14 December 2017

News Flash

मनमोराचा पिसारा.. कंट्री रोड्स टेक मी होम..

मनमोराचा पिसारा.. कंट्री रोड्स टेक मी होम.. आपल्या गावापासूनचे ‘तुटलेपण’ हा भौगोलिक अनुभव नाही. ‘काळी

मुंबई | Updated: December 11, 2012 6:03 AM

मनमोराचा पिसारा.. कंट्री रोड्स टेक मी होम..
आपल्या गावापासूनचे ‘तुटलेपण’ हा भौगोलिक अनुभव नाही. ‘काळी आई, मोटेवरचं गाणं, गावरान मेवा, दुपारच्या टळटळीत उन्हातल्या झाडाखाली संथ रवंथ करणाऱ्या गायींबरोबर बसल्या बसल्या लागणारी डुलकी यांची सय येते आणि शहरी मन हुरहुरतं. मित्रा, यातले काही तपशील आपल्याला ग्रामीण कथांतून यापूर्वी भेटलेले आहेत. अगदी प्रत्यक्ष अनुभव नसला, तरी आपण सहअनुभूतीने सहअनुकंपित होतो. म्हणूनच जॉन डेनवरच्या गाण्यातली अपरिचित नावं, गावं परकी वाटत नाहीत. त्यामधल्या भावना जाणून डेनवरचं ‘कंट्री रोड्स टेक मी होम’ आपल्यालाही कातरल्यासारखं होतं.
जॉन डेनवरचे पिताश्री लष्करी, त्यामुळे त्यानं गावोगावी भटकंती केली. तो सदैव एखाद्या गावात डेरेदाखल होऊन आपली मुळं रुजवायला उत्सुक होता. वयाच्या अकराव्या वर्षी आजीनं दिलेली गिटार घेऊन पठ्ठय़ा गायला लागला तीच मुळी ‘कंट्री साँग्ज.’ अमेरिकेतली कंट्री साँग्ज म्हणजे आपल्याकडची गावाकडची नाती सांगणारी नॅरेटिव-कथनात्मक गाणी. हुरहुर, मित्रमैत्रिणींबरोबरचे नाजूक प्रसंग, नद्या-नाले, दऱ्या-डोंगर यांची ओढ मांडणारी ही गाणी जॉन कुठेही फुकट गायला तयार असायचा. गाण्यानं त्याला मोठं केलं. पुढे राजकारणात डेमोक्रॅटच खंदा प्रचारक झाला. विमानं उडवायचा, त्याचं प्रेम फक्त मायभूमीच्या गहिऱ्या आठवणींवर आणि गिटारवर.. मित्रा, कंट्री रोड्स टेक मी होम हे माझं अत्यंत आवडतं गाणं, यूटय़ूबवर ऐक जॉनच्या आवाजात.. मस्त फुलतो मनमोराचा पिसारा.
गावाकडच्या रस्त्यांनो. माझ्या जिवलग दोस्तांनो,
आता न्या रे मला गावी, माझ्या गावी,
माझ्या गावी स्वर्ग आला पृथ्वीवरी, उतरुनी खरोखरी भूनंदन साक्षात,
वेस्ट व्हर्जिनिआ प्रांत, नदी शेननडो खळखळे,
इथे रान, तिथे मळे, झाडेपेडे जुनी जुनी,
नदी पुराणी त्याहुनी तिच्या प्रवाही अलगद, वाहे जीवन सुखद
चिरपरिचित नित, असा ब्लूरिज पर्वत किती ब्लूरिज प्राचीन,
तिथे नदीही हो लीन
 ‘मोमा’ माउण्टचे कडे, सभोवती होती खडे
रस्ता गावाकडे वळे, जिथे माझी पाळेमुळे
इथे कोळशाच्या खाणी, क्षतविक्षत धरणी नाही निळेशार पाणी.
 नाही नीलम गगनी धूळ आसमंती काळी,
धूळ भरली आभाळी झरे प्रकाश चंद्राचा,
त्यात भास काळोखाचा तरी प्यार मला किती,
माझ्या वर्जिनिया प्रांती जीव गुंतुनिया राही,
नेत्र ओलसर होई तसा तिचा अन् माझा, आहे संपर्क रोजचा
रेडिओ स्टेशनच थेट, देते सकाळीच भेट!
पुकारतो भवताल, का न आलो येथे काल
शहराचे मायाजाल, करी जिवाला बेहाल,
 मनी दाटे हुरहुर, किती गाव राही दूर
आता न्या रे मला गावा, माझ्या गावा, माझ्या गावा. गावाकडच्या रस्त्यानो, माझ्या जिवलग दोस्त, न्या रे मला, न्या रे मला, माझ्या गावा, माझ्या गावा.
स्वैर अनुवाद- ललिता बर्वे
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

