धोका व्यवस्थापनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आपण कल्पना करूया की, राणी क्लिओपात्राच्या नाकाला इजा होऊन ते नकटे झाले असते तर तिच्या आयुष्यात काही अर्थ राहिला असता का? हाच प्रकार गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गळ्याला किंवा आवाजाला काही धोका झाला असता तर एवढे कान तृप्त करणारे संगीत आपल्याला ऐकायला मिळाले असते का? सचिन तेंडुलकरचे हाताचे कुठलेही बोट फ्रॅक्चर झाले तर त्याच्या फलंदाजीची मजा आपल्याला लुटता आली असती का? शेतीला पाण्याच्या पाळ्या व्यवस्थित दिल्या न गेल्यास किंवा पावसाने दडी मारल्यास शेतातले पीक मार खाणार व त्याचा परिणाम शेतकऱ्याच्या उत्पन्नावर होणार. मग त्याचे आयुष्य धोक्यात येणार. या प्रकारचे सर्व प्रकारचे धोके ओळखून त्यांचे व्यवस्थापन करून ठेवले की, आपापल्या क्षेत्रात यशस्वी होत राहणार. हेच तंत्र सर्व प्रकारच्या संस्थांना लागू पडते.
अगदी पानवाल्याच्या छोटय़ाशा टपारीपासून ते लघु-मध्यम आकाराच्या उद्योगापर्यंत सर्वाना धोका व्यवस्थापन करण्याची गरज आहे. आता कुठे उद्योगात, व्यावसायिक संस्था-कार्यालयात, मोठय़ा शाळा-महाविद्यालयात यादृष्टीने पावले उचलायला सुरुवात झाली आहे. पण आपण बरेच मागे आहोत. साध्या पानवाल्याचे दुकान ज्या रस्त्यावर आहे तिथे येऊन मालवाहू टेम्पो/ट्रकने धडक दिली तर तो पानवाला आयुष्यातून उठणार नाही का? कारण त्याचे रोजी-रोटी कमावण्याचे साधन या अपघाताने नष्ट झाले असते. नदीकिनारी असलेल्या घरा-दुकानांचे पुरामुळे होणारे नुकसानही त्या-त्या नागरिक/व्यापाऱ्यांना भारी पडणारे ठरते. त्यातून पुन्हा उभे राहणे जवळपास अशक्य होते. सन २००५ मधील           २६ जुलैच्या मिठी नदीच्या पुरात याचा अनुभव मुंबईकरांनी घेतला आहे. एखाद्या शिंप्याच्या दुकानाला आग लागली तर घेतलेली महत्त्वाची ऑर्डर वेळेत कशी पूर्ण होणार? दैनंदिन जीवनातील अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळेच सध्याच्या जगात पावलोपावली अडचणी येऊन कमी-जास्त नुकसान होऊ शकते, याची जाणीव असायला हवी.
अभय गुजर
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२  
office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा.. -मिष्किल मिकॅश
– इंग्लिश माणूस एकटा असला तरी व्यवस्थित एका माणसाची रांग लावतो.
– ऑन द कॉण्टिनंट (म्हणजे युरोप खंड, इंग्लंड सोडून बाकीचे युरोप देश म्हणजे कॉण्टीनंट, ही खास इंग्लिश टिपण्णी!) लोक टेबलावर उत्तम जेवण जेवतात. इंग्लिश माणसाना फक्त उत्तम टेबल मॅनर्स असतात.
– सर्वसामान्य, अशिक्षित इंग्लिश माणूस ग्रीक आणि लॅटिन शब्दांचा मुक्त वापर करून आपले ज्ञान पाजळतात. कारण त्यांचा अर्थ त्यांना समजत नसतो.
– ऑन द कॉण्टिनंट, लोकाना आयुष्य हा खेळ आहे असं वाटतं. इंग्लिश लोकांना मात्र फक्त क्रिकेटच खेळ वाटतो.
-तुम्ही कुत्रा पाळा, पण खरं म्हणजे मांजरंच आपल्याला पाळतात. मांजरांचं माणूस हा उपयुक्त पाळीव प्राणी आहे, असं मत असतं.
– वन्स अ फॉरेनर, आल्वेज अ फॉरेनर.
