काही इजिप्शियन उत्खननांमध्ये, इसवी सनपूर्व १२२० च्या दरम्यानच्या काळातल्या काही गोष्टी मिळाल्या, ज्यांमध्ये सोन्याबरोबर प्लॅटिनमचे काही कणसुद्धा आढळले. त्यावरून त्या काळात, वैज्ञानिकांना ‘प्लॅटिनम’ हे मूलद्रव्य माहीत नसलं तरी कळत-नकळतपणे त्याचा वापर मात्र केला जात होता, असं लक्षात येतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५६०च्या सुमाराला इटालियन वैज्ञानिकाच्या कागदपत्रांमध्ये ‘प्लॅटिनम’ हे नवीन मूलद्रव्य लक्षात आल्याचा संदर्भ आहे. तसं तेव्हाच्या काळात काही वैज्ञानिकांच्या लक्षात हे मूलद्रव्य आलं होतं;  पण ते सोन्याबरोबर होतं आणि तेही अगदी थोडय़ा प्रमाणात! त्यामुळे ते नवीन मूलद्रव्य नसून, ती सोन्यामध्ये असलेली भेसळ किंवा अशुद्धता असावी असंच समजलं गेलं आणि म्हणून सुरुवातीच्या काही काळात ती ‘अशुद्धता’ टाकून दिली गेली. हळूहळू या अशुद्धतेकडे अधिक डोळसपणे पाहिलं जाऊ  लागलं आणि सन १७५० च्या सुमाराला म्हणजे जवळपास २०० वर्षांनी, ‘प्लॅटिनम’ या मूलद्रव्याचा ‘शोध’ प्रसिद्ध केला गेला.

एखाद्या व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या ७०व्या वाढदिवसाला आपण ‘प्लॅटिनम ज्युबिली’ म्हणून संबोधतो. पण ७० या अंकाचा प्लॅटिनमशी एरवी काही संबंध नाही, कारण प्लॅटिनमचा अणुक्रमांक आहे ७८! संक्रामक मूलद्रव्यांच्या गटातलं, ‘प्लॅटिनम’ हे एक अतिशय मौल्यवान मूलद्रव्य! प्लॅटिनमची घनताही जास्त असते आणि सोनं किंवा चांदीपेक्षा प्लॅटिनमची तन्यता आणि वर्धनीयताही जास्त असते. प्लॅटिनम गंजरोधक आहे आणि चटकन रासायनिक अभिक्रिया करत नाही. ५०० अंश सेल्शियसपेक्षा जास्त तापमानापर्यंत तापवलं असता, ‘प्लॅटिनम’ ऑक्सिजनशी रासायनिक अभिक्रिया करतं आणि ‘प्लॅटिनम ऑक्साईड’ तयार होतं.

हायड्रोक्लोरिक आणि नायट्रिक आम्ल, या दोन्ही आम्लांमध्ये ‘प्लॅटिनम’ विरघळत नाही, पण ‘आम्लराज’ या हायड्रोक्लोरिक आणि नायट्रिक आम्ल यांच्या मिश्रणामध्ये तापवलं असता, ‘प्लॅटिनम’ विरघळतं आणि क्लोरोप्लॅटिनिक आम्ल तयार होतं. हे आम्ल अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण फोटोग्राफीमध्ये, मतदानाच्या वेळी वापरली जाणारी शाई तयार करताना, विद्युत अपघटन पद्धतीने मुलामा देताना, आरसे तयार करण्यासाठी, पोर्सेलीनवर रंगकाम करण्यासाठी.. क्लोरोप्लॅटिनिक आम्लाचा वापर केला जातो.

तसंच ५०० अंश सेल्शियसपेक्षा जास्त तापमानाला, ‘प्लॅटिनम’ची फ्ल्युओरीनशी अभिक्रिया होते आणि ‘प्लॅटिनम टेट्रा फ्ल्युओराईड’ तयार होतं. त्याचप्रकारे जास्त तापमानाला ‘प्लॅटिनम’ हे क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, सल्फर या सर्वाशी अभिक्रिया करतं.

‘प्लॅटिनम’ची बरीचशी संयुगं ही स्थिर स्वरूपाची असतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या कारखान्यांमध्ये आणि बऱ्याच रासायनिक अभिक्रियांमध्ये ‘प्लॅटिनम’चा खूप उपयोग होतो.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Multicolor multifunction platinum
First published on: 25-09-2018 at 01:58 IST