19 September 2020

News Flash

गतिमान गेम्स : डोपामाइन

याचं एक कारण म्हणजे मुलांना इतर गोष्टींचा कंटाळा आलेला असतो.

मोबाइल किंवा कम्प्युटरवर गेम खेळण्यात मुलांचा भरपूर वेळ जातो आणि हा सगळा वेळ वाया गेलेल्या वेळातच धरायला हवा. इतर मित्रमत्रिणींचं किंवा काही वेळा आई-बाबांचं बघूनही मुलं गेम्स खेळायला प्रवृत्त होतात. आणि एकदा हातात आलेले हे गेम्स मग सुटता सुटत नाहीत.

याचं एक कारण म्हणजे मुलांना इतर गोष्टींचा कंटाळा आलेला असतो. मुलं एरवी अभ्यास करतात. हा अभ्यास म्हणजे मेंदूतल्या मुख्यत: डाव्या गोलार्धाला जास्त काम असतं. आणि गेम खेळण्यातून उजव्या गोलार्धाला उद्दीपन मिळतं. या गेममध्ये अतिशय वेगवान हालचाली असतात, खिळवून ठेवणारी आकर्षक रंगसंगती असते. सोबत मुलांना आवडेल असं संगीत असतं. या सगळ्या गोष्टी मुलांना गेममध्ये गुंतवून ठेवतात. काळ्या-पांढऱ्या रंगांची पुस्तकं आणि आवडत्या- न आवडत्या विषयाचा अभ्यास करणं एकीकडे, तर दुसरीकडे ही रंगेबिरंगी, वेगवान दुनिया! म्हणून मुलं गेम्स सोडून अभ्यासाला बसण्याची टाळाटाळ करतात. मोबाइल काढून घेतला तर चिडतात. त्रागा करतात.

दुसरं असं की, गेममध्ये जिंकण्याच्या प्रत्येक वेळी आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन या नावाचं रसायन तयार होत असतं. या रसायनाचं मुख्य काम मेंदूला आनंदी जाणिवा करून देणं हे असतं. हेच डोपामाइन सोशल मीडियावर लाइक मिळाल्यानेही निर्माण होत असतं. आपल्याला पुन्हा पुन्हा खेळण्यासाठी उद्युक्त करत असतं. गेममध्ये जिंकलं, की जसजशी जिंकण्याची लेव्हल वर जाते तसतसं जास्त आनंद होत असतो. पुढची प्रत्येक लेव्हल जिंकावीशी वाटू लागते. यामुळेच हातातून गॅजेट्स सुटत नाहीत. गेम्सचीदेखील लहानांप्रमाणे मोठय़ांनाही भुरळ पडलेली आहे. माणसं कित्येक तास खिळून राहतात, वेळाकाळाचं भान राहत नाही.

मुलं आधी ‘पाच मिनिटं खेळू दे की’ ही विनंती करतात. पण खेळ अध्र्या तासावरून दोन तासांवर कधी जातो, हे कळतही नाही. यानंतरचा टप्पा म्हणजे काही वर्षांनी ‘मला माझा मोबाइल हवाय’. आणि त्यानंतरचा टप्पा म्हणजे ‘मोबाइलवर टाइमपास करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ इथपर्यंत जातो. म्हणून लहान मुलं जेव्हा ‘आई मला (बाहेर) खेळायला जायचंय, जाऊ दे ना गं,’ अशी आर्जवं करतात. तेव्हा पाठवलं पाहिजे. त्याऐवजी मोबाइलवर खेळायला न देणं इष्ट!

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 2:19 am

Web Title: moving games dopamine
Next Stories
1 युक्लिडचा ‘एलिमेंट्स’
2 लाइक्स आणि डोपामाइन!
3 युक्लिडची सिद्धता
Just Now!
X