नॅफ्था हे पेट्रोलियम द्रावण साधारणपणे ३० ते १७० अंश सेल्सिअसला ऊध्र्वपातित होते. खते व पेट्रोरसायने तयार करण्यासाठी इंधन आणि कच्चामाल म्हणून नॅफ्थाचा प्रामुख्याने वापर होतो. नॅफ्थामध्ये पॅराफिनिक, नॅफ्थॅनिक आणि एरोमॅटिक रसायनांचा समावेश होतो. दोन प्रकारच्या नॅफ्थाची निर्मिती होत असते. एरोमॅटिक अंश जादा असलेल्या नॅफ्थाला ‘हाय एरोमॅटिक नॅफ्था’ (एच.ए.एन.) आणि कमी एरोमॅटिक अंश असलेल्या या द्रावणाला ‘लो एरोमॅटिक नॅफ्था’ (एल.ए.एन.) असे संबोधिले जाते.
 पहिल्या प्रकारचा नॅफ्था सर्वसाधारण कामासाठी उपयोगी पडतो तर दुसऱ्या प्रकारच्या द्रावणातून पेट्रो-रसायने निर्माण केली जातात. खते तयार करण्यासाठी कमी प्रमाणात एरोमॅटिक रसायने असलेले नॅफ्था द्रावण वापरावे लागते.
 एखाद्या खत कारखान्याची यंत्रणा ही त्याच्यासाठी उपलब्ध असलेल्या नॅफ्थाच्या रचनेवर अवलंबून असते. त्यामुळेच तर नॅफ्थासाठी इतर इंधने नि द्रावणाप्रमाणे आय.एस. (इंडियन स्टॅण्डर्ड)चे मानद प्रमाण उपलब्ध नाही. एखादा तेलशुद्धीकरण कारखाना आपल्या कुवती नि क्षमतेनुसार नॅफ्थाची वैशिष्टय़े ठरवून त्याची निर्मिती करतो. खत कारखान्यात उच्च तापमानाची गरज असते व तिथे नॅफ्था इंधनाची भूमिका बजावीत असते. काही संयंत्रात वायू निर्मितीसाठीसुद्धा वापरतात. ऊर्जानिर्मिती करणाऱ्या गॅस टर्बाइनमध्ये सुद्धा नॅफ्थाचा इंधन म्हणून वापर होतो आहे. एरोमॅटिक रसायने जळताना धूर ओकतात व त्यामुळे त्यांचे नॅफ्थातील प्रमाण रोखण्याचा प्रयत्न असतो. या धुराची काजळी यंत्रभागावर थराच्या रूपात साचून नासधूस होत असते. नॅफ्थामध्ये असलेली असंपृक्त हायड्रोकार्बन रसायने ही हवेच्या संपर्कात आली की गोंदरूप धारण करतात व या गुणी द्रावणाची गुणवत्ता कमी करतात. तसेच, या द्रावणात गंधकाचा अंश असेल तर खतनिर्मिती करताना उत्प्रेरक म्हणून वापरण्यात येणाऱ्या निकेल धातूच्या भागाला गंज चढतो व तो निष्क्रिय बनतो. तसेच, या द्रावणातील शिसे, व्हॅनेडियम, सोडियम इ. धातूचे अत्यल्प प्रमाणदेखील उच्च तापमानाला उत्प्रेरकांशी संयोग पावून त्याची कार्यक्षमता ढासळवू शकतात.
नॅफ्थाची तेलशुद्धीकरण कारखान्यात निर्मिती करताना, या साऱ्या बाबींची काळजी घ्यावी लागते.
जोसेफ तुस्कानो (वसई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई   office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – आधी हाताला चटके..
मानस, ए मानस, किती त्रासलेला दिसतोस रे? चेहरा ओढलेला आणि कपाळावर आठय़ांचं सूक्ष्म जाळं दिसतंय. हां, तू तुझा त्रस्त चेहरा लोकांपासून लपवतोस. ओठांवर स्मित असतं आणि चेहऱ्यावर शांत भाव ठेवून वावरतोस तेव्हा लोकांना वाटतं हे तुझंच रूप आहे. तू तसाच स्थिरचित्त आहेस..
बिछान्यावर पडल्या पडल्या मानसी मला म्हणाली, ‘गाठलंस ना मला, झालं समाधान तुझं! मला उगीच त्रास देऊ नकोस. तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला वेळ नाहीये, झोपू दे..’
मानसी, म्हणजे मानस या माझ्या मनोरूपाची दुसरी बाजू. माझ्या मनातली संवेदनशील तरी ठाम वृत्ती. स्त्री सुलभतेनं भावनाशील आणि तरीही विचारी. मानस आणि मानसी माझीच दोन स्वरूप, एकाच नाण्याच्या दोन बाजू..
तर ही मानसी मला म्हणजे मानसला नेहमी खिंडीत गाठते, नेमके आणि मार्मिक प्रश्न विचारून नव्या विचारांचा नितळ आणि रॅशनल प्रवाह सुरू करते.
मी तुझ्या त्रासाविषयी बोलत्येय, मानसी म्हणाली. ‘हो, आहे मी त्रस्त आणि हैराण. रोजची दगदग, प्रवास नावाची यातायात, कामातली कटकट यांनी मी त्रासलोय. सगळेच त्रस्त होतात, तसा मी आहे. आणि माझा त्रास मी लपवतो, कोणाला दाखवीत नाही, मी सांभाळतोय. काय चूक आहे त्यात? कोणाला त्रास चुकलाय..’
