16 January 2018

News Flash

मनमोराचा पिसारा..चाफा बोलेना

मनमोराचा पिसारा..चाफा बोलेना ‘चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या खुलेना..’ या गाण्यातला ‘चाफा’ गेली कित्येक र्वष रुसला होता. माझ्यावर, गाणं आवडत होतं, हृदयाला स्पर्शून जात

मुंबई | Updated: December 14, 2012 4:49 AM

मनमोराचा पिसारा..चाफा बोलेना
‘चाफा बोलेना, चाफा चालेना,
चाफा खंत करी काही केल्या खुलेना..’
या गाण्यातला ‘चाफा’ गेली कित्येक र्वष रुसला होता. माझ्यावर, गाणं आवडत होतं, हृदयाला स्पर्शून जात होतं; पण गुंगारा देत होतं. समजत होतं, पण उमजत नव्हतं. स्वरातलं माधुर्य मनाचा ठाव घेत होतं, पण सुरांच्या मांडणीतलं रहस्य उमगत नव्हतं आणि एक दिवस चाफा फुलला, खुलला, दरवळला, उमगला आणि अजून तसाच टवटवीत आहे. वर्डस्वर्थची डॅफोडिल्स तसा चाफा माझा.. कवी बी म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते यांच्या मनात एखाद्या विलक्षण क्षणी या गाण्याचं बीज रुजलं असावं. त्यांनी गोड शब्दांत, शब्दबंबाळ न करता, गूढपणाचं ग्रेसफूल अवडंबर न करता गाणं लिहिलं. वसंत प्रभूंनी संगीत दिलं आणि लतादीदींनी ते गायलं.
यातला चाफा वेगवेगळ्या अर्थानं फुलतो. तो प्रियकर असतो, खेळसवंगडी असतो, साथीदार असतो. मुख्यत: जीवनप्रवासातला सहप्रवासी असतो. नाहीतर चाफा म्हणजे मित्रा, तुझंच मन. खंतावणाऱ्या, थकणाऱ्या, निराश होणाऱ्या मनाचं हे गाणं आहे. गाण्यातल्या तीन कडव्यांत जीवनाचा प्रवास मांडलाय. बालसुलभ मस्तीसाठी आंब्याचं वन असतं, निसर्गाशी एकतान होते ती मैनेच्या गाण्यांसमवेत. निष्पाप आणि मौजमजेचा काळ सरतो आणि तारुण्याचा केवडा अंगी दरवळतो. तारुण्यसुलभ आसक्ती नागाच्या रूपानं अंगात सळसळते. शारीरिक सुखाच्या अनुभवानं देहभान गळतं. मन खेळत राहतं, प्रणयाच्या रासक्रीडा. संसारातला सुख-दु:खाचा झिम्मा. कधी आनंद तर कधी निराशा यांच्याशी मनसोक्त खेळण्याचा प्रौढकाळ.
मित्रा, जीवनपटातले हे प्रसंग उलगडतात तरी मनाला स्थिरता नाही. कारण या दैहिक जाणिवांपलीकडे असतो, मानवी जगण्यातलं श्रेयस. जीवनाचा अर्थ समजून घेण्याची ध्येयासक्ती. क्षणभर थांबून, लतादीदी मोठय़ा खुबीने गाण्यातल्या आध्यात्मिक वळणाचा केवळ सुरांनी आविष्कार करतात. जीवनाचं सार्थक शुद्ध नि:संग रसपानात आहे. विषयासक्तीत अडकतात ते किडे. मित्रा, माझ्या मना या जाणिवेनं आपण मुक्त होऊ. आनंदित होऊ. या दहा दिशा आटून जातील इतक्या अवकाशात आपण नाचू नि बागडू!
तुझं नि माझं द्वैत आता लोपलं. अशा अद्वितीय अद्वैत जाणिवेच्या क्षणी तुझ्या नि माझ्या स्वतंत्रपणाची जाणीव विरली. शरीर आणि मनाच्या मीलनाचा तो क्षण केवळ विलक्षण. कवी बी, कसं सुचलं हो? दीदी कुठून आणलात तो स्वर?
मनमोर थक्क झालाय..

