गणित, खगोलशास्त्र, अभियांत्रिकी, सांख्यिकी, भौतिकशास्त्र, तत्त्वज्ञान आदी क्षेत्रांच्या विकासात योगदान देणारे प्येअर-सिमाँ लाप्लास (२३ मार्च १७४९ – ५ मार्च १८२७) हे फ्रें च विद्वान! त्यांचे शिक्षण सुरुवातीला ब्युमाँट आणि नंतर ‘युनिव्हर्सिटी ऑफ केन’ येथे झाले. त्यांची गणितातील चमक लक्षात आल्याने ज्याँ द अलेम्बर्त या गणितज्ञाने  लाप्लास यांना इकोल मिलिटेअर येथे प्राध्यापकपद मिळण्यास साहाय्य केले. तेथे लाप्लासनी स्वत:ला संशोधनात झोकून दिले. गुरूची कक्षा सातत्याने आकुंचित, तर शनीची कक्षा सातत्याने प्रसरित का होते, ग्रहांच्या सैद्धांतिक कक्षा व प्रत्यक्षातील कक्षा यांच्यात थोडा फरक का पडतो अशा काही प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने ‘सूर्यमालेचा समतोल टिकवण्यासाठी दैवी हस्तक्षेपाची गरज असते,’ असा निष्कर्ष न्यूटनने काढला होता. परंतु लाप्लासनी न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या नियमाद्वारे ग्रहांच्या कोनीय गतीचा मध्य स्थिर असतो हे सिद्ध केले. हा सूर्यमालेच्या स्थैर्याचे स्पष्टीकरण देणारा न्यूटननंतरचा भौतिकी खगोलशास्त्रातील सर्वांत महत्त्वाचा शोध! त्यामुळे लाप्लास ‘फ्रान्सचे न्यूटन’ म्हणून ओळखले जाऊ लागले! ‘सेलेस्टीअल मेकॅनिक्स’ या पुस्तकात त्यांनी खगोलशास्त्रात लागणाऱ्या तोपर्यंतच्या ज्ञात गणिताचा आढावा घेतला. लाप्लासनी आधुनिक सांख्यिकीचा आणि संभाव्यता सिद्धांताचाही पाया घातला. संभाव्यतेचे प्रश्न सोडवताना त्यांनी कलनशास्त्राची मदत घेतली. सांख्यिकीच्या मदतीने फ्रान्सचा वार्षिक जन्मदर आणि मृत्युदर काढून फ्रान्सच्या लोकसंख्येचा अंदाज मांडला. प्रत्यक्ष लोकसंख्या आणि नमुन्यावरून अंदाज बांधलेली लोकसंख्या यांतील फरकाचा अभ्यास केला. गंमत म्हणजे तत्कालीन उपलब्ध आधारसामग्रीच्या मदतीने लंडनमध्ये मुलगा जन्माला येण्याची शक्यता पॅरिसपेक्षा निम्म्याहून अधिक असल्याचे लाप्लासनी सिद्ध केले! अनेक नैसर्गिक घटनांच्या अभ्यासातही त्यांनी संभाव्यतेचा उपयोग केला. शुद्ध गणितातील विकलक समीकरणांच्या उकलीचा अभ्यास करताना लाप्लासनी एक संकलक रूपांतरण (लाप्लास ट्रान्सफॉर्मेशन) विकसित केले. त्याद्वारे काळावर अवलंबून असलेले फलन (फंक्शन) वस्तूच्या अवकाशातील स्थानावर अवलंबून असलेल्या फलनामध्ये रूपांतरित करता येते. त्यामुळे भौतिक क्रियांचे वर्णन करणारे काळाच्या भाषेत असलेले संपूर्ण विकलक समीकरण सोडवण्यास सोप्या असलेल्या अवकाशस्थानाच्या भाषेत नेता येऊ लागले. लाप्लासनी वापरलेला ‘लाप्लाशियन‘ हा परिकर्मी (ऑपरेटर) भौतिकशास्त्रात महत्त्वाचा आहे.

असे म्हटले जाते की, नेपोलिअन बोनापार्टच्या ‘तुमच्या या गणिताने भरलेल्या खगोलशास्त्रावरील ग्रंथात ईश्वराचा उल्लेख का नाही?’ या प्रश्नावर ‘मला त्या परिकल्पनेची गरज वाटली नाही,’ हे उत्तर लाप्लास यांनी दिले. विज्ञानावर दृढ श्रद्धा असणारे लाप्लास ५ मार्च १८२७ रोजी निवर्तले, पण जगाला अनेक अभिनव संकल्पनांची देणगी देऊनच!

– डॉ. राजीव सप्रे

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org