– कोणाची ओळख करून देताना त्या व्यक्तीचा चांगला परिचय होणार नाही याची काळजी घ्या. कोणाचाही ओळख देण्याचा उद्देश, त्याची ‘आयडेंटिटी’ लपवणं हाच असतो.
सर्वावर जगप्रसिद्ध कडी म्हणजे..
– ऑन द कॉण्टिनंट, पीपल हॅव सेक्स लाईफ इंग्लिश हॅव हॉट वॉटर बॉटल!
मित्रा, चेहऱ्यावर किंचित स्मितरेषा उमटवणारी ही वचनं हा खास ब्रिटिश ह्यूमरचा उत्तम नमुना मानली जातात. आता पुस्तकांची ही यादी पाहा :
हाऊ टु बी एलिअन,  हाऊ नॉट टु बी एलिअन,  हाऊ टु बी डेकडंट, हाऊ टु टँगो (द. अमेरिका)
हाऊ टु बी पुअर (गाइड टू स्पिरिच्युलिटी)
आणि इतर अनेक सेल्फहेल्पवर असावीत अशा शीर्षकांची पुस्तकं लिहिणारा आणि इथे मांडलेल्या अनेक नर्म विनोद वचनांचा लेखक जॉर्ज मिकॅश हा माझा अत्यंत आवडता लेखक होता.
विलक्षण निरीक्षणशक्ती, चाणाक्षबुद्धी, हजरजबाबीपणा, ही मिकॅशची वैशिष्टय़ं. १९४६ साली त्याने ‘हाऊ टु बी एलिअन’ नावाचं ब्रिटिश समाजाच्या चालीरीती नि स्वभाववैशिष्टय़ं खुसखुशीत पद्धतीने सांगणारं पुस्तक लिहिलं. आणि तो प्रसिद्ध झाला. तो मूळचा हंगेरियन, बुडापेस्टवासी. युद्धपत्रकार म्हणून इंग्लंडमध्ये आला. परका परका म्हणताना स्थानिक झाला. इंग्लिश लोकांकडे त्रयस्थ परकेपणानं पाहात, त्यानं पुढे अनेक पुस्तकं लिहिली. इंग्लिश मंडळी परक्यांकडे ‘हिणकस माणसं’ म्हणून पाहातात आणि स्वत:च्या स्वभावातला हिणकसपणा सिद्ध करतात. असा त्यांचा दावा. परंतु ही गोष्ट त्यांना त्यांच्याच भाषेत, त्यांच्याच शैलीत तिरकस विनोद करून सांगितली तर त्या पुस्तक आणि लेखकावर बेहद्द खुष होण्याचा दिलदारपणा ही इंग्लिश लोक दाखवतात.  वैचारिक औदार्याच्या या नमुनेदार स्वभावावर मिकॅशने पुन्हा पुन्हा लिहिलं. त्याचं लँड ऑफ रायझिंग येन (जपान), अन् युनायटेड नेशन्स (यू एन) वरील पुस्तकं प्रचंड लोकप्रिय आहेत. अनेक भाषांत त्यांची भाषांतरं झाली आहेत. यातल्या काही वचनांची ‘अपूर्वाई’ मराठी वाचकांना राहिली नाही.
मिकॅशनं शब्दांवर कोटय़ा केल्या नसून, शब्दांर्थावर केल्या आहेत. मिकॅशचं कोणतंही पुस्तक, कोणत्याही पानावर वाचायला सुरुवात कर, मित्रा, विविध व्यक्तींच्या वल्लीपणाचे अनेक नमुने वाचायला मिळतील. ‘सेक्स लाईफ’वरच्या वचनावर आणखी काही मखलाशी? असं विचारल्यावर मिकॅश मिष्कीलपणे म्हणाला,
‘येस, इंग्लिश माणसानं प्रगती केलीय.
(गरम पाण्याच्या पिशवी ऐवजी) तो आता विजेचं ब्लॅकेट वापरतो.’
डॉ. राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com

इतिहासात आज दिनांक.. – १५ डिसेंबर
१९११ ‘नवी दिल्ली’च्या पायाभरणीचा समारंभ पंचम जॉर्ज यांच्या हस्ते झाला.
१९४३ अमेरिकन जाझ संगीतकार फॅट्स वाल्लेर यांचे निधन.
