अमेरिकेत जन्मलेला अलेक्झांडर कँपबेल गार्डनर हा एक भटक्या, स्वच्छंदी स्कॉटिश तरुण अफगाणिस्तानात काबूलच्या गादीसाठी चुलत्याशी झगडणारा हबीबुल्ला याच्याकडे घोडदळ प्रमुख म्हणून नोकरीस लागला. काबूलमध्ये एका अफगाण स्त्रीशी लग्न करून त्याला एक मुलगाही झाला. पुढे १८२६ साली हबीबचा पराभव झाला त्यावेळी गार्डनरची पत्नी आणि मुलाला ठार मारले गेले. या हल्ल्यातून गार्डनर शिताफीने निसटून बाहेर पळाला. त्या काळात प्रबळ शीख साम्राज्य आणि त्याचे महाराजा रणजीत सिंग यांची ख्याती युरोप, अमेरिकेतही पसरली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोकरीच्या शोधात लाहोरात आलेला गार्डनर महाराजांकडे दरबारात जाऊन त्यांना भेटला. तोपर्यंत त्यांच्या फौज ए खासमध्ये ३१ युरोपियन सेनानी नोकरीस होते. या निष्ठावंत युरोपियनांचा चांगला अनुभव असल्याने महाराजांनी या सहा फुटांहून उंच, धडधाकट, अमेरिकन तरुणाला आपल्या लष्करात प्रथम घोडदळाच्या एका तुकडी प्रमुखपदी नेमले. गार्डनरच्या युद्धकौशल्याने प्रभावीत होऊन महाराजांनी त्याला ८०० पायदळ आणि ४०० घोडदळाच्या कर्नलपदी नेमले. रणजीत सिंग यांचा मृत्यू १८३९ साली झाला तोपर्यंत अत्यंत निष्ठेने, गार्डनरने काम केलेच पण त्यानंतर पहिल्या अँग्लो-शीख युद्धातही त्याने कसोशीने शीख साम्राज्याचे रक्षण केले. या युद्धात इंग्रजांची सरशी होतेय असे पाहून त्याचे सहकारी पळून गेले असतानाही त्याने एकटय़ाने इंग्रजांचे ३०० सैनिक मारून लाहोरचे रक्षण केले. पुढे लाहोर इंग्रजांच्या अंमलाखाली गेल्यावर १८४७ साली गार्डनरला काश्मीरचे महाराजा गुलाब सिंह यांनी आपल्या नोकरीत घेऊन त्यांच्या रणबीर रेजिमेंटच्या पायदळ आणि तोफदल प्रमुखपदी नेमले. मनमोकळ्या आणि विनोदी स्वभावाच्या अलेक्झांडरने शिखांप्रमाणे दाढी आणि केस वाढवून संपूर्ण जीवनशैली शिखांप्रमाणे बदलल्यामुळे त्याला गार्डन खानसिंग असे नाव पडले. अनेक जखमांमुळे त्रस्त झालेला हा अमेरिकन शीख जम्मूत १८७७ मध्ये मरण पावला.

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet alexander gardner
First published on: 10-08-2018 at 01:01 IST