20 November 2017

News Flash

नवनीत

मनमोराचा पिसारा.. बोकी, छकुली, शकुली, बकुली आणि मी दुपारच्या वेळी जरा म्हणून आडवं व्हावं ना

मुंबई | Updated: November 21, 2012 10:46 AM

मनमोराचा पिसारा.. बोकी, छकुली, शकुली, बकुली आणि मी
दुपारच्या वेळी जरा म्हणून आडवं व्हावं ना की यांची धावपळ  सुरू. इकडून तिकडे, तिकडून इकडे. नुसती पळापळ. आता इतका पकडापकडीचा खेळ खेळल्यावर भूक लागणारच ना. मग आठवते आई! पण यांच्या खाण्यापिण्यालाही शिस्त म्हणून नाही. तिथेही तशीच गडबड. आता पुरे मस्ती. म्हणून डोळे वटारून रागावून पाहिलं तर तेवढय़ापुरती गप्प, नि पुन्हा सुरू. इथून तिथे, तिथून इथे.
जरा स्वस्थ पडा बघू, आता पलीकडे. अजिबात हालचाल न करता, एकमेकांच्या खोडय़ा न काढता पडून राहिलात तर छान झोप लागते. जरा निजलात ना बाळानो, तर चांगली वाढ होते अंगाची. घरबसल्या आपल्याला हवं ते खायला मिळतं याची बूज राखावी म्हणते मी. बूज राखायची म्हणजे काय विचारता? आता कसं सांगू तुम्हाला? कठीणच आहे म्हणा. आपल्याला तसलं फारसं नसतं. म्हणजे एकमेकांना धरून राहाणं. आपल्या नसानसात स्वतंत्र राहायचं, फारतर कोणाच्या तरी आसपास जगायचं, याचंच बीज आहे म्हणा.. असो. तुम्ही म्हणाल, एकदा आईला बोलायला चान्स दिला की ती मुळी थांबत नाही. या जरा जवळ, कित्ती रे लोळता जमिनीवर. अं. मी म्हणते! इतक्या मळताच कशा तुम्ही तिघी? आणि आंघोळ करायला शिकवलं ना तुम्हाला तरी कानामागून आणि डोक्यावरून कसं स्वच्छ करायचं ते नाही कळत. बाळानो, अशी वैतागून बोलले ना तुम्हाला, तरी, लाडकी बाळं आहात तुम्ही माझी. कंटाळलात का? मग खेळा माझ्या शेपटीबरोबर. छान हलवून दाखवते.
दुपारच्या वेळी माजघरातल्या दिवाणाजवळ, सकाळच्या उन्हाच्या कवडशामुळे आलेली उब शिल्लक असते, तिथे बोकी (माझी माऊ) आणि तिच्या तीन छोटय़ाशा बाळांचा असा संवाद नियमित घडतो.
माझ्या मते, आमची बोकी इतर मांजरींपेक्षा जास्त लाघवी आणि प्रेमळ आहे. सगळ्यांना पटतं असं नाही. बोकीचा आविर्भाव आक्रमक नसतो. बाकी मांजरांचं म्हणाल तर, त्यांच्यात फार प्रेमळ असण्याची प्रथा नाही. हे खरंच.
बोकीच्या बाळंतपणात तिनं खूप पेशन्स दाखवला. प्रसूतीच्या वेदना पहिलटकरीण असून तिनं पटकन ओळखल्या. बोकीला तीन गोजिरवाणी पिलं झाली. तिच्या उपजत प्रेरणेनुसार तिनं, त्यांची जागाही बदलली, पण माजघरातला हा कवडशाचा कोपरा ओनरशिपवर घेऊन टाकला. बोकोबापासून पिलाचं रक्षण केलं. पिलाना आम्ही नावं दिली. काबऱ्या रंगाची ती छकुली, गोऱ्या रंगाची शकुली आणि पिवळसर पट्टय़ांची बकुली.
छकुली, शकुली आणि बकुली यांची मस्ती पाहाणं, हा स्वर्गसुखाहून उच्च अनुभव असावा. एकमेकांवर धावून जाणं, हाणामारी, पुढच्या पायानी वर घट्ट पकडून मागच्या पायानी लाथा झाडणं, पाठ उंचावून, शेपूट फुलवून धमकावणं आणि दमूनभागून आईच्या कुशीत दूध पितापिता झोपणं या बाललीला ज्यांना आवडतात, त्यांना आणखी काही रमणीय वाटेल याची शक्यता कमीच. बाकी बोकीचा रागीट आईपणाचा आव बराचसा लटका. थोडंसं तिचंही बरोबर आहे म्हणा, तशी ती घरात एकटीच वाढली. पण कळतं हं बोकीला सगळं! आता गप्प बसा चौघी सुस्त झोपल्यात..
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

