17 November 2017

News Flash

मनमोराचा पिसारा.. – चार दिवस थंडीचे

‘निसर्गा’चा स्वभाव असा आहे की तो सगळंच सुमडीत करतो! बंगालच्या उपसागरात हवेच्या दाबाचे पट्टे

डॉ. राजेंद्र बर्वे - drrajendrabarve@gmail.com | Updated: November 27, 2012 12:26 PM

‘निसर्गा’चा स्वभाव असा आहे की तो सगळंच सुमडीत करतो! बंगालच्या उपसागरात हवेच्या दाबाचे पट्टे कमी-जास्त होतात, तर कधी हिमालयात बर्फवृष्टी होते, असली जुगाडं करून निसर्ग हवामान, पाऊसपाणी, थंडी, उन्हाळा-पावसाळा यांचा अनियमितपणा नियमित करतो. आपण भाबडेपणाने ‘नेमेचि येतो मग पावसाळा’, नाही तर ‘हिवाळा, उन्हाळा’ अशी कविता करतो.
निसर्गाचा हा सारा खिलवाड गोड मानून घेतो. म्हणून मर्ढेकर ‘पितात सारे गोड हिवाळा’ असा कवितेचा चरण लिहून मोकळे होतात. हिवाळा पिणारा कोण रस्ता, माणूस की मुंबईतली माणसं या विषयी विचार करीत बसतो. अजून ‘माघ’ महिना लागायचाय. तरी अचानक थंडी पडल्याने रेडिओवरले आरजे माघ मास पडली थंडी, धनी गेले हो परगावा, मुक्कामाला ऱ्हावा पावनं, मुक्कामाला ऱ्हावा. अशी झक्कास चटोर लावणी येता-जाता वाजवत आहेत.
पावसाचं धोंगडं अलीकडे पाण्याविना दुष्काळात भिजत पडतं. त्यावर हवामान खातं आपल्याला सांगतं की अहो हे बरोबरच आहे! अमुक-तमुक समुद्राखालून प्रवाह वाहतो, कोणी तरी बाष्प चोरून नेतं. असली थोर ‘सायंटिफिक’ रीझनं दिल्यामुळे आपण ‘असेल बुवा’ असं मनात म्हणून गप्प राहतो. ‘पावसाळ्यात पाऊस वेळेवर पडला पाहिजे’ ही आधुनिक अंधश्रद्धा असल्याचं हळूच लक्षात येतं. गंमत वाटते मित्रा, माणूस या प्राण्याची. सृष्टीचे नियम शोधायचे. अशा नियमांप्रमाणे जगरहाटी चालते असा दावा करायचा. मग नियमातले अपवाद आढळले की म्हणायचं, अर्थात नियम अपवादाने सिद्ध होतात! कोणी तरी थोर वैज्ञानिक मग सगळं उलटं पालटं करतो. न्यूटनने मांडलेले नियम अबाधित, अचल बिंदूपासून सुरू होणाऱ्या विश्वासंबंधी आहेत असं म्हणणारे आइन्स्टाइन पुढे येतात. ‘जग सारे सापेक्ष, सापेक्ष’ असा मंत्र देतात. त्यानंतरचे शास्त्रज्ञ म्हणतात, आइन्स्टाइनचा दावा मुळातच सापेक्ष आहे. चला म्हणजे, पुन्हा पहिल्यापासून चूल मांडा..
निसर्ग माणसाला ‘पनेसार’ छाप स्पिन टाकतो आणि काही समजायच्या आत आपण नव्या संशोधनाच्या ‘पॅव्हेलियन’मध्ये सुसाट परततो.
सृष्टीचा नियम एकच ‘संशोधन थांबवू नका. सातत्याने नव्या गोष्टींचा शोध घ्या. जुन्या प्रस्थापित सत्यांना कवटाळू नका.’  निसर्गविज्ञानातलं संशोधन ‘क्षितिजरेषा गवसण्यासारखं असतं. अमुक ठिकाणी क्षितिज भेटेल असं वाटून सरसावून पुढे व्हावं, तो ती रेषा पुढे सरकलेली असते. यात गंमत अशी असते की क्षितिजरेषेचा थांग लागो की न लागो, वाटेत खूप काही नव्यानं सापडतं. जो शोधायला जातो, ते मिळण्याऐवजी, आणखी काही तरी नव्यान सापडतं.’
चार दिवस थंडीचे काय आले, मित्रा, मनात नव्या विचारांची वावटळ उठली. निसर्गाविषयी अचंबा वाटला. अचंबा वाटता वाटता, मनात चिंतन सुरू झालं. जिज्ञासा जागृत झाली. मन उल्हसित झालं. मनमोराचा पिसारा खुलतो तो असा!