कुतूहल : सर्कशीच्या तंबूला लागणाऱ्या आगी
सर्कशीला जाणवणारा सगळ्यात मोठा धोका म्हणजे तंबूला लागणाऱ्या आगी. एक तर तंबूच्या जवळच सर्कशीतील १००-२०० लोकांचे जेवण बनत असल्याने तेथे आगीचा प्रत्यक्ष संबंध असतोच. जेवण करण्याच्या निमित्ताने इंधन म्हणून गॅस किंवा कोळसा वगैरे जे काही इंधन वापरले जाते, ते किती नीटपणे वापरले जाते, किती नीटपणे साठवले जाते यावर आग लागणे न लागणे हे खूप अवलंबून असते. सर्कशीचा तंबू कापडाचा, कॅन्व्हासचा किंवा प्लॅस्टिकचा असतो. एकदा का आग तंबूपर्यंत पोहोचली की ती आग आटोक्यात आणणे फार अवघड असते. खरे म्हणजे, तंबूला आग लागली तर ती विझविण्यासाठीची सर्व प्रकारची उपकरणे आणि साधने सर्कसच्या सामानात असतात. तंबू उभारला की त्यात जागोजागी आग विझवण्याची नळकांडी सुरक्षिततेच्या नियमाप्रमाणे व्यवस्थापकांना ठेवावी लागतातच. शिवाय हे काम नुसत्या नळकांडय़ावर अवलंबून न ठेवता फायर होज पाइप ठेवून आणि पाण्याची टाकी ठेवूनही अग्निशमनची व्यवस्था तयार ठेवावी लागतेच. सर्कस बघायला हजारभर माणसे येतात. ही माणसे बिडय़ा-सिगारेट ओढणारी असतात. ही माणसे सर्कस चालू असतानाही एवढय़ा मोठय़ा तंबूत बिडय़ा-सिगारेट्स ओढतच रहातात. ही माणसे बिडी-सिगारेटची थोटके इतके-तिकडे टाकतात आणि त्यातून सर्कशीच्या तंबूला आगी लागतात. सर्कशीच्या तंबूत अनेक प्राणी असतात. त्यांना सतत दाणा-वैरण घातली जाते. या वाळलेल्या वैरणीवर जर जळती काडी पडली तरीही आग लागण्याची शक्यता मोठी असते.
सर्कस चालू असताना जर आग लागली तर मात्र सगळ्या तंबूभर बसलेल्या लोकांची एकच धावपळ सुरू होते. ही माणसे चारही बाजूंना ८-१० फूट उंचीवर फळ्यांवर बसलेली असतात. तेथून ही माणसे वाट्टेल तशा उडय़ा मारून सैरावैरा पळायला सुरुवात करतात आणि दरवाज्यापाशी गर्दी करतात. या ठिकाणी झुंबड उडते आणि चेंगराचेंगरी होते. अशा चेंगराचेंगरीमुळे स्त्रिया, लहान मुले, वृद्ध माणसे खाली पडून जखमी होतात आणि दांडगे पुरुष मात्र पुढे पळत जातात.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

