डॉ. श्रुती पानसे – contact@shrutipanse.com

डॉ. हॉवर्ड गार्डनर यांच्या ‘बहुआयामी बुद्धिमत्तां’च्या सिद्धांतानुसार निसर्गविषयक बुद्धिमत्ता ही एक स्वतंत्र बुद्धिमत्ता आहे. ती केवळ निसर्गात फिरण्याची आवड किंवा छंद नाही, तर निसर्गाचा शोध घेण्याची – त्यातून शिकण्याची एक वेगळी पद्धत आहे. यासाठी न्यूरॉन्सची विशिष्ट पद्धतीने  जुळणी असावी लागते. अशी क्षमता सगळ्या लोकांमध्ये नसते, तर केवळ काही लोकांमध्येच असते. यामुळे आपल्या शाळांमध्ये निसर्गाचे विविध उपक्रम द्यायला हवेत. पर्यावरण हा विषय शाळांमध्ये असतो; पण प्रत्यक्ष निसर्गात नेलंच जातं असं नाही.

आपल्याकडे रूढ शिक्षणाच्या चाकोरीबाहेर पडण्याचे प्रयत्न काहींनी केले. त्यांपैकी एक होते रवींद्रनाथ टागोर. लहान असताना त्यांना स्वत:ला शाळा नकोशी झाली होती. ते शाळेत जायला ठाम नकार द्यायचे. काही काही कारणं शोधून काढायचे. मुलांच्या अशा ‘वेडय़ावाकडय़ा’ वागण्याला तसंच उत्तर देण्याची म्हणजे मारून मुटकून शाळेत पाठवण्याची त्या काळी पद्धत होती, तरीही त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलाला समजून घेतलं. ते आपल्या लहान मुलाला घेऊन एका निसर्गरम्य ठिकाणी गेले. दिवसातला काही काळ वडील मुलाला झाडाखाली, तळ्याकाठी बसवून औपचारिक विषयांचं शिक्षण द्यायचे, तर उरलेला संपूर्ण वेळ रवींद्रनाथ निसर्गात हवा तसा घालवायचे. या दिवसांचा अतिशय सखोल परिणाम रवींद्रनाथांच्या मनावर झाला. पुढे त्यांनी बोलपूरजवळच्या रम्य परिसरात शांतिनिकेतन हे विद्यालय सुरू केलं.

आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी ताराबाई मोडक- अनुताई वाघ- सिंधूताई अंबिके यांनी चालवलेली कोसबाडची शाळा हिलाही शाळेचं बंदिस्त स्वरूप नव्हतंच. मुलं शाळेत येत नाहीत, म्हणून त्यांच्या अंगणात जाऊन शिकवायचं हे ‘अंगणवाडी’ शब्दाचं मूळ रूप. मुलं कुरणात जातात, तर त्यांना तिथे जाऊन शिकवायचं ही ‘कुरणशाळा’, मुली दिवसभर काम करून संध्याकाळी घरी येतात, तिथे जाऊन शिकवायचं ती रात्रशाळा. नदीकाठी जाऊन झाडं, दगड यांच्या साह्य़ाने बेरीज- वजाबाक्या या शिक्षिकांनी शिकवल्या आहेत.

प्रसिद्ध विचारवंत रूसो यांनीदेखील मुलांच्या नैसर्गिक वाढीच्या आणि बौद्धिक विकासाच्या दृष्टीने निसर्गशिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं होतं. आजच्या शहरीकरणाच्या काळात हे सर्व हरवून गेलं आहे.

आठवडय़ातला किमान एखादा तास मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात रमवून शिकवता येईल का आपल्याला?