13 July 2020

News Flash

कुतूहल – नॅनो तंत्रज्ञान

तांदळाच्या दाण्यावर काढलेल्या चित्राचं किंवा त्यावर कोरलेल्या नावाचं अनेकांना आकर्षण असतं. अर्थात, अशा तांदळाच्या दाण्यांना केवळ एक संग्राह्य़ वस्तू यापेक्षा जास्त किंमत नसते.

| August 5, 2014 01:01 am

तांदळाच्या दाण्यावर काढलेल्या चित्राचं किंवा त्यावर कोरलेल्या नावाचं अनेकांना आकर्षण असतं. अर्थात, अशा तांदळाच्या दाण्यांना केवळ एक संग्राह्य़ वस्तू यापेक्षा जास्त किंमत नसते. पण जसजसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं, तसतशा अत्यंत लहान आकाराच्या वस्तू आपण व्यवहारात वापरायला लागलो. कमीत कमी जागेत मावणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी तर क्रांती घडवून आणली. गेल्या काही वर्षांपासून नॅनो टेक्नॉलॉजीची चर्चा होते आहे. ‘नॅनो’ हा शब्द ग्रीक भाषेतल्या ज्या मूळ शब्दावरून आला, त्याचा अर्थ ‘ठेंगू’ किंवा ‘बुटका’ असा होतो. ‘नॅनो’ म्हणजे किती लहान, तर हायड्रोजनचे दहा अणू एकमेकांना चिकटून ओळीने जोडले तर त्याची लांबी एक नॅनो मीटर इतकी असेल. इतक्या सूक्ष्म आकाराच्या पदार्थाचे गुणधर्म अभ्यासून त्यांचा योग्य तो वापर करणं ही गोष्ट म्हणजे बॉिक्सगचे ग्लोव्हज हातात घालून जमिनीवर पडलेले वाळूचे कण उचलण्यापेक्षाही कठीण आहे.
नॅनो तंत्रज्ञान म्हणजे, अत्यंत सूक्ष्म स्वरूपातल्या पदार्थावर नियंत्रण मिळवून त्याचे माहिती नसलेले गुणधर्म शोधणं आणि उपयुक्त गुणधर्माचा वापर करणं. प्रामुख्याने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या दोन विज्ञान शाखा मिळून तयार झालेली नॅनो टेक्नॉलॉजी ही विज्ञानाची उपयोजित शाखा आहे. या तंत्रज्ञानाचे प्रामुख्याने तीन विभाग पडतात – नॅनो मटेरियल्स, नॅनो इलेक्ट्रॉनिक्स आणि नॅनो बायोटेक्नॉलॉजी.
या तंत्रज्ञानात वापरण्यात येणाऱ्या ‘नॅनो’ म्हणजेच अतिसूक्ष्म कणांचा एक मुख्य गुणधर्म म्हणजे त्यांचं आकारमान इतकं कमी असूनसुद्धा जास्त क्षेत्रफळावर कार्यरत असण्याची त्यांच्याकडे क्षमता असते. त्यामुळे या कणांची रासायनिक किंवा जैविक प्रक्रिया जास्त चांगल्या प्रकारे आणि अधिक प्रमाणात होऊ शकते. त्यातही जे नॅनो कण मुक्त स्वरूपात असतात, त्या कणांचा परिणाम आणखी जास्त प्रमाणात होऊ शकतो.
एकविसावं शतक हे नॅनो तंत्रज्ञानाचं शतक म्हणून ओळखलं जाईल इतकं व्यापक आणि प्रचंड आवाका असलेलं हे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यात अनेक आश्चर्यकारक पण अत्यंत कार्यक्षम उपकरणं तयार होतील
हेमंत लागवणकर (डोंबिवली) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – अलौकिक अद्वैत
मुण्डक उपनिषदातील ‘अद्वैत’ संकल्पनेवर भाष्य करणाऱ्या नितांत सुंदर श्लोकांचा आपण आस्वाद आणि अभ्यास करीत आहोत.
