04 March 2021

News Flash

कुतूहल – ऑपरेशन थिएटरमधील सुरक्षितता

ऑपरेशन थिएटरमध्ये र्निजतुकीकरण सर्वात महत्त्वाचे. हे शास्त्रीय पद्धतीने केले जाते व तपासले जाते. ऑपरेशन थिएटरला आत-बाहेर करायला दोन दारांची पद्धत असते, म्हणजे बाहेरची हवा

| December 3, 2012 10:49 am

ऑपरेशन थिएटरमध्ये  र्निजतुकीकरण सर्वात महत्त्वाचे. हे शास्त्रीय पद्धतीने केले जाते व तपासले जाते. ऑपरेशन थिएटरला आत-बाहेर करायला दोन दारांची पद्धत असते, म्हणजे बाहेरची हवा परस्पर आत जात नाही. थिएटरमध्ये जाण्याअगोदर पादत्राणे बाहेर काढावी लागतात व आत जाण्यासाठी वेगळी पादत्राणे असतात. कपडे बदलायला वेगळी खोली असते. आत जाणाऱ्या सर्वानी आपले कपडे बदलून र्निजतुक केलेले कपडे, डोक्यावर व तोंडावर मास्क आणि हातात हातमोजे घालून थिएटरमध्ये प्रवेश करायचा. हे, वापरा व फेका (डिस्पोजेबल) या पद्धतीचे असतात. थिएटरमध्ये सर्व स्टाफ अशा पद्धतीने र्निजतुकीकरण झालेल्या कपडय़ातच वावरत असतो. दिवे हिरव्या व र्निजतुकीकरण झालेल्या कव्हरमध्ये गुंडाळलेले असतात. ऑपरेशन थिएटरमध्ये वातानुकूलन असते, त्यामुळे दारे-खिडक्या बंद असतात व बाहेरची हवा आत येत नाही.
होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी सर्व उपकरणे एका ट्रॉलीवर र्निजतुकीकरण केलेल्या कापडावर क्रमवारीने लावलेली असतात. सर्जनना लागतील तशी ती उपकरणे त्यांचे साहाय्यक देतात. वापरून झाल्यावर ती उपकरणे पुन्हा त्याच ठिकाणी ठेवतात. म्हणजे ऑपरेशन झाल्यावर सर्व उपकरणे जागेवर असल्याची नोंद होते.
ऑपरेशन करताना रक्तस्राव थांबवायला, पोटातील आतडी झाकायला गॉजचे स्पंज वापरतात. त्यांच्या एका टोकाला नाडी शिवलेली असते व नाडीच्या टोकाला चिमटा लावलेला असतो. ऑपरेशन संपल्यावर हा स्पंज पोटातून काढून बादलीत टाकतात व शेवटी त्या स्पंजचीही मोजणी होते. सर्व बरोबर असल्याची खात्री झाल्यावरच पोट बंद करतात. ही खात्री विशेषत: छाती, पोट यांसारख्या पोकळीच्या शस्त्रक्रियेबाबत करावी लागते. पूर्वी काही शस्त्रक्रियेत स्पंज राहिल्याच्या केसेस झाल्या.
ऑपरेशन टेबलावरून रुग्णाला ट्रॉलीवर ठेवताना फार जपावे लागते. रुग्ण अर्धवट शुद्धीवर असतो, त्यामुळे स्नायूंमध्ये ताण निर्माण होत नाही व रुग्णाकडून साहाय्य मिळत नाही. त्याला उचलून हळूहळू सरकवत ट्रॉलीवर आणावे लागते. त्या वेळी सलाइन, रक्ताच्या नळ्या जपाव्या लागतात. तसेच ऑक्सिजनचा मास्कही सांभाळावा लागतो. ट्रॉलीवरून वॉर्डमधल्या बिछान्यावर ठेवतानाही हीच कसरत करावी लागते.
डॉ.शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी,मुंबई २२  
office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा..- स्मरण  – विस्मरण
मानस, मानस, बरी आठवण झाली बघ. खूप दिवस विचारायचं होतं, पण विसरून गेलो. आता विचारतो. काय.. काय बरं, विचारायचं होतं? अरेच्च्या बोलता बोलता विसरलो. आता आठवलं होतं, अगदी जिभेवर होतं.. मी विचारलं. ‘जिभेवरचा प्रश्न कडू असेल तर थुंकून टाक.’ मानस नेहमीसारखा खटय़ाळपणे म्हणाला. तुझी ना, सतत थट्टा-मस्करी. बोलता बोलता गुंडाळतोस आणि विसरायला झालं! विसरण्याबद्दल प्रश्न विचारायचा होता, तो प्रश्न विसरलास का? मानसनं मिश्कील हसत म्हटलं..:
‘बरोब्बर. विसरण्याबद्दल विचारायचं होतं रे.’ मला सांग. आणि प्लीज सीरियसली घे, मला खूप धास्ती वाटते. म्हणजे आपल्याला विस्मरण होतंय, स्मृतिभ्रंश होणार नाही ना? अशी भीती वाटते..’ ‘‘हं, क्या करू राम मुझे बुढ्ढा मिल गया..’ अशी गाणी ऐक म्हणजे मनोरंजन होईल.’ मानस खोडय़ाळपणे बोलला. बरं, बरं सांगतो त्याबद्दल आधी एका गोष्टीचं स्पष्टीकरण देतो. अशी धास्ती वाटणं खूप कॉमन आहे. वाढत्या वयाची खूप माणसं झालेली पाहतो. त्यामुळे स्मृतिभ्रंश झाल्याचं वर्तमान अधिक प्रमाणात ऐकायला येतं. त्यामुळे तरुण लोकांनादेखील आपल्या स्मरणशक्तीवर विपरीत परिणाम झाल्यासारखं वाटतं. खरं म्हणजे ‘स्मरणशक्तीवर’ ताण पडतोय आणि आरामही मिळतोय.
म्हणजे असं बघ, मोबाइलवर सगळे संपर्कातल्या लोकांचे फोन नंबर असतात, त्यामुळे आपापला फोन नंबरही आठवून सांगावा लागतो. अशा अनेक रूटीन गरजा फोन, कॅलक्युलेटर आणि संगणकावर भागतात. मेंदूला त्यांची नोंद ठेवावी लागत नाही. म्हणजे मेंदूवरचा ताण हलका झालाय. परंतु मेंदूवर माहितीचा सतत वर्षांव होतो. अरे साधा टीव्ही चॅनेल लावला तर त्यात कमीत कमी सहा-सात विंडो असतात आणि त्यातली माहिती सतत अपडेट होत असते. यामधली महत्त्वाची बातमी, बाष्कळ माहिती, उपटसुंभ माहिती, लोंढय़ासारखी बातमी, ताजी बातमी नि ते देणारे अनेक लोक यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. त्यातल्या फुटकळ गोष्टी दुर्लक्षित ठेवून सोडून द्याव्या लागतात. मेंदूवर या सर्व गोष्टींचा ताण पडतो. त्यामुळे मेंदू लवकर थकतो..
 यावर कडी म्हणजे, मोबाइलवरूनदेखील टेक्स्ट मेसेज येतच असतात. त्यात फील गुड, मेसेजेस तर बोकाळलेले असतात. त्यामुळे मेंदूला उसंत मिळत नाही. खरं की नाही? मानस म्हणाला
‘पण याचा माझ्या विसरण्याशी काय संबंध?’ मी विचारलं. ‘इतका कसा रे तू ‘हा’!’ मानस डिवचून म्हणाला.
‘स्मरणशक्तीवर परिणाम होणं साहजिक नाही का? ब्रेन रिमेन्स टू बिझी! त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टी सटकून जातात आणि कमी महत्त्वाच्या पण चुरचुरीत गोष्टी लक्षात राहतात. उदा. गाणी, जिंगल्स, सलमान खानचं अमुक सिनेमात नाव कोणतं, त्यानं समाजसेवेसाठी किती वेळ दिला, इत्यादी. मग महत्त्वाचे संदर्भ सुटून जातात. आणि आपल्याला विस्मरण झाल्यासारखं वाटतं. खरं म्हणजे, महत्त्वाच्या विषय आणि बातम्यांची आपण उत्तम रीतीने नोंद केलेली नसते. तुझ्यासारख्या कामात व्यस्त आणि तरुण माणसाला त्यामुळे स्मृतिभ्रंश झालाय किंवा लवकर होईल, याची धास्ती वाटते. ती अनाठायी असते. पण मित्रा, अतिथकवा आणि ताण यांनी मेंदू गांजलाय रे. आपल्यावर कोसळणाऱ्या माहितीला तू रोखू शकतोस. त्याबाबतीत सजग राहा. झालं समाधान?’ मानस म्हणाला, ‘मुळीच नाही, अजून खूप प्रश्न आहेत, मग उद्या भेट, इथेच..’
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