इतिहासात आज दिनांक.. ११ डिसेंबर
१९१८ साहित्याचे नोबेल पारितोषिक विजेते, रशियन बंडखोर लेखक अ‍ॅलेक्झांडर सोत्झेनिप्लिन यांचा जन्म.
१९७१ कुज्रिया, जमालपूर, मैमनसिंग मुक्त करून भारतीय सैन्यात छांब भागात पाकिस्तानला धडा शिकविला. या भागात भारताच्या सरशीने पाकची माघार.
१९८७ मराठीतील अजरामर कथाकार, अनुवादकार गुरुनाथ आबाजी उर्फ जी. ए. कुलकर्णी यांचे पुणे मुक्कामी निधन. जी. एं. चा जन्म १० जुलै १९२३ रोजी बेळगाव येथे झाला. खूप लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरविले. मामांकडे राहून त्यांनी मॅट्रिक, बी.ए. एम.ए.चे शिक्षण पूर्ण केले. मुंबई, बेळगाव, कुमठा, विजापूर, धारवाड येथे त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. अफाट इंग्रजी वाचन, चित्रकला, संगीत, पत्रलेखन, बागकाम यात त्यांना विलक्षण रुची होती. अकरा कथासंग्रह, बारा अनुवाद, एक आठवणींचे पुस्तक, शेकडो पत्रे, दोन बालांसाठीचे कथासंग्रह, त्यांच्या लेखनावर समीक्षा करणारी चौदा पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काही कथांना महाकाव्याची प्रतिष्ठा आणि व्याप्ती आहे. ‘निळासावळा’, ‘पारवा’, ‘हिरवे रावे’, ‘रक्तचंदन’, ‘काजळमाया’, ‘सांजशकून’, ‘रमलखुणा’, ‘पिंगळावेळ’, ‘कुसुमगुंजा’, ‘आकाशफुले’, ‘सोनपावलं’, ‘बखर किमची’, ‘मुग्धाची रंगीत गोष्ट’, ‘माणसे आरभाट’ आणि ‘चिल्लर’ ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची : २. शंभर वर्षांचे युद्ध
फ्रान्सच्या राजघराण्यातील वारसा हक्काच्या वादावरून १३३७ मध्ये सुरू झालेल्या युद्धात १३४७ सालापर्यंत इंग्लंडची सरशी झाली होती. त्यानंतर आलेल्या ब्लॅक डेथ या प्लेगच्या साथीने फ्रान्स व इतर युरोपची आर्थिक परिस्थिती खालावल्याने युद्ध थांबले होते. त्या काळात इंग्लंडचा राजा एडवर्ड याचा मृत्यू होऊन ब्लॅक प्रिन्स हा राजा झाला व फ्रान्सच्या फिलीपची जागा जॉन दुसरा याने घेतली. १३५६ साली ब्लॅक प्रिन्सने परत युद्ध सुरू केले. अनेक लहान-मोठय़ा लढायांमध्ये त्याने फ्रान्सचा धुव्वा उडविला. एका लढाईत जॉन पकडला गेला. ब्लॅक प्रिन्सने फ्रान्सशी तह केला. त्याला उत्तर फ्रान्सचा काही प्रदेश मागून जॉनला सोडण्यासाठी मोठी खंडणी मागितली. फ्रान्सने ती कबूल केली.
खंडणीची रक्कम गोळा करण्यासाठी जॉन फ्रान्समध्ये आला व त्याबद्दल ओलीस म्हणून काही फ्रेंच सरदार व उमराव इंग्लंडच्या राजाकडे गेले. पण थोडय़ाच दिवसांत ते सर्व वेगवेगळ्या पद्धतीने इंग्लंडमधून पळून परत फ्रान्समध्ये आले. हे कळल्यावर प्रामाणिक जॉन अजून खंडणीची रक्कम पुरेशी जमली नसल्याने परत स्वत:हून इंग्लंडच्या कैदेत गेला. कैदेतच १३६४ साली त्याचा मृत्यू झाला. ब्लॅक प्रिन्सने परत आक्रमण सुरू केल्यावर १३६० साली त्या वेळचा फ्रान्सचा राजा चार्ल्स पाचवा याने त्याच्याबरोबर तह केला. इंग्लंडने आणखी काही फ्रेंच मुलूख ताब्यात घेऊन वारसा हक्कावर पाणी सोडले. तरीही दोन्ही राज्यांत परत कुरबुरी चालू होत्याच. इ.स. १३७० ते १४०० या काळात चार्ल्स पाचवा(फ्रान्स)ने लहान-मोठे विजय मिळविले व गमावलेला काही प्रदेश परत मिळविला. पूर्व फ्रान्समध्ये असलेले बरगंडी हे राज्य इंग्लंडच्या राजाला पाठिंबा देत होते व त्यामुळे इ.स. १४०० ते १४२९ या काळात बरगंडीचा राजा जॉन व फ्रान्सच्या घराण्याचे समर्थक यांत झगडे होत राहिले.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

First Published on December 11, 2012 6:03 am

Web Title: navneet 29