News Flash

नवदेशांचा उदयास्त : नाऊरु

ब्रिटिश, जर्मनांची या बेटावर तुरळक वस्ती तयार झाली.

दक्षिण प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येस असलेला नौरु किंवा नाऊरु हा सार्वभौम देश जगातला सर्वांत लहान प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जातो. केवळ २१ चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेला हा देश जगातला तिसरा सर्वांत लहान देश आहे! यापेक्षाही कमी क्षेत्रफळ असलेले दोन देश आहेत : व्हॅटिकन सिटी आणि मोनॅको. नाऊरु बेट तुवालू या द्वीपदेशाच्या वायव्येस १,३०० कि.मी., तर पापुआ न्यू गिनीच्या ईशान्येस प्रशांत महासागरात आहे. या महासागरातल्या ओशियाना उपखंडातील या प्रदेशाला मायक्रोनेशिया म्हणतात. मायक्रोनेशीय आदिवासी पट्टीचे दर्यावर्दी आणि मच्छीमार.

एका ब्रिटिश जहाजाचा कप्तान जॉन फिअर्न याने अठराव्या शतकाच्या अखेरीस हे बेट प्रथम बघितले आणि तेथील निसर्ग सौंदर्यामुळे त्याचे नाव त्याने ठेवले ‘प्लेझंट आयलंड’! साधारणत: १८२६ पासून युरोपीयांचा नाऊरु बेटाशी संपर्क वाढला तो येथे मुबलक असलेल्या व्हेल माशांसाठी आणि येथील वैशिष्ट्यपूर्ण पाम वृक्षापासून तयार झालेल्या मद्यासाठी. ब्रिटिश, जर्मनांची या बेटावर तुरळक वस्ती तयार झाली. पुढे १८८८ मध्ये ब्रिटन आणि जर्मनीत करार होऊन जर्मनीने नाऊरु बेटाचा ताबा घेऊन ते जर्मन साम्राज्यात सामील केले. नाऊरुच्या जवळच असलेल्या जर्मन मार्शल आयलँडकडे नाऊरुचे प्रशासन आले. यापूर्वी नाऊरुच्या स्थानिक जमातींमध्ये संघर्ष चालू होते, ते जर्मनांनी मिटवून त्यांच्यात एकोपा निर्माण केला. जर्मनांबरोबर इथे ख्रिस्ती मिशनरीही आले. रॉबर्ट रॉश हा जर्मन व्यापारी तर एका नाऊरुअन तरुणीशी विवाह करून तिथे स्थायिक झाला. दरम्यान १९०० साली एलीस या ऑस्ट्रेलियन संशोधकाला नाऊरुच्या भूगर्भात फॉस्फेटचे मोठे साठे सापडले. या खनिजाचा वापर कृषिउद्योग, रासायनिक उद्योगांत मोठ्या प्रमाणात होतो. नाऊरुच्या फॉस्फेटची निर्यात सुरू झाली. १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजांनी जर्मनीच्या ताब्यातील नाऊरुचा ताबा घेतला. महायुद्ध संपल्यानंतर त्या काळातील राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या आदेशानुसार नाऊरु बेटाच्या प्रशासनाची, व्यवस्थापनाची जबाबदारी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटनकडे देण्यात आली. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2021 12:10 am

Web Title: nauru sovereign state northeast australia south pacific ocean akp 94
Next Stories
1 कुतूहल : सिंहावलोकनाचा गणिती मार्ग
2 नवदेशांचा उदयास्त : प्रजासत्ताक फिजी
3 कुतूहल : गणिताधारित इतिहास
Just Now!
X