हेमंत लागवणकर

पृथ्वीवर नैसर्गिकरीत्या आढळणारं सगळ्यात दुर्मीळ मूलद्रव्य कोणतं, असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर ‘अ‍ॅस्टेटाइन’ हे आहे. भूकवचामध्ये एक ग्रॅमपेक्षाही कमी प्रमाणात अ‍ॅस्टेटाइन उपलब्ध असतं. एवढय़ा कमी प्रमाणात उपलब्धता असण्यामागचं कारण म्हणजे थोरिअम आणि युरेनिअम या किरणोत्सारी मूलद्रव्यांचा ऱ्हास होऊन अ‍ॅस्टेटाइन तयार होतं. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, नसíगकरीत्या दुर्मीळ असलेलं हे मूलद्रव्य कृत्रिम पद्धतीने प्रयोगशाळेमध्ये मिळवता येतं का? अर्थातच, शास्त्रज्ञांनी असे प्रयत्न केले. पण काही मायक्रोग्रॅम इतक्या सूक्ष्म प्रमाणात अ‍ॅस्टेटाइन तयार करण्यापलीकडे त्यांना यश आलेलं नाही. अ‍ॅस्टेटाइन हे मूलद्रव्य अत्यंत तीव्र किरणोत्सारी असल्याने तसेच त्याच्यामधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेमुळे सूक्ष्म प्रमाणात तयार झालेल्या अ‍ॅस्टेटाइनचा ऱ्हास होतो. या अस्थर्यामुळेच मूलद्रव्य स्वरूपात असलेलं अ‍ॅस्टेटाइन अजून कोणालाही पाहता आलेलं नाही.

अ‍ॅस्टेटाइनची तब्बल वीस समस्थानिकं असून ही सगळी किरणोत्सारी आहेत. या सगळ्याच समस्थानिकांचा अर्धायुष्य काल खूपच कमी आहे. पण, अ‍ॅस्टेटाइन-२०९, अ‍ॅस्टेटाइन-२१० आणि अ‍ॅस्टेटाइन-२११ या तीन समस्थानिकांचा अर्धायुष्य काल हा काहीसा जास्त म्हणजे साडेपाच तास ते आठ तास इतका आहे. याचा अर्थ, साडेपाच ते आठ तासांनी या समस्थानिकांचा ऱ्हास झाल्यामुळे मूळ प्रमाणाच्या निम्म्या प्रमाणात ही समस्थानिकं शिल्लक राहिल्याचं आढळतं.

अत्यंत अस्थिर असल्याने क्षणभंगुर असलेल्या या मूलद्रव्याचा प्रत्यक्ष अभ्यास करणं शास्त्रज्ञांना शक्य झालेलं नाही. ‘अत्यंत अस्थिर’ आणि ‘किरणोत्सारी’ या दोन गुणधर्माखेरीज अ‍ॅस्टेटाइनचे इतर गुणधर्म काय असावेत याचे केवळ तर्क (अ‍ॅस्टेटाइनच्या आवर्तसारणीतल्या स्थानावरून) शास्त्रज्ञांनी मांडले आहेत.

आवर्तसारणीमध्ये फ्लोरिन, क्लोरिन, ब्रोमिन आणि आयोडिन यांच्या खाली हॅलोजन गटात अणुक्रमांक ८५ असलेल्या अ‍ॅस्टेटाइनचं स्थान आहे. मूलद्रव्य स्वरूपातील अ‍ॅस्टेटाइन गडद रंगाचं आणि आयोडिनप्रमाणे चकाकी असलेलं असावं, असा तर्क आहे. तसंच त्याचा उत्कलनिबदू आयोडिनच्या उत्कलनिबदूपेक्षा जास्त असावा. अ‍ॅस्टेटाइन हे काही प्रमाणात धातूचे गुणधर्म दाखवत असलं तरी त्यात अर्धवाहकाचे गुणधर्म असावेत, असं शास्त्रज्ञांना वाटतं.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org