चाफा बोलेना
चाफा बोलेना चाफा चालेना,
चाफा खंत करी, काही केल्या फुलेना
गेले आंब्याच्या वनी,
म्हटली मैनसवे गाणी
आम्ही गळ्यात गळे मिळवून रे
गेले केतकीच्या बनी
गंध दरवळला वनी
नागासवे, गळाले देहभान रे
चल ये रे ये रे गडय़ा,
नाचू उडू घालू फुगडय़ा
खेळू झिम्मा झिम पोरी झिम
हे विश्वाचे आंगण
आम्हा दिले आहे आंदण
उणे करू आपण दोघेजण रे
जग विषयाचे किडे
यांची धाव बाह्य़ाकडे
आपण करू शुद्ध रसपान रे
चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटून
कोण मी चाफा? कोठे दोघेजण रे?
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

कुतूहल : जोखीम व्यवस्थापन-२
जोखीम व्यवस्थापनाची चौथी पायरी आहे ती ‘धोक्याचा स्वीकार करणे’. उदाहरण म्हणून मुंबईकरांच्या जीवनातील लोकलचा प्रवास लक्षात घ्या. या प्रवासात आपल्याला अनेक धोके पत्करावे लागतात, पण आपल्या रोजीरोटीचा प्रश्न त्याच्याशी जोडलेला आहे. त्यामुळे लोकल प्रवास टाळणे आपल्याला शक्यच नाही, पण हा प्रवास कमी धोक्याचा होण्यासाठी लवकर निघणे, दरवाज्यात न लटकणे, एखादा गट तयार करणे- जो आणीबाणीच्या प्रसंगी मदत करू शकेल. ही झाली धोका व्यवस्थापनाची तंत्रे. पण ही पाळता आली नाहीत तर लोकलमधून पडून जायबंदी होण्यापासून जीव गमवावा लागण्यापर्यंत काहीही होऊ शकते. याचा प्रत्यय आपल्याला नेहमीच येत असतो. म्हणूनच पाचवी पायरी आहे ती धोका हस्तांतर करण्याची. हे हस्तांतरण आपण विमा उतरवून करू शकतो. आपल्या जीवनाचा विमा, घराचा विमा, वाहनाचा विमा, आरोग्यासाठी विमा, वैयक्तिक विमा अशा पद्धतीत आपण सुरक्षित राहू शकतो. आत्ताच्या स्पर्धेच्या वातावरणामुळे हे सर्व प्रकारचे विमे उतरवायला तुम्हाला तुमच्या गरजा पाहून आणि चौकशी करून मोजक्या रकमेत काम होऊ शकते. म्हणजेच धोका हस्तांतरणाची पायरी पार केली, असे म्हणता येईल. पूर्वी लग्नसमारंभात आपण जेवणाची जबाबदारी घरातल्या अनुभवी व्यक्तींकडे सोपवीत होतो. त्याकरिता हवे ते कष्ट घेत होतो,  पण आता विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मनुष्यबळाची कमतरता आली; तसेच अशी उस्तवारी करण्यापेक्षा ‘कॅटरर’ गाठून त्याच्याकडे ही जबाबदारी आपण सोपवायला लागलो आहोत.
पूर्वीच्या तुलनेत आता परिस्थिती खूप बदलली आहे. दिवसेंदिवस धोका असणारे मार्ग आपल्याला वापरावे लागत आहेत. त्याला काही ठोस पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे धोक्याची कल्पना करून त्यामुळे होणाऱ्या नुकसानीचा अंदाज घेऊन त्या-त्या धोक्याचा विमा उतरविणे गरजेचे झाले आहे. एवढेच नव्हे तर ते सहजी शक्य झाले आहे. सर्वत्र असलेल्या महागाईच्या वातावरणात धोक्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेता विम्याचा हप्ता मात्र मर्यादित असतो. आपण जर धोक्याचे व्यवस्थापन केले तर सध्याच्या चिंताग्रस्त वातावरणात आपल्याला काही दिलासा मिळू शकेल.
अभय गुजर
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

