मिर्झा असदुल्लाह बेग ऊर्फ मिर्झा गाम्लिब दिल्लीत स्थायिक होऊन अखेरचा मोगल बादशाह बहादूरशाह जफरकडे नोकरीस राहिला. बहादूरशाह स्वत: कवी होता. गाम्लिबची नियुक्ती मोगल दरबारात शाही इतिहासकार म्हणून झाली, पण त्याशिवाय तो बादशाहाचा काव्य शिक्षक म्हणूनही काम करीत असे. पुढे मोगलशाही संपून ब्रिटिश अंमल आल्यावर त्याचे उत्पन्न बंद झाले, मित्रांच्या मदतीवरच अवलंबून राहिल्याने १८६९ साली त्याचा मृत्यू होईपर्यंत गाम्लिबचे आयुष्य निर्धन, दारिद्रय़ावस्थेतच संपले.

गाम्लिब हा नृत्यगायनादी कलांचा शौकीन, मदिरा-मदिराक्षीची आसक्ती बाळगणारा पण त्याचबरोबर ईश्वराच्या नावावर चाललेल्या कर्मकांडांना कडक विरोध करणारा क्रांतिकारक ईश्वरभक्त होता. त्याच्या अनेक रचनांमधून त्याने जीवनाबाबत गंभीर दृष्टिकोन मांडला. कदाचित प्राचीन सूफी काव्याच्या व्यासंगामुळे धर्मरूढीपेक्षा वेगळा विचार करण्याची वृत्ती त्यात निर्माण झाली असावी. त्याने फारसी भाषेत शेकडो उत्तमोत्तम रचना केल्या. ‘कुल्लियात-इ-गाम्लिब’, ‘चिराग-ए-दैर’ हे त्याचे फारसी काव्यसंग्रह आणि ‘कल्लियात-इ-नस्र’, ‘दस्तंबू’, ‘पंज-गंज-ह-आहंग’ हे फारसी ग्रंथ, तर ‘दीवान-ए-गाम्लिब’ हा उर्दू काव्यसंग्रह आणि ‘उद्-द-हिंदी’, ‘उर्दू-द-मुंअल्ला’ हे उर्दू गद्यग्रंथ प्रसिद्ध आहेत. गाम्लिबने सुमारे अठरा हजार शेर उर्दूत रचले, परंतु त्या सर्वाचे लिखाण उपलब्ध नाही. त्याच्या मित्रांच्या आग्रहामुळे त्याने केवळ हजार बाराशे शेर सोप्या उर्दूत लिहून काढले त्यामुळे गाम्लिबची कीर्ती केवळ या बाराशे शेरांमुळे आहे. त्याने स्वतच्या शायरीबद्दल लिहिले आहे-

हैं और भी दुनिया में सुखन्वर बहुत अच्छे,

कहते हैं, कि गाम्लिब का है अंदाजे बयाँ और!

(दुनियेत अनेक नामांकित शायर आहेत, पण म्हणतात की गाम्लिबची शान काही औरच!) दिल्लीत गाम्लिब चांदनी चौकात जिथे राहत होता तिथे आता ‘गाम्लिब मेमोरियल’ हे छोटेसे वस्तुसंग्रहालय केलेले आहे.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com