कुतूहल – विद्युत चुंबकीय लहरी
जगभर विद्युत चुंबकीय लहरी वाढत्या प्रमाणात पसरत चालल्याने त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होऊन कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असावे. सध्या आपण वापरत असलेल्या उपकरणातील व्हीसीआर, सीडी, डीव्हीडी, रंगीत टीव्ही, संगणक या उपकरणांमुळे वातावरणात विद्युत चुंबकीय लहरी पसरतात. या लहरी आपल्या शरीरावर आक्रमण करीत असतात. आपण पूर्वीपासून वापरत असलेले पंखे, टयूब लाइट्स, मिक्सर मशीन, वॉिशग मशीन्स हीसुद्धा भर घालतात. आता त्यात सेल फोनचीही भर पडलेली आहे. सेल फोन कानाशी लावलेला असल्याने त्या लहरींचा परिणाम मेंदूवर होतो. या लहरी अंतर्कर्णात असलेल्या कॉकलिया या भागातील मज्जातंतूवर आदळत असल्याने कानाला बहिरेपणाही येऊ शकतो. त्याशिवाय वातावरणातील जंबूपार, अतिनील आणि अवरक्त किरणांचा सौम्य परिणाम आपल्यावर होत असतोच. वीजनिर्मिती केंद्रात तयार झालेली वीज तेथून अन्यत्र न्यावी लागते. ती ओव्हरहेड तारांमधून नेतात. अशा तारातून विद्युत प्रवाह व विद्युत दाब वाहत असतो. या प्रवाहामुळे विद्युत चुंबकीय लहरी निर्माण होत असतात व त्यांचा प्रभाव तारांपासूनच्या शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरापर्यंत पडतो. विद्युत चुंबकीय क्षेत्र मानवाच्या आणि प्राण्यांच्या शरीरात अतिशय सूक्ष्म विद्युत प्रवाह निर्माण करतो. हा विद्युत प्रवाह शरीरात सगळीकडे सारखा पसरत नाही. विद्युत क्षेत्रामुळे शरीरात निर्माण होणारा विद्युत प्रवाह व चुंबकीय क्षेत्रामुळे निर्माण होणारा विद्युत प्रवाह यांचे प्रमाण वेगवेगळे असते.विद्युत चुंबकीय लहरींमुळे उती व पेशींच्या कार्यावर, रोगप्रतिकार शक्तीवर बदल होतो. कर्करोगग्रस्त पेशींच्या संख्येत वाढ होते. मेंदू व हृदयाच्या कार्यक्षमतेत आणि दैनंदिन जीवनचक्रात बदल घडून येतो. हे निरीक्षण ५० व ६० हर्टझच्या विद्युत प्रवाहामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींसाठी आहे. दोन मोबाइल फोन टेबलावर काही अंतर सोडून ठेवले व त्यांच्यामध्ये एक अंडे ठेवले. नंतर दोन्ही फोन चालू केले. थोडय़ा वेळाने ते अंडे तडकल्याचे आढळून आले. हा प्रयोग अशा लहरींचा शरीरावर काय परिणाम होऊ शकतो याची कल्पना देतो.
अनंत ताम्हणे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी ,मुंबई २२  
office@mavipamumbai.org