वृक्षरूपी जीवनावरील दोन पक्षी विराजमान झालेले आपण पाहिले. एकाच रंगपिसाऱ्यानं खुलणारे हे दोन पक्षी म्हणजे जीवनामधलं द्वैत. देहरूप आणि चेतस; जड आणि चैतन्य. जड प्रवृत्तीने इंद्रियापासून उद्भवणाऱ्या संवेदनांवर आसक्त झालेलं देहरूप आणि चेतस म्हणजे आत्मा. चेतसाला दैहिक जाणिवांचा स्पर्श न झाल्याने ते निष्कलंक आणि विशुद्ध.
परंतु या दोन पक्ष्यांमध्ये द्वैत असलं तरी त्यांचे परस्परांत सख्य आहे. मैत्रीच्या नात्यानं ही दोन रूपं (अस्तित्व) एकमेकांशी बांधलेली आहेत.
या द्वैतभावनांची वाटचाल अद्वैताकडे कशी व्हावी आणि होते, याविषयी पुढील श्लोक..
समाने वृक्षे पुरुषो निमग्नो
अनिशया सोचति मुह्यमान:
जुष्टं यदा पश्यत्यन्यमिशं
अस्य महिमानमिति वितशोक:
जीवनवृक्षावरचा देहरूपी पक्षी आनंदाने मधुर फळे चाखतो आहे. परंतु या संवेदनेचं आसक्तीमध्ये रूपांतर होतं आणि त्या (अटॅचमेंट) मधून दु:ख आणि शोक निर्माण होतो. त्या दु:खामध्ये तो निमग्न होतो. त्या आसक्तीमध्ये अडकल्यामुळे तो असहाय्य होतो. जणू काही त्या संवेदनांच्या मागे लागून त्यांच्या जाळ्यात अडकतो. इथे एक स्पष्ट करायला हवं की शारीरिक सुखसंवेदना कमी प्रतीच्या किंवा हलक्या दर्जाच्या ठरत नाहीत. त्यांचा मन:पूत उपभोग घ्यायला आडकाठी नाही. जीवनरूपी वृक्षाची फळं चाखण्यात काही चूक नाही; परंतु त्या केवळ शारीरिक वासना आणि इच्छांच्या पलीकडे जाऊन आणखी काही जीवन असू शकतं याची जाणीव राहते असं नाही. ‘मी’ म्हणजे केवळ माझं शरीर नसून मी एका विशाल वृक्षावरचा पक्षी आहे. माझ्यासारखे अनेक पक्षी इथे वस्ती करून राहतात. या वृक्षावरची मधुर फळं मला ओरबाडून खायची नाहीत. माझ्याबरोबर अनेक सहअस्तित्व इथे वावरत आहेत.
ही जाणीव म्हणजे चेतस आणि हे चेतस म्हणजे प्रत्यक्ष ‘ज्ञान.’ ज्ञानाइतकं अन्य तेज जगात नाही.
दुसरा पक्षी म्हणजे चैतन्यरूपी अखंड ज्ञान. परंतु ते ज्ञान पहिल्या पक्ष्याला दिसतच नाही.
हे ज्ञान अगदी पलीकडच्या फांदीवर विराजमान झालेलं आहे.
तो ज्ञानरूपी पक्षी. फक्त शारीरिक जाणिवेत अडकलेल्या पक्ष्याला ज्ञानजाणीव झाली की त्याचं अज्ञान गळून पडतं.
हे ज्ञान म्हणजे स्वयंप्रकाशी चैतन्य, ते रूक्ष नाही तर मैत्रीच्या भावनेनं ओथंबलेलं आहे. त्या ज्ञानरूपी चैतन्याशी सख्य झालं की, आपोआप जीवन उजळून निघतं.
सुरुवातीला ते ज्ञान आपल्यापेक्षा वेगळं आहे, असा भास होतो. नंतर मात्र लक्षात आहे की ते वेगळं नाही. आपण ज्ञानसंपन्न होतो, ज्ञानमय होतो, प्रज्ञा जागृत होते. विवेक आणि आपल्यातील दुरावा मिटतो. मी प्रथमच ‘मी’ सोडून इतरांकडे मैत्रीपूर्ण भावनेनं पाहू लागतो. मी आणि इतर माणसं, यामधील अहंकाररूपी द्वैतभाव नष्ट होतो.
