News Flash

मोस्क्वाकाठचे मॉस्को

पश्चिम रशियन प्रदेशातील, युरोपखंडात अंतर्भाव असल्याने मॉस्को हे जगातल्या अतिशीत शहरांपकीही आहे.

मोस्क्वा नदीच्या दुतर्फा वसलेले मोस्कोवा अर्थात मॉस्को शहर सध्याच्या रशियन फेडरेशनचे राजधानीचे शहर आहे. प्राचीन रशियन झार साम्राज्य आणि पुढे सोविएत युनियनचे राजधानीचे शहर बनलेल्या या शहराचा इतिहास  त्याही आधीपासूनचा आहे. बृहन् मॉस्को आणि उपनगरीय एकत्रित लोकसंख्या एक कोटी सत्तर लाख असलेले मॉस्को, जगातील अतिविशाल शहरांपकी एक समजले जाते. पश्चिम रशियन प्रदेशातील, युरोपखंडात अंतर्भाव असल्याने मॉस्को हे जगातल्या अतिशीत शहरांपकीही आहे. विसाव्या शतकात जागतिक राजकारणावर मोठा प्रभाव पाडणाऱ्या मॉस्को आणि परिसरातले लोक युरोपियन स्लाव्ह वंशाचे आहेत. इ.स.पूर्व सातव्या शतकात रशियन प्रदेशात सिथियन लोकांनी वस्ती केली तर इ.स. पूर्व चौथ्या शतकात साम्रेशियन लोकांनी त्यांच्यावर दबाव आणून वर्चस्व केले. साम्रेशियन लोकांमध्ये असलेल्या रूखस-एॅस या जमातीच्या नावावरून रोस किंवा रूस हे नाव प्रचलित झाले. या प्रदेशावर झालेल्या सत्तांतरांमध्ये प्रथम गोथ, हूण, तातार या जमातींच्या टोळ्यांनी राज्य केल्यावर सातव्या आठव्या शतकात येथे स्वीडन आणि नॉर्वेच्या व्हायकिंग्जनी आपला अंमल बसवला. हे लोकही स्वतला रूस  म्हणवून घेऊ लागले. त्यांनी प्रथम नोव्हाग्राड येथे राज्य स्थापून पुढे कीव्ह येथील राज्यावर आपला ताबा बसवला. ११६९ साली अँद्रे बोगोलब्स्की या राजाने व्लादिमीर या सध्याच्या मॉस्को जवळच्या ठिकाणी आपली राजधानी केली. यांच्यातील ब्लादिमीर प्रथम याने ९८८ साली इस्टर्न ऑर्थोडॉक्स हा ख्रिस्ती धर्मपंथ स्विकारला. पुढचा काही काळ तातार मंगोलियन लोकांनी कीव्ह राज्यभर धुमाकूळ घालून बाटूखान याच्या नेतृत्वाखाली व्लादिमीर, नोव्हाग्राड आणि कीव्ह राज्ये आपल्या नियंत्रणाखाली मांडलीक बनवली. १२४० साली मॉस्को रशियन संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदय पावले. इ.स. १२८३ मध्ये मॉस्कोचे स्वतंत्र राज्य स्थापन होऊन डॅनील अलेक्झँड्रोवीच हा रशियाचा पहिला राजा झाला. पुढे १३१९ साली त्या घराण्यातल्या युरी याने मंगोल खानाच्या बहिणीशी लग्न करून मंगोलियन खानांची मॉस्कोचा राजा म्हणून मान्यता मिळवली.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

रक्तचंदन

आंध्र प्रदेशातील कडप्पा व तामिळनाडूतील चिंगलपेट इथला प्रदेश ही रक्तचंदनाची मूळ स्थाने. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव टेरोकार्पस संटालीनस (Pterocarpus santalinus) असे आहे. १५० ते ९०० मी. उंचीच्या खडकाळ जमिनीत वाढणारा हा एक ८ मी.पर्यंत उंचीचा, ५०-१५० मि.मी. व्यास असणारा मध्यम आकाराचा पानगळीचा वृक्ष आहे. पान संयुक्त असून ३.८ ७ ७.६ सें.मी. आकाराच्या ३ पर्णिकांचे असते. खोडावर सुसरीच्या पाठीसारखे दिसणारे खवले असतात. जखम झाल्यास खोडातून लाल रंगाचा चीक गळतो. हिवाळ्यात पानगळ होऊन एप्रिलमध्ये नवीन पालवी येते. पालवीच्या पाठोपाठ झाड पिवळ्या रंगाच्या, साधारण १ सें.मी. आकाराच्या फुलांनी बहरून येते. नंतर फलधारणा होऊन गोलाकार, सुमारे ३.८ सें.मी. व्यासाची चपटी फळे धरतात. ही फळे पुढच्या फेब्रुवारी-मार्चपर्यंत पिकून मेमध्ये येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्याबरोबर दूपर्यंत पोहोचवली जातात. बिया रुजून आलेली कोवळी रोपे हे सांबर, हरणं यांचे आवडते खाद्य आहे.

रक्तचंदनाचे गाभ्याचे लाकूड हे लाखमोलाचे समजले जाते. या लाकडापासून बनविलेल्या संगीत वाद्यातून उत्तम नाद निघतो. तसेच कोरीवकाम केलेल्या मूर्ती, उत्कृष्ट किमती फíनचर इ. बनविण्यासाठी त्याचा उपयोग होतो. लाकूड लालसर काळे असून त्यात सेंटालीन नावाचे रंगद्रव्य असते. भारतात साधारणपणे रुपये ५०० प्रति किलोने मिळणारे हे लाकूड आंतरराष्ट्रीय बाजारात, मुख्यत: चीन, जपानसारख्या देशांत त्याच्या प्रतीनुसार रु. ३००० ते १२००० प्रतिकिलो  इतक्या किमतीला विकले जाते. साहजिकच, चंदनाप्रमाणे यांच्या अर्निबध व अवैध तोडीमुळे, तसेच  यांचे नसíगक पुनरुत्पादनही अतिशय कमी प्रमाणात होत असल्यामुळे हा वृक्ष दुर्मीळ या प्रकारात गणला गेला आहे.

चीनमध्ये आणि भारतात रक्तचंदनाचा उपयोग रोगप्रतिकारक औषध म्हणूनही केला जातो. अमेरिका व युरोपात ते अन्नरंग व कर्करोगावर तसेच सोलर पेनल बनविण्यासाठी उपयोगात येते. आयुर्वेदातही तापनाशक, जळजळ कमी करणारे, कृमिघ्न व शक्तिवर्धक म्हणून वापरले जाते. एक विशेष बाब म्हणजे शास्त्रज्ञांना ह्य़ाच्या लाकडात थोरिअम व युरेनियम या किरणोत्सारी धातूंचे सूक्ष्म प्रमाणात अस्तित्व आढळले आहे. मात्र काहींच्या मते कुठल्याही आण्विक प्रक्रियेसाठी ते उपयुक्त नाही; पण या धातूंचे तिथल्या जमिनीतील अस्तित्व दर्शविण्यासाठी ते उपयोगी ठरू शकते.

डॉ. विद्याधर ओगले (मुंबई)

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२

 office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 3:15 am

Web Title: moscow city
Next Stories
1 बिब्लीओथिका अलेक्झांड्रिना
2 डॉ. आनंद दिनकर कर्वे
3 गवताळ प्रदेश
Just Now!
X