24 November 2017

News Flash

कुतूहल : धोका व्यवस्थापनाचे महत्त्व

धोका व्यवस्थापकाला ज्या उद्योगाचे धोका व्यवस्थापन करावयाचे असेल, त्याची खडान् खडा व अद्ययावत माहिती

मुंबई | Updated: December 18, 2012 4:06 AM

धोका व्यवस्थापकाला ज्या उद्योगाचे धोका व्यवस्थापन करावयाचे असेल, त्याची खडान् खडा व अद्ययावत माहिती अगदी तोंडपाठ असावी लागते. बऱ्याच वेळा या बाबीकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे चांगल्या दर्जाचे धोका व्यवस्थापन होत नाही. आधुनिक ‘धोका व्यवस्थापना’त आणखी तीन घटकांचा समावेश केला जातो. हे तीन घटक म्हणजे- १. धोका व्यवस्थापन आणि नुकसान कमी करण्याची योजना. २. उद्योग सातत्याने सुरू राहण्यासाठीची योजना. ३. विशिष्ट उद्योगासाठीचे धोका व्यवस्थापन. यात तिसऱ्या घटकाचा विचार अधिक महत्त्वाचा आहे. याशिवाय कोणताही उद्योग चालवणे शक्य होणार नाही, असे धोका व्यवस्थापनातील तज्ज्ञ सांगतात. यासाठी उद्योगातील धोका व्यवस्थापन करताना मुख्य तीन बाबींकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. १. धंद्यातील धोके २. आर्थिक धोके ३. भौतिक किंवा नैसर्गिक धोके. यापैकी त्या त्या धंद्यातील धोक्यांना काही उपाय नाही. काही प्रमाणात धोका स्वीकारल्याशिवाय धंदा करता येणार नाही. परंतु आर्थिक आणि नैसर्गिक धोक्यांचे पूर्वव्यवस्थापन करणे बऱ्याच अंशी शक्य आहे. एवढे सर्व करूनही धोक्याचा फटका आपल्याला बसतच असतो. याचे कारण म्हणजे धोक्यामधील अनिश्चितता आणि अनपेक्षितता. म्हणूनच धोकामापनामध्ये‘संभाव्यता’ महत्त्वाची भूमिका बजावते. या सर्व धोक्यांची उदाहरणे पाहू या. संध्याकाळच्या पावसाचा अंदाज न आल्यामुळे छत्री न घेता बाहेर पडणे, भिजणे आणि आजारी पडणे. जपानमध्ये आलेल्या त्सुनामीमुळे युरोप आणि अमेरिकेतील कारखान्यांचे उत्पादन सुटय़ा भागांअभावी मंदावणे, मारुती मोटारच्या कारखान्यात कामगार आंदोलनामुळे बाजारपेठेतील इतर स्पर्धकांचा फायदा होणे इत्यादी व अशा कारणांमुळे उद्योगधंद्याची प्रतिष्ठा पणाला लागते. त्याचा परिणाम म्हणून मोटार उद्योगात परकीय गुंतवणूकदारांना भारतात पैसे गुंतवणे धोक्याचे वाटू लागले. धोक्यामधील अनपेक्षितता आणि अनिश्चितता अशी प्रत्ययाला आली. म्हणूनच धोक्यांची यादी करा आणि कोणते धोके टाळता येतील, त्याची नोंद करा व जे धोके अटळ आहेत ते सुसह्य़ करण्यासाठी योजना आखा आणि शेवटी विमा कंपनीचा सल्ला घ्या. अशी कृतीच तुम्हाला योग्य दिशा दाखवेल.
अभय गुजर
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी ,
 मुंबई २२  office@mavipamumbai.org