१९५० स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान, पोलादी पुरुष या पदवीने गौरविले गेलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी वल्लभभाई पटेल यांचे निधन. ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातमधील खेडा गावातील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बॅरिस्टर पदवी मिळवून वकिली करीत असताना ते स्वातंत्र्य चळवळीत महात्मा गांधी यांच्या प्रभावाने आले. १९१७-१८ मधील खेडा सत्याग्रह. १९२३ मधील झेंडा सत्याग्रह, १९३०चा मिठाचा सत्याग्रह यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. संघटनात्मक आणि रचनात्मक कामावरील त्यांची पकड पाहून गांधीजींनी त्यांना निकटचे स्थान दिलेले शेवटपर्यंत. गुजरात विद्यापीठाची स्थापना, गुजरातमधील वेठबिगार पद्धतीवर नियंत्रण आणणे, पाणीपुरवठय़ाच्या योजना मार्गी लावणे, पूरग्रस्तांचे पुनर्वसन करणे, सोमनाथ मंदिरातील भेदभाव संपविणे या गोष्टी त्यांनी नेतृत्वाच्या सुरुवातीच्या काळात केल्या. यात त्यांना यश मिळाले. बाडरेलीची चळवळ, कायदेभंग चळवळ, भारत छोडो आंदोलन, हैदराबाद, जुनागढ, काश्मीर संस्थान यांचा प्रश्न सोडविणे आणि याशिवाय स्वातंत्र्यपूर्व काळातील जवळपास साडेपाचशे संस्थाने भारतात विलीन करणे ही त्यांची अजोड कामगिरी आहे. यामुळेच लंडनच्या ‘टाइम्स’ने त्यांना बिस्मार्कपेक्षा श्रेष्ठ राजकारणी ठरविले.
प्रा. गणेश राऊत – ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची -ब्रह्मदेश , बर्मा .. म्यानमार!
भारताचा एक शेजारी देश ज्याला आपण भारतीय लोक ‘ब्रह्मदेश’ म्हणून ओळखतो, त्याने आपले मूळचे प्राचीन नाव ‘म्यानमार’ धारण केले आहे. या देशाने आपले अधिकृत नाव आणि वापरातले नावही अनेकदा बदलले आहे. इथल्या स्थानिक भाषेत लेखी व बोली असे दोन ठळक प्रकार आढळतात. इथल्या स्थानिक भाषेत या देशाचे अधिकृत नाव म्यानमा असून, वापरातील नाव ‘बामा’ आहे. सन ११९०च्या एका शिलालेखानुसार या देशाचे नाव ‘म्रानमा’ असे होते. भारतीयांनी याचे नाव ब्रह्मदेश हे ठेवले होते ते बहुधा म्रानमा या नावावरूनच ठेवले असावे. सम्राट मिंगडॉन मिन हा स्वत:चा उल्लेख नेहीम ‘किंग ऑफ म्यानमा पीपल’ असा करी.
पोर्तुगीजांनी या देशाला ‘बिर्मानिआ’ असे नाव ठेवले होते. अठराव्या शतकात या देशावर ताबा मिळविल्यावर ब्रिटिशांनी बिर्मानिआचे ‘बर्मा’ केले. त्यामुळे १९४८ साली स्वतंत्र होताना या देशाने रिपब्लिक ऑफ बर्मा असे नाव धारण केले. सारख्या बदलत्या नावांमधून सुधारित नाव तयार करण्यासाठी १९८९ साली तेथल्या लष्करी राजवटीने एक आयोग नेमला. त्या आयोगाने ‘म्यानमा’ या प्राचीन नावात र ची भर घालून ‘म्यानमार’ हे नाव निश्चित केले. ब्रह्मदेशच्या बोली भाषेत व लेखी भाषेत फरक आहे. लष्करी राजवट बोली भाषेपेक्षा लेखी भाषेला अधिक महत्त्व देणारी असल्याने त्यांना बोली भाषेतल्या बर्माशी साम्य असलेल्या बामा या नावाबद्दल पसंती नव्हती. बर्मी भाषेत र ऐवजी य चा वापर केला जातो. त्याप्रमाणे रंगूनचे ‘यंगून’ झाले. म्यानमार हा देश संयुक्त राष्ट्रसंघाचा सभासद आहे. त्यांच्या नामांतराला संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली असली तरी अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा हे देश म्यानमारचा उल्लेख बर्मा म्हणूनच करतात.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com