News Flash

मदर तेरेसांच्या कार्याची व्याप्ती

औषधांच्या दुकानात जाऊन औषधदान मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असत.

अवघ्या एकोणिसाव्या वर्षी एक मिशनरी संन्यासिनी (नन) म्हणून कलकत्त्यात आलेल्या मदर तेरेसा यांनी १९४८ च्या अखेरीस आपली वेगळी मिशनरी सेवाभावी संस्था ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ सुरू करून मोतिझील या वस्तीत एका झाडाखाली शाळा सुरू केली. एका महिनाभरात त्यांना मिळालेल्या देणग्यांमधून दोन खोल्या भाडय़ाने घेऊन त्यांनी तिथे शाळा सुरू केली. वर्षभराने, १९४९ मध्ये कलकत्त्याच्या दुसऱ्या दुर्बल वस्तीतही त्यांनी सुरू केलेल्या शाळेला जोडून मोफत औषधालयही सुरू केलं. कॉलरा, धनुर्वात, मेंदुज्वरासारख्या अनेक आजारांनी पीडित असलेल्या या वस्त्यांमधल्या लोकांसाठी औषधे गोळा करण्यासाठी मदर तेरेसा रोज काही तास कलकत्त्याच्या औषधांच्या दुकानात जाऊन औषधदान मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असत.

त्यांच्या कार्याची व्याप्ती पुढे वाढत जाऊन देश-विदेशांतील अनेक सेवाभावी संस्था, ट्रस्ट, धनवान व्यक्तींनी मदरच्या या समाजकल्याण कार्याला भरघोस अर्थसाहाय्य देऊन मदत केली. सामान्य आजारांप्रमाणेच कुष्ठरोग, क्षयरोग, एड्स पीडितांसाठीही मदरनी अनेक ठिकाणी ‘सेवागृहे’ चालू केली. मदरच्या हयातीत भारतात आणि परदेशात, एकूण १३३ देशांमध्ये अशी ७५५ सेवाकेंद्रे त्यांच्या मिशनतर्फे कार्यरत होती, या आधारकेंद्रांमधून २० हजार मुलांना मोफत शिक्षण, तीन लक्ष आजारी लोकांवर मोफत उपचार दिले जात. १९९७ साली वयाच्या ८८ व्या वर्षी मदर तेरेसांचं कलकत्त्यात निधन झालं. भारत सरकारने मदर तेरेसांच्या सेवाभावी कामाबद्दल त्यांना १९६२ मध्ये पद्मश्री आणि १९८० साली भारतरत्न हे पुरस्कार देऊन गौरव केला. १९७९ मध्ये शांततेसाठी देण्यात येणारा नोबेल पुरस्कार मदरना देण्यात आला. त्यांच्या प्रेरणेने भारतातील आणि परदेशातील अनेक तरुण सेवाभावी स्वयंसेवकांनी भारतातील मदरच्या कार्याला वाहून घेऊन आजीवन लोकसेवा करण्याचा संकल्प केला. १९८२ साली इस्रायल आणि पॅलेस्टाइनच्या युद्धात इस्रायली सनिकांचा बॅट येथे वेढा पडला असता धाडसी मदर तेरेसांनी तिथून ३७ मुलांची सुटका केली, त्या स्वत: युद्धभूमीवरही परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी हिंडल्या. आपल्या आयुष्यातील ६८ वर्षांच्या सेवाभावी कार्यकाळात मदर तेरेसांनी पाचही खंडातील सव्वाशे देशांत आपल्या कामाची व्याप्ती वाढवली.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 12:27 am

Web Title: mother teresa
Next Stories
1 कुतूहल : अणुयुग
2 जे आले ते रमले.. : मदर तेरेसांचे कार्य (२)
3 जे आले ते रमले.. : मदर तेरेसा (१)
Just Now!
X