नवनीत : इतिहासात आज दिनांक.. १८ डिसेंबर
१७७६ सदाशिवरावभाऊ पेशवे यांचा तोतया ‘सुखलाल’ याचे मेखसूने डोके फोडून शेवट करण्यात आला. पानिपतच्या युद्धात वीरमरण पत्करलेल्या सदाशिवरावभाऊ पेशवे, जनकोजी शिंदे, यशवंतराव पवार यांचे तोतये उद्भवले. शिंदे आणि पवार यांच्या तोतयांचे बिंग फुटले पण बुंदेलखंडच्या छत्रपूरजवळ कनोल गावी सुखलाल नावाचा इसम भाऊंचा तोतया म्हणून वावरत राहिला. घर सोडून, गोसाव्याचा वेश घेऊन तो नरवर येथे आला असता दोन दक्षिणी गृहस्थांनी त्यास ‘तू भाऊसाहेबासारखा दिसतोस’ असे सांगितले. तो इन्कार करीत असता बळे-बळे त्यास घोडय़ावर चढविले. त्याच्या नावे शिक्के-निशाण केले. स्वत:कडे बाभेगिरी, दिवाणगिरी, चिटणीसी, फडनिसी पाहून घेतली. दोन वर्षांतच प्रकरण वाढले. अनेकांनी पाठिंबा दिला. अखेर १२ ऑगस्ट १७६४ मध्ये मल्हारराव होळकर यांनी खानदेशात जयनगर येथे हजीर मजालस भरवून खोटा ठरविले. पुण्यास पाठविले. थोरल्या माधवराव पेशव्यांनी  बुधवार पेठेच्या हौदापाशी उभा करून पुणेकर नागरिकांस खरे खोटे ठरविण्याची संधी दिली. रामशास्त्री प्रभुणे यांनी निर्णय दिला. तोतया असल्याचे सिद्ध झाले.  महादजी शिंदे व नाना फडणीस यांनी या प्रकरणाचा शेवट केला.
१८५६ १९०६ च्या नोबेल पारितोषिकाचे विजेते भौतिकशास्त्रज्ञ सर जोसेफ जॉन थॉमसन यांचा जन्म.
१९७०बिहारमधील दरोगाप्रसाद राय सरकार अल्पमतात आल्याने मंत्रिमंडळ गडगडले.
डॉ. गणेश राऊत  –  ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची : साहित्य, कलांचा आश्रयदाता हर्ष
हर्षवर्धनाने कनोज येथे राजधानी केली व त्यानंतर केलेल्या लढायांमध्ये बिहार, पूर्व पंजाब (हरियाणा), ओरिसाचा काही भाग जिंकला. त्याचे साम्राज्य आता बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत, उत्तरेला हिमालयापासून दक्षिणेला नर्मदा नदीपर्यंत विस्तार पावले होते. अनेक विजय प्राप्त केल्यानंतर मात्र सन ६३० मध्ये कर्नाटकातील वातापीचा चालुक्य राजा पुलकेशी दुसरा याने आक्रमण करून हर्षवर्धनचा पराभव केला. पुलकेशीबरोबर झालेल्या तहात हर्षवर्धनला राज्यविस्तारावर बंधने येऊन दक्षिणेस नर्मदेपर्यंतच राज्याची सीमा ठरली.
हर्षवर्धन हा शैवधर्मीय होता. तरीही दुसऱ्या धर्माबद्दल आदर राखून होता. वृद्धापकाळात त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. त्याच्या राज्यात अनेक ठिकाणी त्याने स्तूप उभारले. नालंदा विद्यापीठाला अनुदाने देऊन राजाश्रय दिला. संस्कृत साहित्यिकांना त्याने उत्तेजन देऊन स्वत: नागनंदा, रत्नावली, प्रियदर्शिका ही तीन नाटके लिहिली. बाण हा विद्यान त्याच्या दरबारात होता. बाणाने कादंबरी, हर्षचरित या दोन साहित्यकृती तयार केल्या. इ. स. ६४१ मध्ये त्याने शिष्टमंडळ चीनच्या सम्राटाकडे पाठविले होते. त्यावेळी भारताचे चीनच्या दरबारात पहिले राजनैतिक संबंध जोडले गेले. ६४४ साली ह्य़ूएन त्संग हा चिनी प्रवासी भारतात आला. त्या निमित्ताने बौद्ध पंडितांचे त्याने संमेलन भरविले होते. ह्य़ूएन त्संग पुढे भारतात चौदा वर्षे राहिला. हर्षवर्धनने प्रयाग येथील बौद्ध पंडितांच्या संमेलनात स्वत:ची व्यक्तिगत मालमत्ता देणगी म्हणून दिली. प्रशासनासाठी राज्याचे अनेक भाग करून प्रत्येक भागावर लोकपाल (गव्हर्नर) नेमला. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा एक षष्टय़ांश भार शेतसारा म्हणून सरकारजमा करावा लागे. हर्षवर्धनने चांगले प्रशासन देऊन ४१ वर्षे राज्यकारभार पाहिला. ६४७ साली त्याचा मृत्यू झाला पण त्याला कोणीही वारस नसल्याने त्याच्यानंतर साम्राज्याची अनेक शकले झाली.
सुनीत पोतनीस  – sunitpotnis@rediffmail.com