सफर काल-पर्वाची : जोन ऑफ आर्क
दि मेड ऑफ आरलीन्स, मेड ऑफ हेवन्स वगैरे विशेषणांनी नावाजलेली जोन ऑफ आर्क ही मूळ फ्रान्समधील एका शेतकऱ्याची मुलगी. पूर्व फ्रान्समध्ये सन १४१२ मध्ये जन्मलेल्या जेन डी आर्कला तिच्या वयाच्या बाराव्या वर्षी प्रथम एका शेतात प्रकाशमान झालेल्या काही आकृत्या दिसल्या. त्या आकृत्या म्हणजे अनेक शतके पूर्वी होऊन गेलेल्या सेंट मायकेल, सेंट कॅथेरीन, सेंट मार्गारेटच्या होत्या. त्यांनी तिला दैवी संदेश दिला की वारसा हक्काच्या युद्धातून तू इंग्लंडला बाहेर काढून पदच्युत राजा डॉफीन चार्ल्स सातवा यास परत गादीवर बसव. वारसा हक्कावरून फ्रान्स व इंग्लंडच्या चाललेल्या युद्धांमध्ये फ्रान्सची लष्करी व नाविक बाजू कमकुवत असल्याने अधिक तर वेळा ते पराभूत होत होते. १४२८ सालापर्यंत झालेल्या लहानसहान लढायांमध्ये इंग्लंडने एकतृतीयांश फ्रान्समध्ये आपला अंमल बसविला होताच. १४२९ सालच्या अखेरीस इंग्लंडने फ्रेंचांच्या ऑरलीन्स या महत्त्वाच्या ठाण्याला वेढा घातला. तहामुळे दुबळा झालेला पदच्युत राजा चार्ल्स सातवा आणि सततच्या पराभवामुळे नामोहरम झालेले त्याचे समर्थक हतबल असताना जोन या दैवी गुण असलेल्या तरुणीने पारतंत्र्याच्या छायेत असलेल्या फ्रान्सची सुटका केली.
जोनने हतबल चार्ल्स व सेनापती यांना दैवी संदेशांविषयी सांगून ऑरलिन्सला पडलेल्या इंग्लिश फौजेच्या         वेढय़ातून सुटका करण्यासाठी काही सूचना केल्या. आश्चर्य म्हणजे त्या सूचनांचे पालन करून फ्रान्स वेढा फोडण्यात यशस्वी झाले. या पुढील सर्व लढय़ांमध्ये जोनने काही वेळा स्वत: आघाडीवर राहून नेतृत्व केले व काही वेळा सल्ला दिला. जोनने सैनिकांचे मनोधैर्य वाढवून अनेक विजय मिळवून दिले. प्रत्येक वेळी जोन आपल्याला देवाकडून मार्गदर्शन मिळते, असे सांगत असे.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

इतिहासात आज दिनांक.. १४ डिसेंबर
१९६५ चीनने नेफा प्रदेशातील लोंग्ज ठाणे पुन्हा एकदा बळकावून कुरापत काढली. भारत-चीन संघर्ष अद्याप मिटलेला नाही हे या घटनेने सिद्ध केले.
१९६७ हिंदीबरोबर इंग्रजीच्या वापरास परवानगी देणाऱ्या भारत सरकारच्या भाषा विधेयकास संसदेने प्रदीर्घ चर्चेनंतर मंजुरी दिली.
१९७७ कवी, गीतरामायणकार, कादंबरीकार गजानन दिगंबर माडगूळकर ऊर्फ ‘गदिमा’ यांचे निधन. गीतरामायणामुळे त्यांना ‘आधुनिक वाल्मीकी’ म्हणून गौरविले गेले. सांगली जिल्हय़ातील आटपाडी तालुक्यातील शेटेफळ गावी त्यांचा जन्म झाला. आटपाडी, कुंडल, औंध येथे त्यांचे शिक्षण झाले. अभंग आणि ओव्यांचा वारसा आईकडून मिळाला. महात्मा गांधी यांच्या प्रभावाने ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. या प्रभावातूनच त्यांनी ‘वंदे मातरम्’ सिनेमात ‘वेदमंत्राहुनि आम्हां वंद्य वंदे मातरम्’ गीत लिहिले. पुढे पुण्यात येऊन ‘दीनबंधू’ साप्ताहिकात नोकरी सुरू केली. आचार्य अत्रे यांना भेटण्यापूर्वी काही काळ ते विक्रेते होते. मा. विनायक यांची कोल्हापूरला भेट झाल्यावर गदिमांना मागे वळून बघावे लागले नाही. १५७ मराठी आणि २३ हिंदी चित्रपटांत ‘गदिमा’ हे नाव झळकले. कवी, अभिनेते, पटकथालेखन, संवाद, तमाशातील सवाल-जवाब यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत ते अजरामर आहेत. आकाशवाणीवरील सीताराम लाड यांच्यामुळे त्यांनी ५६ गीते असलेले ‘गीतरामायण’ लिहिले. ‘सुधीर फडके आणि गदिमा’ ही नावे महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचली.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

First Published on December 14, 2012 4:49 am

Web Title: navneet 23
  1. No Comments.