News Flash

कुतूहल : मोगलकालीन मोजमापे 

अकबराच्या काळात एका दामाचे वजन जवळपास २१ ग्रॅम इतके होते.

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ‘हस्त’ (४५७.२ मिमी) हे माप लांबी मोजण्यासाठी वापरत.

ख्रिस्ती सनाच्या पंधराव्या शतकात भारतात शेरशहा आणि अकबर या राजांनी आपापल्या कारकीर्दीत, त्या काळी चालू असणाऱ्या वजनमापात बदल घडवून आणण्याचे प्रयत्न केले. तोळा, शेर व मण ही त्या काळात मान्य झालेली वजने होत. जरी त्यावेळचा मण सर्वसामान्यपणे ४० शेरांबरोबर भरे, तरी शेराचे वजन मात्र वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या किमतीचे असे. बऱ्याच वेळेला हे शेराचे वजन तेथील प्रचलित तांब्याच्या नाण्यांच्या वजनांवरून ठरवले जाई. या तांब्याच्या नाण्याला ‘दाम’ म्हणत.

अकबराच्या काळात एका दामाचे वजन जवळपास २१ ग्रॅम इतके होते. ३० दामांच्या वजनाइतका एक शेर असे आणि १२०० दामांच्या वजनाइतका १ मण असे.

१६१९ मध्ये जहांगीर बादशहाने १ शेर = ३६ दाम असे प्रमाण ठरवले, तर १६३३ मध्ये शहाजहानने १ शेर = ४० दाम असे प्रमाण ठरवले.

अकबराच्या आधी लांबीमापनासाठी ‘गज’ हे परिमाण वापरले जाई. त्या काळी तीन प्रकारचे गज वापरले जायचे. दीर्घ लांबीचा, मध्यम लांबीचा आणि लघू लांबीचा. प्रत्येक गजाचे २४ सारखे भाग पाडले जात. त्या एका भागाला ‘तसू’ असं म्हणत.

शेतजमीन, रस्ते, किल्ले यांच्या मोजमापनासाठी दीर्घ लांबीचा गज वापरत. लहान घरे, विहिरी, चिलखते, इ. मोजमापासाठी मध्यम लांबीचा गज उपयोगात आणला जाई. तर कापड, खुच्र्या, वाहने यांसारख्या लहान वस्तूंची लांबी मोजण्यासाठी लघू लांबीचा गज वापरला जाई.

अकबराने हे तिन्ही गज रद्द करून ४२ बोटांचा ‘इलाही गज’ (८३८.२ मिमी ते ८६३.६ मिमी) हा एकच गज वापरण्याचा कायदा केला. इलाही गज प्रामुख्याने उत्तर भारतात वापरला जाई. त्याचेच लहान भाग म्हणजे ‘गिऱ्ही’ आणि ‘तसू.’ (१ इलाही गज = १६ गिऱ्ही = २४ तसू.)  मोठी अंतरे ‘कोस’ परिमाणात मोजत. ऐन-ए-अकबरीत एक कोस म्हणजे ५००० गज असे प्रमाण मांडलेले आहे.

त्या काळात भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ‘हस्त’ (४५७.२ मिमी) हे माप लांबी मोजण्यासाठी वापरत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर व्यापार करणारे पोर्तुगीज लोक हस्ताला ‘कोव्हॅडो’ असे संबोधत.  कापडाच्या विक्रीकरिता ‘कोर्ग’ हे एकक वापरात होते.  विवक्षित कापडाच्या तुकडय़ाची वीसपट लांबी म्हणजे एक कोर्ग असे हे एकक होते.

चारुशीला सतीश जुईकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

वाग्देवीचे वरदवंत : ज्ञानपीठप्राप्त ‘कागज ते कॅनव्हास’

‘कागज ते कॅनव्हास’ हा अमृताजींचा ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त काव्यसंग्रह. यामध्ये त्यांच्या काही श्रेष्ठ कविता संकलित करण्यात आलेल्या आहेत. काही कविता गुरुनानक यांच्या पाचव्या जन्मशताब्दीनिमित्त लिहिल्या आहेत. ‘सुनहरे’ (१९५२) हे अमृताजींचे एक दीर्घ प्रेमकाव्य आहे. निसर्गाच्या प्रतीकांतून भावभावनांची अभिव्यक्ती अतिशय परिणामकारक पद्धतीने यात व्यक्त झाली आहे. या काव्यसंग्रहाला १९५५ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या कवयित्री. आपल्या काव्यलेखनाविषयी त्या म्हणतात- ‘‘आयुष्याची तोंडओळख होण्यासाठी मी उत्कटतेने कविता लिहिल्या. मी जे काही लिहीत आले ते हाडांच्या सापळ्यांना रक्त आणि मांस देण्याच्या, त्यांच्या सावळ्या रंगात प्रकाशाचा रंग भरण्याच्या लालसेने लिहीत आहे. ही एक प्रकारची परमेश्वराला स्वर्गातून पृथ्वीवर आणण्याची लालसा होती.’’

‘कागज ते कॅनव्हास’ हा कवितासंग्रह म्हणजे अमृताजींच्या काव्यलेखनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. मराठीत या काव्यसंग्रहाचा अनुवाद ‘कागद आणि कॅन्व्हास’ या नावाने सुशील पगारिया यांनी केला आहे. या संग्रहातील सर्वच कविता अर्थपूर्ण, आशयघन आहेत. ‘आद्य धर्म’, ‘बंड’, ‘माझा पत्ता’, ‘आठवण’, ‘माता तृप्ताची नऊ स्वप्ने’, ‘मी’, ‘एक भेट’ आदी.. अमृताजींच्या कवितांचा अत्यंत चपखल, ओघवत्या शैलीत पगारिया यांनी अनुवाद केला आहे. ‘माझा पत्ता’ ही त्यांची कविता अंतर्मुख करायला लावणारी आहे-

‘आज मी माझ्या घराचा नंबर पुसला आहे

आणि गल्लीच्या तोंडावर लावलेला, गल्लीच्या नावाचा फलक काढून टाकला आहे..

आणि प्रत्येक रस्त्याच्या दिशेचे नाव पुसले आहे.

पण जर मी तुम्हाला हवीच असेन

तर प्रत्येक देशाच्या, शहराच्या प्रत्येक गल्लीचा दरवाजा ठोठवा..

हा एक शाप आहे, एक वरही आहे

जिथे कुठे स्वतंत्र आत्म्याची झलक दिसेल

समजा की ते माझेच घर आहे..’

मानवी संहार, उद्ध्वस्त जनजीवन, असफल प्रेम आणि या साऱ्या वेदनेतून फुलणारी प्रेमभावना या साऱ्यांचं चित्रण त्यांच्या लेखनात येतं.

मंगला गोखले – mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 12:22 am

Web Title: mughal period weight measuring device
Next Stories
1 जॉर्ज स्टीव्हन्सन (९ जून १७८१ ते १२ ऑगस्ट १८४८)
2 रेल्वे इंजिनांची ओळख व शक्तिमापन
3 अमृता प्रीतम
Just Now!
X