सफर काल-पर्वाची – चिनी राष्ट्रपिता डॉ. सन यत सेन
आधुनिक चीनचा राष्ट्रपिता मानले जाणारे सन यत सेन हे दक्षिण चीनमधील मकाऊजवळ एका खेडय़ात १८६६ मध्ये जन्मले. वडील एक गरीब शेतकरी होते. गावातल्या शाळेतले शिक्षण तेराव्या वर्षी पूर्ण झाल्यावर भावाकडे होनोलुलु येथे १८७८ साली गेले. तिथल्या कॉलेजमध्ये इंग्लिश, ब्रिटनचा इतिहास, गणित वगैरे विषय घेऊन १८८३ साली पदवीधर झाले. होनोलुलुत एका अमेरिकन ख्रिश्चन मिशनरी कॉलेजमध्ये शिक्षण झाल्यामुळे त्याच्यावर ख्रिश्चन धर्मप्रणाली आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेचा मोठा प्रभाव पडला. तिथे अलेक्झांडर हॅमिल्टन व अब्राहम लिंकन यांच्या विचारांनी भारून गेले. सन यत सेनच्या भावाला आता अशी भीती वाटू लागली की, आपला भाऊ ख्रिश्चन होतो की काय. म्हणून सनला त्याने परत चीनमध्ये पाठवून दिले.
चीनमध्ये परत येऊन पुढे सनने हाँगकाँग येथे १८८६ ते १८९२ मध्ये एका मिशनरी वैद्यकीय कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर सनने बाप्तिस्मा घेऊन ख्रिश्चन धर्म स्वीकारला. हवाईमध्ये राहिल्यामुळे अमेरिका, ब्रिटनच्या तुलनेत स्वत:चा चीन देश किती मागासलेला आहे हे सनच्या लक्षात आले होते. डॉक्टर होऊनही ‘सनचे मन वैद्यकीय पेशात रमेना. होनोलुलुमध्ये जाऊन त्याने काही तरुणांना जमवून ‘रिव्हाइव्ह चायना सोसायटी’ या बंडखोर गटाची स्थापना केली. त्या काळी चीनमध्ये मांचू घराण्याची राजवट होती आणि सम्राट क्वांग सू व राणी डॉवेजर हे राज्यकर्ते होते. १८९५ साली सनने मांचू राजवट उलथविण्याचा कट केला. पण तो फसला. सन यात सेनबरोबर त्याच्या झिंग झाँग सोसायटी (रिव्हाइव्ह चायना सोसायटी)मध्ये सामील होणाऱ्या तरुणांनाही १८९५ साली हद्दपार केले गेले. सनने मग पुढील सोळा वर्षे अमेरिका, कॅनडा, युरोप व जपानमध्ये हद्दपारीची शिक्षा भोगत काढली.
सुनीत पोतनीस  -sunitpotnis@rediffmail.com

इतिहासात आज दिनांक..-२७ नोव्हेंबर
१८७३ श्रेष्ठ राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांचा झाशीजवळील मुंगावली ग्वाल्हेर येथे जन्म झाला.  माळवा, देवास अलाहाबाद येथे त्यांचे शिक्षण झाले. शालेय जीवनात ते यशस्वी विद्यार्थी होते. मॅट्रिकला पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाल्यावर देवासचे राजपुत्र खासेसाहेब पवार यांचे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. राजपुत्रांसाठी कवितालेखन, बालगीते,  काव्यानुवाद या गोष्टी त्यांनी सुरू केल्या. स्वत:ला आवडल्या नाहीत त्या तांबे यांनी जाळून टाकल्या. १८९७ मध्ये त्यांचा विवाह झाला. इंदूरच्या वास्तव्यात त्यांनी कसून अभ्यास केला. संस्कृत काव्य, नाटक, इंग्रजी कविता यांचा अभ्यास केला. यातूनच तांबे यांची कविता घडत गेली आणि काव्य सादरीकरणाची पद्धत तयार झाली. ते अनेक कवींच्या काव्याची चिकित्साही करीत. नाटय़गीत, प्रेमगीत, गूढगीत, निसर्गगीत आळविणारी त्यांची कविता मनाला आनंद देते. डॉ. आशा सावदेकर तांबे यांच्या कवितेसंदर्भात लिहितात-  बाह्य़ सौंदर्यापेक्षा अंतरंगाचे सौंदर्य त्यांनी महत्त्वाचे मानले. दु:खाशी झगडून प्राप्त केलेल्या आनंदाला महत्त्वपूर्ण मानले, संगीताला भावनेची आंतरसंगती मानून काव्य केले. बालकवितेने नवा प्रदेश उजळून टाकला .
१८८१ ख्यातनाम भारतीय प्राच्यविद्यापंडित व कायदेपटू, राष्ट्रवादी लेखक, काशीप्रसाद जयस्वाल यांचा जन्म.
१९०३ रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते ऑनसॅगर लॉर्स यांचा जन्म. विद्युत संवाहकातील उष्णता व दाब संदर्भात  महत्त्वाचे संशोधन त्यांनी केले होते.
प्रा. गणेश राऊत -ganeshraut@solaris.in

First Published on November 27, 2012 12:26 pm

Web Title: navneet 5