जसजशी रसायनशास्त्राची प्रगती होत गेली, तसतसे अनेक रसायनांचे शोध लागत गेले. या रसायनांना नावे देण्यात आली ती, कधी जिथे त्यांचा शोध लागला त्या स्थानावरून, कधी त्यांच्या गुणधर्मावरून, तर कधी त्यांच्या उपयोगांकडे बघून. याची उदाहरणे म्हणजे, ‘उजेड धारण करणारा’ तो फॉस्फोरस, ‘एक विशिष्ट वास येणारा’ तो ओझोन, तसेच ब्लू व्हिट्रिऑल (कॉपर सल्फेट), चिली सॉल्टपेटर (सोडियम नायट्रेट), क्विकसिल्व्हर (पारा), सोडा अ‍ॅश (सोडियम काबरेनेट), इत्यादी! त्यामुळे एकच रसायन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जात होते. या नावांचा त्या रसायनांच्या रासायनिक रचनेशी अनेकदा संबंधही नसायचा. किंबहुना अनेक पदार्थाच्या रासायनिक रचनाही त्याकाळी माहीत नव्हत्या. परंतु या नामवैविध्यामुळे रसायनांच्या नावांचे गोंधळ होऊ लागले. सेंद्रिय रसायनांच्या बाबतीत तर कालांतराने हा प्रश्न तीव्र झाला.

अठराव्या शतकाच्या अखेरीस लुई बर्नार्ड-गॉयटन या फ्रेंच शास्त्रज्ञाने, रसायनांना एकाच शास्त्रीय पद्धतीची नावे असली पाहिजेत, याचा आग्रह धरला. फ्रेंच रसायनतज्ज्ञ आन्त्वान लव्हॉयजे आणि आन्त्वान-फ्रँकाय फाऊरक्रॉय यांच्या मदतीने १७८७ साली, गॉयटनने रसायनांची नावे ठरवण्याची पद्धत सुचवणारे ‘मेथड ऑफ केमिकल नॉमेनक्लेचर’ हे फ्रेंच भाषेतील पुस्तक प्रकाशित केले. यात अनेक रसायनांना स्पष्ट नावे दिली गेली. त्यानंतर १८३८ सालाच्या सुमारास स्वीडिश रसायनतज्ज्ञ ज्योन बर्झेलियस याने सेंद्रिय रसायनांना नावे देताना संयुगातील कार्बनच्या संख्येनुसार, टेट्रिल (चारसाठी), पेंटिल (पाचसाठी), हेक्झिल (सहासाठी) अशा लॅटिन संज्ञांचा वापर सुरू केला. जर्मन रसायनतज्ज्ञ ऑगस्ट फॉन हॉफमान यानेही १८६५ साली लॅटिन नावांच्या मदतीने अनेक सेंद्रिय संयुगांचे पद्धतशीर नामकरण केले.

दरम्यानच्या काळात, जर्मन रसायनतज्ज्ञ फ्रिडरिश केक्यूले याच्या पुढाकाराने १८६० साली कार्ल्सरूह येथे युरोपीय रसायनतज्ज्ञांची आंतरराष्ट्रीय परिषद भरली. या परिषदेत, रसायनांच्या नामकरणावर तसेच त्यांना देण्याच्या चिन्हांवर चर्चा झाली. अखेरीस १८९२ साली जिनिव्हा येथील जागतिक परिषदेत सेंद्रिय रसायनांची नावे ठरवण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले गेले. त्यातूनच पुढे १९१९ साली या क्षेत्रात जागतिक स्तरावर काम करणारी ‘इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अ‍ॅण्ड अ‍ॅप्लाइड केमिस्ट्री’ (आययूपीएसी) ही संस्था उदयाला आली. हीच संस्था गेली शंभर वर्षे रसायनशास्त्रातील अनेक गोष्टींचे प्रमाणीकरण करत आली आहे.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org