मनमोराचा पिसारा.. : कबीरांचं मानसशास्त्र
कबीरजींनी अनेक दोहे रचले, पदं लिहिली आणि गात गात ते लोकांपर्यंत पोहोचवत गेले. प्रस्थापित शिक्षण, गाथा पांडित्य यांचा गंध नसलेल्या या साध्या सुध्या विणकरानं, जगाला खूप ज्ञान आणि समज दिली.
विज्ञानशाखा म्हणून मानसशास्त्राचा उदय होण्यापूर्वी कबीरजींनी मनावर चिंतन केलं. मनाचं स्वरूप जाणलं आणि त्यावर दोहे लिहिले.
कुंभै बांधा जल रहै, जल बिन कुंभ न होय
ज्ञानै बांधा मन रहे, मन बिनु ज्ञान न होय.
मन म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम आणि मन म्हणजेच हार्डडिस्क, मन म्हणजेच मेमरी आणि मन म्हणजेच मनाच्या विविध क्षमता, असं कबीर म्हणतात. त्या काळी संगणकीय शब्द नव्हते इतकंच. कुंभामध्ये पाणी साठवता येतं कारण कुंभाला मातीच्या भिंती असतात. हा कुंभ बनविण्याकरिताही मातीत पाणी मिसळावं लागतं. पाणी, कुंभ आणि माती यांच्या परस्परपूरक नात्यामधून ते शक्य होतं. मन बांधण्याकरिता, ज्ञानाच्या आणि आत्मभानाच्या भिंती लागतात. परंतु, ज्ञान आणि आत्मभान या संकल्पनाही ‘मन’ या ऑपरेटिंग सिस्टमशिवाय निर्माण होत नाहीत. ज्ञानार्जनासाठी मन हवं आणि मन जाणण्याचे ज्ञान हवे. ज्ञान, मन आणि त्यांना जोडणाऱ्या मनाच्या प्रक्रिया या परस्परपूरक गोष्टी असाव्या लागतात. कबीरजींना मनाचं कार्य कसं चालतं याची चांगली जाण होती.
मन आणि शरीर यांचं नातं कसं असतं? ते नातं सशक्त, नि परस्परसाहाय्यक असलं पाहिजे. तर मनाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शरीर साथ देतं आणि शारीरिक श्रम करण्यासाठी मनाचा पाठिंबा मिळतो. परंतु, मन आणि शरीर एकमेकांशी असं नातं जुळवत नाहीत. उलट एकमेकांना खोडय़ात टाकतात. विचलित करतात. उदा.
काया देवल मन धजा, विषय लहर फहराय
मन चलते देवल चले, ताका सरबस जाय
आपलं शरीर म्हणजे एक देवालय आहे. त्या देवळावर ‘मन’ नावाची ध्वजा फडकते. हे मन विषयासक्त होतं, ऐहिक सुखाला लोलुप होतं आणि अस्थिर होतं, विचलित होतं. ज्या देवळावरची ध्वजा अस्थिर आहे, ज्या देवळावर स्वार्थी मनाची ध्वजा फडकते आहे, ते देऊळ तितकंच अस्वस्थ राहतं. अवघं जीवन चंचल मन आणि अस्थिर शरीरामुळे सर्वनाशाकडे वाटचाल करतं.
कबीरजींना, मन आणि शरीर या दोन संकल्पना आहेत, त्या जणू काही स्वतंत्रपणे आपापलं कार्य करतात, या सार्वत्रिक गैरसमजाची जाणीव होती. मन आणि शरीर या वस्तुत: स्वतंत्र गोष्टी वाटत असल्या तरी त्या एकजीव आणि एकजिनसी असतात याचं भान होतं. मन आणि शरीर यांच्या अद्वैतावर त्यांनी इथे भाष्य केलं आहे.
मनाच्या अस्थिरतेचं स्वरूप जाणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मन दुभंग होण्याची अवस्था हा मानसिक विकार असावा याची त्यांना अटकळ होती. कबीरजी म्हणतात-
धरती फाटै मेघ मिलै, कपडा फाटै डौर
तन फाटैको औषधि, मन फाटै नहिं ठौर.
आणि
मेरे मन में परि गई ऐसी एक दरार
फाटा फटिक पषान ज्यूं, मिलै न दूजी बार.
कबीरजींच्या काळात त्यांना गवसलेल्या सत्याला आता नवं वळण लागलंय. कबीरजी, आय विश यू वेअर बॉर्न अगेन.
फाटलेल्या जमिनीला पाऊस सांधतो, फाटक्या कपडय़ाला दोर  शिवतो, जखमी शरीरावर औषध आहे पण मन फाटलं तर औषध नाही. आता आहे हं.
माझ्या मनाला (संशय नावाची) दरार पडलीय. दुभंगलेला दगड जोडता येत नाही, तद्वतच तुटकं मन साधता येत नाही. कबीरजी प्रयत्न चाललेत या दिशेनं तुमच्या सदिच्छा हव्यात. मनमोराला!
डॉ. राजेंद्र बर्वे  –  drrajendrabarve@gmail.com

First Published on December 18, 2012 4:06 am

Web Title: navneet 20