एकाच चेतसाची ही अनेक रूपं आहेत. एकाच चैतन्यानं तेजाळणारी ही त्याची प्रतिबिंबं आहेत, हे ध्यानात येतं. आपपरभाव कोसळतो आणि एका अलौकिक जाणिवेनं आपण जीवनाचा अनुभव घेऊ लागतो.. उपनिषदांच्या चिंतनातून मनमोराचा पिसारा फुलतो, तो असा!!
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – सर्वसमावेशकता नसेल, तर अस्थैर्य, विघटनवाद फैलावेल..
‘‘गांधीवाद, हिंदूुत्ववाद आणि साम्यवाद या तीन प्रमुख विचारसरणी आपल्याकडे गेल्या साठ-सत्तर वर्षांपासून चालत आलेल्या आहेत. या तिन्हीतील अपुरेपणा जाणवत असल्याने सध्या देशात वैचारिक गोंधळाचे, दिशाहीनतेचे वातावरण आहे. चौथी राजीव गांधींच्या रूपाने आलेली तंत्रवादी वृत्तीही हळूहळू फैलावत आहे. या वृत्तीला एकूण विचारसरणींचेच वावडे आहे. यांत्रिक आणि तांत्रिक कुशलतेचा विकास घडून आला की देश सुधारला, पुढे गेला असे या तरुण नेतृत्वाला वाटते आहे. देश उभारणीला काही विधायक मानसिक शक्ती जागृत कराव्या लागतात. यासाठी एखादे तत्त्वज्ञान, एखादी बळकट श्रद्धा रुजवावी लागते, याचा पत्ताच या नव्या नेतृत्वाला अद्याप लागलेला नाही. त्यामुळे जुनाट धर्मश्रद्धाच पुन्हा डोके वर काढीत आहेत. या श्रद्धांचा आधार घेऊन देशविभाजनाच्या प्रवृत्ती ठिकठिकाणी संघटित होत आहेत. या विभाजन प्रवृत्ती केवळ लष्करी बळावर मोडून काढता येणार नाहीत. त्यासाठी एकात्म राष्ट्रवादाच्या जाणीवा समाजातल्या सर्व थरांत, सर्व वर्गात, विविध धार्मिक गटांत निर्माण व्हायला हव्यात.’’ ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर १९९१ साली लिहिलेल्या ‘विचारसंगम’ या संपादकीयात म्हणतात- ‘‘एकात्मराष्ट्रभावविरोधी जे अलगतावादी धार्मिक गट असतील, मग ते हिंदूंमधले काही शीख सांप्रदायिक असोत किंवा इतर धर्माचे असोत, त्यांच्याविरुद्ध स्पष्ट व उघड भूमिका घ्यायला हवी. सर्व धर्मामधले जे एकात्मराष्ट्रवादी प्रवाह असतील त्यांचा स्वीकार व आदरही केला पाहिजे. साध्या शब्दांत सांगायचे, तर.. वरील तिन्ही विचारसरणींचा एक नवा कालोचित संगम घडून यायला हवा.. टिळक-गांधी काँग्रेसची सर्वसमावेशकता हिंदुत्ववाद्यांना आज नाही उद्या स्वीकारावी लागणार आहे.. गांधी-नेहरूंचा शांतताविचार हवा, पण दुबळ्यांच्या शांतताविचारांना कोणी भीक घालत नाही ही सावरकर, हेडगेवारांची सामथ्र्ययोगाची बैठक त्याला प्राप्त करून दिली पाहिजे. असा काही विचारांचा, प्रवृत्तींचा संगम घडून आला तरच आजच्या कठीण काळावर आपण मात करू शकू. नाहीतर आजचे अराजक, अस्थैर्य, विघटनावाद फैलावतच राहील. ’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2014 1:01 am

Web Title: nanotechnology
टॅग Navneet,Navnit
Next Stories
1 मेण लावलेले सफरचंद
2 कुतूहल: व्हॅनिला फ्लेवर
3 कुतूहल: शुष्क बर्फ
Just Now!
X