अनुदिनी, अनुतापे तापलो रामराया.. मानसी खुदकन हसून म्हणाली, ‘शंभर टक्के बरोबर आहे. जगरहाटीचा त्रास कोणाला चुकलाय? परिस्थिती अशी आहे की कोणीही त्रासेल रे!’ चुचकारून मानसी म्हणाली. ‘प्रश्न आपल्याला होणाऱ्या त्रासाचा नसतो, योग्य विश्रांती, आहार, विहार आणि आचार यांच्या मदतीने त्रासापासून सोडवणूक करता येते. आपण आणि जग या दोन जिवंत गोष्टींचं सातत्यानं होणारं घर्षण म्हणजे जीवन. घर्षण म्हणजे तापमान वाढणं म्हणजे ताप म्हणजेच त्रास. पण त्रस्त होण्यामागे आणखी एक अंतर्गत पदर असतो. आणि त्रासाचा उगम जगरहाटीशी होणाऱ्या संघर्षांतूनच नाही तर आपल्या मनातल विचारांच्या बैठकीत होतो. मी तुझ्या त्रासाविषयी नाही, तुला होणाऱ्या क्लेशाविषयी बोलतेय.’
‘क्लेश म्हणजेच त्रास ना?’ मानसनं विचारलं, त्याच्या कपाळावरच्या आठय़ा विरत होत्या..
नाही रे, त्रास शरीराला होतो आणि क्लेश मनाला होतात. क्लेश म्हणजे आपण स्वत:शी स्वत:बद्दल केलेला विचार. क्लेश म्हणजे मलाच त्रास का होतो? माझ्याच नशिबी हे त्रास का? मलाच का भोगाव्या लागतात यातना? इतरांचं कसं मस्त चाललंय? ते कसे नशीबवान आहेत, त्यांना कसं सगळं मिळतं? मी अमुकतमुक असलो तरी माझ्या वाटय़ाला त्रास का? या प्रश्नांना उत्तरं नसतात, मानस! या प्रश्नांनी मनाला फक्त क्लेश होतात. आहे ती परिस्थिती स्वीकारली, तर त्याचे क्लेश कमी होतात. क्लेश कमी झाले तर मनातली ऊर्जा टिकते. उत्तरं नसलेले प्रश्न सोडवण्यात मनाची शक्ती खलास होते. परिस्थिती स्वीकारली तर मन शांत राहातं आणि त्रासही आपोआप कमी होतो. बहिणाबाई, माझी सर्वात मोठी आवृत्ती, म्हणाली की, ‘आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर..’ भाकरी भाजणाऱ्या गृहिणीला त्रास सहन करावा लागतो, पण कुटुंबावर ती प्रेम करते, तिला क्लेश होत नाहीत. म्हणून त्रास सहन करायला ताकद येते..
मानसला शांत झोप लागली..
 डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – .. तरच इतिहास सन्मान्य होईल
‘‘मराठय़ांचा इतिहास लिहावा तरी कसा असा प्रश्न साहजिक उद्भवतो. ह्य़ाला उत्तर असें आहे कीं मराठय़ांचा इतिहास शास्त्रीय पद्धतीनें लिहिला तरच त्याला कांहीं किंमत देतां येईल. इतिहास लिहिण्याला प्रस्तुतची संधि महाराष्ट्रांतील लोकांना मोठी उत्तम आली आहे. इतिहास उत्तम तऱ्हेनें कसा लिहितां येईल ह्य़ाची फोड युरोपांतील शास्त्रांनीं करून ठेविलेली आहे. ह्य़ा फोडीचा फायदा करून घेऊन मराठय़ांच्या इतिहासाची इमारत उभारली पाहिजे. युरोपांत सतराव्या व अठराव्या शतकांत इतिहासकारांनीं व चरित्रकारांनीं ज्या चुक्या केल्या त्याच जर आपण एकोणिसाव्या शतकाच्या शेवटीं करूं लागलों तर एकोणिसाव्या शतकांतील युरोपाशीं आपला परिचय व्यर्थ झाला असें होईल.’’  
आयुष्यभर मराठय़ांच्या इतिहासाची साधने जमा करणारे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ‘सन्मान्य इतिहासरचने’ची पाच कलमे ही सांगतात -‘‘१. कोणताहि पूर्वग्रह घेऊन इतिहास किंवा चरित्रें लिहावयास लागूं नये. आतांपर्यंत लिहिलेल्या बहुतेंक चरित्रांतून हा दोष ढळढळीत दिसून येतो.. २. भरपूर अस्सल माहिती मिळाल्याशिवाय चरित्र किंवा इतिहासाचा भाग लिहिण्याचा खटाटोप करूं नये. ३. तशांतूनहि लिहावयाचा संकल्पच असेल तर आपल्याला माहिती कोणती नाहीं तें स्पष्ट लिहावें. अस्सल भरपूर लेखसंग्रह जवळ असल्यावांचून जो कोणी इतिहास लिहावयाला जाईल त्याला माहिती नाहीं असा शेरा पुष्कळच प्रसंगांसंबंधीं द्यावा लागेल. ४. अस्सल भरपूर माहितीवरून कांहीं सिद्धांत काढावयाचा तो काढावा. हें चवथें कलम पहिल्या कलमाचेंच एका प्रकारचें रूपांतर आहे अशी समजूत होण्याचा संभव आहे; परंतु तसा प्रकार नाहीं. पहिल्या कलमांत पूर्वग्रहप्रधान पद्धतीचा निर्देश केला आहे व ह्य़ा चवथ्या कलमांत पश्चाद्ग्रहप्रधानपद्धतीचा निर्देश केला आहे. पूर्वग्रह मनसोक्त काढिलेलाच असतो. पश्चाद्ग्रह अस्सल भरपूर आधारांतून जात्या जो निघेल तोच घ्यावयाचा असतो.. ५. उपमान प्रमाणावर कोणताहि सिद्धांत ठरवूं नये. ’’