कुतूहल : विजेची सुरक्षितता
वीज ज्या तारांमधून वाहून नेली जाते त्या तारेमुळे आपल्याला धक्का (शॉक) बसू नये म्हणून त्यावर वेगवेगळया प्रकारची आवरणे (इन्शुलेशन) दिलेली असतात. १) व्हल्कनाइज्ड इंडिया रबर वायर हे आवरण पन्नासएक वर्षांपूर्वी वापरात होते. यामध्ये वायरवर (कन्डक्टर) जस्ताचा लेप दिला जातो. मात्र आवरणासाठी जे रबर वापरलेले असते त्यातील गंधकाचा परिणाम वायरवर होऊन तिला हिरवा रंग चढून त्याचा परिणाम वीज वहनावर होतो. तो टाळण्यासाठी वायरवर टििनग केले जाते. मग त्यावर शुद्ध रबराचे आवरण देतात. मग इन्शुलेशनचा गुणधर्म वाढवण्यासाठी त्यावर टेिपग केले जाते व त्यावर तागाची जाळी बसवतात. ज्या वायरवर हवेतील बाष्पाचा परिणाम होतो त्या वायर्स क्लिट वायिरगसाठी, केसिंग-केिपग आणि काँडयूट वायिरगसाठी वापरतात. यातील वायर्सची संख्या एक पासून १२७ पर्यंत काहीही असू शकते. तर गेज म्हणजे वायरची जाडी ६ पासून २२ पर्यंत असते.             २) कॅबटायर शिद्ड वायर्स यांना सीटीएस वायर्स म्हणतात. सध्या या वायर्स जास्ती करून वापरतात. रासायनिक पदार्थ आणि पाणी यांचा या वायरवर काहीही परिणाम होत नाही. ही वायर लवचिक असते आणि वजनाने हलकी असते. मात्र ही वायर टोकदार अशा कोणत्याही पदार्थाने कापली जाऊ शकते हा हिचा एक दुर्गुण आहे. या वायरचा उपयोग घरातील वायिरग, रेल्वे आणि कार वायिरगकरिता करतात. ही वायर लाकडी पट्टयावरून (बॅटन) बसवतात.
३) टफ रबर शिद्ड वायर्स यांना टीआरएस वायर्स असेही म्हणतात. या वायरवर टििनग करून त्यावर रबराचे व शेवटी टफ रबराचे जाड कव्हर असते. या वायर्स सिंगल कोअर गोलाकार, ट्विन कोअर फ्लॅट, थ्री कोअर राऊंड अशा प्रकारांमध्ये मिळतात. मल्टी कोअर केबलमध्ये प्रत्येक कोअरवर वेगवेगळया रबराचे आवरण असते. एका जागेवरून दुसरीकडे हलवायच्या वस्तूंच्या वायिरगसाठी यांचा उपयोग चांगला होतो. या वायर्सवर पाण्याचा परिणाम होत नाही. परंतु उन्हाच्या त्रासामुळे घराबाहेरच्या फिटिंगकरिता त्या योग्य नाहीत.
अनंत ताम्हणे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

