29 February 2020

News Flash

कुतूहल : मिलानकोविचचे हिमयुग

मिलानकोविचने हे आपले संशोधन प्राथमिक गणितांच्या स्वरूपात १९२१ साली प्रसिद्ध केले.

दर काही हजार वर्षांनंतर पृथ्वीवरचे हवामान अतिशय थंड होऊन उत्तर गोलार्धातील मोठा भाग बर्फाखाली झाकला जातो. ठरावीक काळानंतर येणाऱ्या या ‘हिमयुगा’मागची कारणे शोधण्याचे श्रेय सर्बियाचा संशोधक मिलुतिन मिलानकोविच (१८७९- १९५८) याच्याकडे जाते. ही हिमयुगे म्हणजे पृथ्वीच्या सूर्याभोवती व स्वतभोवती फिरताना होणाऱ्या विविध चक्रीय बदलांचा एकत्रित परिणाम आहे. या विविध बदलांमुळे पृथ्वीवर पोहोचणाऱ्या सूर्याच्या उष्णतेचे प्रमाण काही काळासाठी लक्षणीयरीत्या कमी होत असल्याने हिमयुगे घडून येत असल्याचे, मिलानकोविचने गणितांद्वारे दाखवून दिले.

पृथ्वीच्या सूर्यप्रदक्षिणेच्या संदर्भातला एक चक्रीय बदल म्हणजे पृथ्वीची विवृत्तता (लंबवर्तुळाकारपणा) एक लाख वर्षांच्या चक्रानुसार कमी-जास्त होते. जेव्हा ही विवृत्तता वाढत जाते, तेव्हा सूर्यप्रदक्षिणेदरम्यान पृथ्वीचे सूर्यापासूनचे कमाल अंतर वाढत जाऊन हिवाळा तीव्र होऊ लागतो. दुसरा चक्रीय बदल म्हणजे पृथ्वीच्या अक्षाच्या कोनातील बदल. पृथ्वीचा अक्ष हा आज जरी २३.५ अंशांनी कललेला असला, तरी हा कोन ४१,००० वर्षांच्या चक्रानुसार सतत बदलत असतो. हा कोन जसा वाढत जातो, तसा हिवाळा अधिक तीव्र होत जातो. तिसरा बदल म्हणजे खुद्द या अक्षाचे भोवऱ्यासारखे फिरणे (परांचन गती). यामुळे अक्षाच्या दिशेत सतत बदल होत असतो. या बदलाचे सुमारे २६ हजार वर्षांचे चक्र आहे. पृथ्वीचा अक्ष कुठल्या दिशेला रोखला आहे, यावरून एखाद्या गोलार्धात हिवाळा केव्हा असणार हे ठरते. जर हा हिवाळ्याचा काळ पृथ्वी सूर्यापासून जास्तीतजास्त दूर असताना आणि तिचा अक्ष जास्तीतजास्त कललेला असताना आला, तर येणारा हिवाळा अत्यंत तीव्र असतो. हिमयुगाची कारणे हीच आहेत!

मिलानकोविचने हे आपले संशोधन प्राथमिक गणितांच्या स्वरूपात १९२१ साली प्रसिद्ध केले. त्यानंतर तपशीलवार अभ्यास करून १९४१ साली आपला हा गणिती सिद्धांत, सुमारे सव्वासहाशे पृष्ठांच्या ग्रंथाच्या स्वरूपात ‘सर्बियन रॉयल अ‍ॅकॅडमी’ला सादर केला. या संशोधनात त्याने दीर्घ कालावधीसाठी केलेल्या गणिताद्वारे विविध चक्रीय बदलांची पृथ्वीवरील तापमानाशी सांगड घातली. मिलानकोविचच्या या सिद्धांतावर सुरुवातीला मोठय़ा प्रमाणात टीका झाली. परंतु मिलानकोविचच्या मृत्यूनंतर, १९७० च्या दशकात सागरतळाशी केल्या गेलेल्या उत्खननात हिमयुगे होऊन गेल्याचे कालानुरूप पुरावे सापडले आणि मिलानकोविचचा हा सिद्धांत स्वीकारार्ह ठरला.

मृणालिनी नायक

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  

office@mavipamumbai.org

First Published on July 12, 2019 2:12 am

Web Title: milankovitch cycles and glaciation zws 70
Next Stories
1 मेंदूशी मैत्री : न्यूरोप्लास्टिसिटी
2 मेंदूशी मैत्री : अल्कोहोल : मेंदूपासून शरीरापर्यंत परिणाम
3 कुतूहल : दूरदूरची अंतरे
X
Just Now!
X