सुनीत पोतनीस

आपलं कुटुंब, आपला देश सोडून दूर भारतासारख्या देशात केवळ १९ व्या वर्षी नन (संन्यासिनी) बनून ख्रिश्चन मिशनरी कार्यासाठी आलेल्या आणि आयुष्यभर सेवेचं व्रत स्वीकारणाऱ्या मदर तेरेसा या मूळच्या अल्बेनियाच्या. पुढे त्यांच्या या सेवाभावी संस्थेच्या एकूण १३३ देशांमध्ये शाखांचे जाळे निर्माण झाले आहे. या मानवतावादी कार्याबद्दल त्यांना नोबेल शांतता पुरस्कार, ‘भारतरत्न’ आणि रोमन कॅथलिक ख्रिस्ती धर्माचे ‘संत’पदही देण्यात आलं. मदर तेरेसांना त्यांच्या आयुष्यभरातील सेवाभावी कार्याबद्दल देश-विदेशातून जसं गौरविण्यात आलं तसंच अनेक बाबतींत त्यांच्या हयातीत आणि मृत्यूनंतरही त्यांच्या कार्यावर अनेक आक्षेप घेण्यात आले. असं असूनही स्वत:चं सर्वस्व इतरांच्या सेवेसाठी झोकून देण्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मदर तेरेसा अशी त्यांची प्रतिमा कोटय़वधी भारतीयांच्या हृदयात आहे.

मिशनरी कार्यासाठी तेरेसा हे नाव घेतलेल्या अग्नेस गोंकशे बोझशिपु यांचा जन्म १९१० सालचा. अल्बेनियामधला. स्कोपजे या खेडय़ातला. निकोल आणि पत्नी द्रानाफिल यांचे हे सर्वात कनिष्ठ अपत्य. लहानपणापासून बंगालमधील ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या कार्याबद्दल ऐकून असलेल्या अग्नेसच्या मनात सेवाभाव रुजू लागला होता. वयाच्या बाराव्या वर्षांपासून तिचा मिशनरी कार्याकडचा कल आई-वडिलांना जाणवू लागला आणि तिने वयाच्या अठराव्या वर्षी घर सोडले आणि आर्यलडमधील ‘सिस्टर्स ऑफ लॅरेटो’ या संन्यासिनी समूहात नन म्हणून दाखल झाल्या. त्यानंतर त्या आपल्या घरी, कुटुंबात कधी परत गेल्या नाहीत. या संस्थेत इंग्रजी भाषा आत्मसात करून, मिशनरी कार्य आणि ख्रिस्ती धर्माची अधिक जाणकारी घेतल्यानंतर मिशनरी कार्यासाठी त्यांनी सिस्टर मेरी तेरेसा हे नाव घेतले. पुढे १९२९ साली त्यांच्या इच्छेप्रमाणे सिस्टर तेरेसांना भारतात दार्जिलिंग येथे पाठविण्यात आले. दोन वर्षे त्यांनी दार्जिलिंगमधील कॉन्व्हेंट शाळेत शिक्षिका म्हणून काम केले. या काळात त्या बंगाली आणि हिंदी भाषा शिकल्या आणि भारतातल्या एकूण समाजजीवनाची माहितीही त्यांनी करून घेतली.

sunitpotnis@rediffmail.com