडे काटेरी असतात आणि गुरे या झाडाची पाने खात नाहीत असे म्हणतात, त्यासाठी ही कुंपणासाठी लावतात. मेंदीची झुडपे दीड ते तीन मीटर उंच वाढतात. पाने साधी समोरासमोर असतात. मेंदीला पांढऱ्या रंगाची सुवासिक फुले येतात.

मेंदीचा वापर सौंदर्यप्रसाधनाबरोबरच वस्त्रोद्योगात कापड रंगविण्यासाठीही करतात. पिवळा, तांबडा, पगट, शेंदरी असे रंग विविध पदार्थाच्या मिश्रणाने तयार करून वापरले जातात. पानांमध्ये ‘लॉसोन’ हे रसायन असते ज्याला ‘हेन्नोटॅनिक आम्ल’ असेही म्हणतात. हेन्नोटॅनिक आम्लामुळे त्वचेला किंवा केसांना रंग येतो.

पानातील सेल्युलोजमधून रंगद्रव्ये विरघळून पसरण्यासाठी काही अवधी लागतो. त्यासाठी त्वचा चांगली रंगण्यासाठी मेंदीचा लेप ६ ते १२ तास व्यवस्थित राहणे आवश्यक असते. लॉसोनची प्रथिनांबरोबर रासायनिक अभिक्रिया घडून येते. त्यामुळे प्रथिने असणारे पदार्थ मेंदीमुळे चांगले व पक्के रंगतात. मानवी त्वचा, नखे आणि केसांमध्ये केराटिन नावाचे प्रथिन असते. याशिवाय चामडय़ाच्या वस्तू, रेशीम आणि लोकर रंगवण्यासाठीही मेंदीचा वापर होतो. आम्लाबरोबर मेंदीचा रंग आणखी गडद होतो म्हणूनच मेंदीचा वापर करताना लिंबू रस, चहा यांचा वापर केला जातो.

– अनघा वक्टे (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

 office@mavipamumbai.org