ग्रेगॉर मेण्डेल यांचा शोधनिबंध १८६६ साली (चेक रिपब्लिकच्या बर्नो शहरातील) नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे मुखपत्र असलेल्या ‘प्रोसिडिंग्स ऑफ नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ या प्रथितयश शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता. पण त्या वेळी शास्त्रीय जगात त्याची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. पुढे ६ जानेवारी १८८४ रोजी मेण्डेल यांचे निधन झाले..

१९०० साल उजाडले. नेदरलँडमध्ये ह्य़ुगो डी व्हिृज, जर्मनीमध्ये कार्ल कॉरेन्स आणि ऑस्ट्रियामध्ये एरिक फॉन त्शेरमॅक हे तीन शास्त्रज्ञ स्वतंत्रपणे एकमेकांच्या नकळत, जैवविविधतेचे कोडे उलगडण्यात मग्न होते. आश्चर्य म्हणजे, या तिघांनाही मेण्डेल यांनी केलेल्या संशोधनाची काहीच माहिती नव्हती. परंतु योगायोगाने त्यांनी मेण्डेल यांच्यासारखेच प्रयोग केले आणि त्यांना अगदी तंतोतंत मेण्डेल यांच्यासारखेच निष्कर्ष मिळाले. कर्मधर्मसंयोगाने त्याच वर्षांत मेण्डेल यांच्या संशोधनाचे निष्कर्ष या तिघांच्या हाती पडले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. मग त्यांनी मेण्डेल यांचे संशोधन जगासमोर आणले. पुढे मेण्डेल यांच्या संशोधनातील प्रयोगांचा, निष्कर्षांचा उपयोग करून अनुवंशशास्त्राने अफाट प्रगती केली आहे.

दरम्यान १८६८ साली फ्रेडरिक मिशर या स्विस शास्त्रज्ञाला पेशीच्या केंद्रकात आम्लधर्मी रासायनिक रेणू (न्युक्लेइक अ‍ॅसिड) आढळले होते. हेच रेणू पुढे ‘डीएनए’ आणि ‘आरएनए’ म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे प्रगत संशोधनाच्या आधारे डीएनएच्या रेणूंचा सखोल अभ्यास करण्यात आला (अर्थात तो अजूनही सुरू आहे) आणि माणसाच्या तसेच अन्य सजीवांच्या बाह्य़ लक्षणांमध्ये आढळणाऱ्या विविधतेचे रहस्य उलगडत गेले. प्रत्येक प्रजातीतील वनस्पती अथवा प्राण्याची अंतर्बाह्य़ लक्षणे कोणती असावी, याची माहिती या डीएनएच्या रेणूंमध्ये सांकेतिक स्वरूपात साठवलेली असते. ही माहिती साठवणारे डीएनएचे घटक म्हणजेच ‘जीन्स’ अर्थात जनुके! याशिवाय जैवविविधता निर्माण करण्यात नैसर्गिक निवड प्रक्रियादेखील खूप महत्त्वाची ठरते. जगभरातील मानवी प्रजातीमध्ये ९९.९ टक्के जनुके समान रचना आणि कार्य असणारी आहेत! उर्वरित फक्त ०.१ टक्के जनुकांमुळे त्वचेचा रंग, केसांची रचना, डोळ्यांचा रंग, नाकाचा आकार या व अशा शेकडो लक्षणांमध्ये आढळणारी विविधता निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे चिम्पान्झी आणि मानव यांच्यात ९८ टक्के जनुके अगदी सारखी आहेत. परंतु केवळ दोन टक्के जनुकांमुळे या दोन प्रजातींमध्ये केवढा फरक आहे!

 डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ office@mavipamumbai.org