सफर काल-पर्वाची : अँटोनी आणि क्लिओपात्राचा अस्त
क्लिओपात्राने मार्क अँटोनीला आपल्या प्रेमपाशात बरोबर अडकविले. अँटोनीनेही क्लिओपात्राशी लग्न करून आणखी एक निराळा बेत केला होता. तो म्हणजे संपन्न इजिप्तच्या मदतीने ऑगस्टसच्या रोमन सैन्याचा पराभव करून रोमचे साम्राज्य ताब्यात घ्यावयाचे. क्लिओपात्राला अँटोनीपासून एक जुळे मुलगा, मुलगी झाली. त्यांची नावे क्लिओपात्रा सेलेन दुसरी व मुलगा अलेक्झांडर हेलिऑस. या जुळ्यांशिवाय एक मुलगा झाला त्याचे नाव फिलाडेल्फस सोळावा होते. अँटोनीने टॉलेमी तेरावा याचा नायनाट करून क्लिओपात्राला इजिप्तची फॅरो (राणी) बनविले.
इ.स. पूर्व ३१ मध्ये सिझर ऑगस्टसच्या सैन्याने अ‍ॅक्टियम येथील युद्धात अँटोनी आणि क्लिओपात्राच्या संयुक्त सैन्याचा पराभव केला. मार्क अँटोनियाच्या सैन्याचा इतका धुव्वा उडविला की, त्याला आत्महत्या करावी लागली. अ‍ॅक्टीयम येथील विजयानंतर सिझर ऑगस्टस इजिप्तमध्ये गेला तेव्हा क्लिओपात्राने त्यालाही आपल्या मादक सौंदर्याने वश करायचा प्रयत्न केला, पण ऑगस्टस तिला बधला नाही. क्लिओपात्राने मग वैफल्यग्रस्त होऊन इजिप्तच्या रिवाजाप्रमाणे स्वत:च्या हाताला अ‍ॅस्प ही विषारी नागीण लावली. थोडय़ाच वेळात नागिणीच्या चावल्याने क्लिओपात्रा मृत झाली. इ.स. पूर्व ३० मध्ये बारा ऑगस्ट रोजी अलेक्झांड्रीया शहरात तिने अशा तऱ्हेने नागदंशाने आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर तिला ज्युलियस सिझरपासून झालेला मुलगा सिझेरियन हा इजिप्तचा फेरो झाला, परंतु थोडय़ाच दिवसांत सिझर ऑगस्टसने त्याला ठार मारून इजिप्तचे राज्य रोमन साम्राज्यात समाविष्ट केले. इजिप्तचे नाव त्याने ‘इजिप्तस’ असे केले! मृत्यूच्या वेळी फिलोपेटर म्हणजेच क्लिओपात्राचे वय ३९ वर्षे होते. क्लिओपात्रात सौंदर्यापेक्षा पुरुषांना वश करून त्यांच्यावर वर्चस्व गाजविण्याची कला होती. ज्युलिअस सिझर, अँटोनी शिवायही त्या काळातले अनेक नामवंत पुरुष तिच्याकडे आकर्षित झाले होते. (तिच्यावर निघालेला चित्रपट ‘क्लिओपात्रा’ तसेच शेक्सपिअरचे अँटोनी अ‍ॅण्ड क्लिओपात्रा नाटक बरेच गाजले.)
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

इतिहासात आज दिनांक.. २२ नोव्हेंबर
१९१३ ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ डॉ. लक्ष्मीकांत झा यांचा जन्म.
१९५५ मुंबई प्रदेश काँग्रेसच्या सभेत झालेल्या दगडफेकीबद्दल शंकरराव देव यांचे पाच दिवसांचे उपोषण, विधानसभेतील हिरे-नरवणे आदींसह १०५ जणांनी आमदारकीचा राजीनामा देऊन आपला निषेध व्यक्त केला. या घटनेमुळे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला जोरदार गती मिळाली.
१९६३ अमेरिकेचे लोकप्रिय अध्यक्ष जॉन केनेडी यांची हत्या. २९ मे १९१७ रोजी मॅसाच्युसेट्स येथे जन्मलेले केनेडी गर्भश्रीमंत होते. हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून, काही काळ अमेरिकेच्या लष्करात उमेदवारी तर पुढे बातमीदारी करून ते राजकारणात उतरले. १९५२ मध्ये ते सिनेटर झाले. सिनेटर असताना त्यांनी वंशभेद नाहीसा करणाऱ्या विधेयकाला पाठिंबा दिला. त्यांच्या हत्येचे हे एक कारण सांगितले जाते. टेक्सासमधील एका भागातून उघडय़ा मोटारीतून जात असताना केनेडींवर भरवस्तीत गोळीबार झाला. पुढील दोन तासाच्या आत उपाध्यक्ष लिंडन जॉन्सन यांना अध्यक्षपदाची शपथ देण्यात आली. पुढच्या काही तासात पोलिसांनी ली हार्वे ओस्वाल्ड या २४ वर्षीय संशयिताला अटक केली, पण दोन दिवसांनी त्याची हत्या जॅक रूबी याने केली. २५ नोव्हेंबरला जगभरच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत केनेडींवर अंतिम संस्कार करण्यात आले.
प्रा. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

First Published on November 21, 2012 10:46 am

Web Title: navneet 9