इतिहासात आज दिनांक.. – ४ डिसेंबर
१८२९ सतीची प्रथा बंद करण्याचा कायदा जाहीर करण्यात आला. गव्हर्नर जनरल बेंटिक यांनी या कामी पुढाकार घेतला. राजा राममोहन रॉय यांनी यासंदर्भातील पाश्र्वभूमी अगोदरच तयार केली होती. या अमानुष प्रथेच्या विरोधात रॉय यांनी कंपनी सरकारकडे एक निवेदन दिले होते. कायद्यानुसार जो कोणी सती जाण्यासाठी मन वळवेल वा अशा प्रसंगी हजर राहील ते मृत्युदंडास पात्र ठरणार होते.
१८९२ स्पेनचा हुकूमशहा फ्रान्सिको पाऊलिनो हर्मेनयिल्डो टिओडुलो फ्रँको बहामोंडे ऊर्फ फ्रँको फ्रान्सिस्को याचा जन्म. गॅलिशिया भागात जन्मलेल्या फ्रँकोने १९१०मध्ये स्वत:चे लष्करी शिक्षण पूर्ण केले. १९२६ मध्ये तो युरोपातील सर्वात कमी वयाचा जनरल झाला. १९३१मध्ये स्पेनच्या राजाने सत्तात्याग केल्याबरोबर स्पेनमध्ये प्रजासत्ताकाची स्थापना झाली. १९३६ मध्ये फ्रँकोने बंडखोरांच्या सैन्याचे नेतृत्व केले आणि प्रजासत्ताक राजवटीचा अवतार संपुष्टात आणून स्वत:च हुकूमशहा बनला. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या सैन्याला फ्रँकोने रशियात मदत केली व रसद पुरवली, परंतु  युद्धात त्याचा प्रत्यक्ष सहभाग कमी राहिला.  १९४७ मध्ये त्याने घटनेत बदल करून स्वत:ला आमरण प्रमुखपद घेतले. अमेरिकेशी जुळवून घेऊन १९७५पर्यंत सत्ता उपभोगली.
१९७३ रविकिरण मंडळातील ज्येष्ठ सदस्य कवी गिरीश ऊर्फ शंकर केशव कानेटकर यांचे निधन. कांचनगंगा, फलभार, मानसमेघ हे त्यांचे काही गाजलेले कवितासंग्रह होत.
डॉ. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची – फ्रेंच इंडोचायना
अन्नाम (उत्तर व्हिएतनाम) मधील हनोई या महत्त्वाच्या शहरावर १८७४ साली ताबा मिळवल्यावर फ्रेंचांनी अनेक महत्त्वाची ठाणी घेतली. त्याआधीच १८५९ साली दक्षिणेकडचे सायगाव  फ्रेंचांनी कब्जात घेतलेले होते. त्यामुळे टोंकीन, अन्नाम, कोचिनचायना हे व्हिएतनामचे सर्व भूभाग  फ्रेंचांच्या अमलाखाली आले. आता फा प्रदेशाचे नाव फ्रेंच इंडोचायना असे झाले. राज्यकारभाराच्या सोयीसाठी फ्रेंचांनी व्हिएतनामचे तीन तुकडे पाडले. टोंकीन हा अगदी उत्तरेकडचा तुकडा, त्याची राजधानी हनाई. अन्नाम या मधल्या तुकडय़ाची राजधानी हुए, कोचिनचायना या दक्षिण भागाची राजधानी सायगाव, कोचिनचायना विभाग संपूर्ण फ्रेंच कारभाराखाली तर टोंकीन व अन्नाम या भागांवर नामधारी राजवट सुरू राहिली असूनही खरी सत्ता फ्रेंचांकडेच, अशी घडी फ्रेंचांनी बसवून घेतली. पाठोपाठ लाओस, कंबोडिया ही शेजारील राष्ट्रे फ्रेंचांची आश्रित राष्ट्रे झाली. तिथे  फ्रेंचांनी आपले वकील (रेसिडेंट) नेमले. अशा तऱ्हेने १८८५ साली सर्व व्हिएतनामवर  फ्रेंचांची सत्ता प्रस्थापित झाली. थोडय़ाच दिवसांत  फ्रेंच राज्यकर्त्यांचे व्हिएतनाम लोकांना दुय्यम दर्जाची वागणूक देणे सुरू झाले.  फ्रेंचांच्या विरोधात वातावरण हळुहळू तापू लागले होते. अशा वातावरणात १८९० साली, पुढे होणाऱ्या स्वातंत्र्यसमराचा शिलेदार हो चि मिन्ह याचा जन्म झाला. त्याचे पाळण्यातले नाव होते नम्युएत तात थान वडिलांच्या मृत्यूनंतर चुलत्याने त्याचा सांभाळ केला. चुलत्याच्या राष्ट्रवादी व  फ्रेंचविरोधी विचारांनी हो चि मिन्ह भारावून गेला. तरीही तो एका  फ्रेंच शाळेत शिकला. १९११ साली होने एका  फ्रेंच प्रवासी जहाजावर भटारखान्यात नोकरी धरली. पुढल्या दोन वर्षांच्या नोकरीत त्याचा युरोप, आफ्रिका व चिनी बंदरांतून वावर झाल्याने त्याला चिनी,  फ्रेंच, रशियन, इंग्रजी व थाई भाषा उत्तम बोलता येऊ लागल्या.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2012 10:49 am

Web Title: navneet 37
टॅग : Kutuhal,Navneet
Next Stories
1 कुतूहल- ऑपरेशन थिएटर
2 कुतूहल- रुग्णाची सुरक्षितता
3 कुतूहल -रुग्णालयातील सुरक्षितता
Just Now!
X