भारतात शेती आणि शेतकरी यांचा इतिहास नवपाषाण युगापासून (इसवीसनपूर्व ३०००) सुरू होतो. ताम्रप्रस्तर युगा (इ.स.पूर्व २७००-इ. स.पूर्व ७००) मध्ये तांबे या धातूचा शोध लागला. त्याच वेळी वेगवेगळी धान्येसुद्धा सापडली. मोहोंजोदडो, हडप्पामध्ये गहू, जव, हरभरा, नाचणी ही धान्ये होती. तांबे या धातूपासून कुऱ्हाड, मासे पकडण्यासाठी फास, बाण तसेच बांगडय़ा बनत असत. त्याच वेळी शेतीकरिता दगडापासून अवजारे बनायला लागली. माणूस गुहेतून निघून झोपडीत राहू लागला. मातीच्या भांडय़ात अन्न शिजवू लागला. घरात गायी, डुकरे, शेळ्या-मेंढरं, कोंबडय़ा दिसू लागल्या. आमच्या प्राचीन संस्कृतीमध्ये समृद्ध शेतीचे कैक पुरावे सापडतात. पाराशर, गर्ग, बृहद् गर्ग, कश्यप, विष्णुगुप्त, गरुडमान, बादरायण, विश्वकर्मा, भारद्वाज, कपिला यांसारख्या खगोल आणि समुद्र शास्त्रींनी शेतीची बंद दारे उघडली. सुरुवातीपासूनच आमच्याकडे गणित, नक्षत्र आणि शेतीचा घनिष्ठ संबंध राहिलेला आहे.
इ.स.पूर्व १५०० ते १००० मध्ये आर्य उत्तरेकडून आले आणि त्यांनी द्रविडांना दक्षिणेकडे जाण्यास भाग पाडले. हा भारतातील शेतीचा सुवर्णकाळ होता.
इ.स.पूर्व ३२७ मध्ये ग्रीकांच्या आक्रमणासोबत कित्येक दुर्लभ वनस्पती भारतात आल्या. इसवीसन १४९८ मध्ये वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने गोरक्षाचिंच, लसूण, नागफणी, कुलजन, अकलकाढा, धोतरा, स्वर्णपात्री, सोनामुखी, कर्पूर, जिरा, हळदसारख्या वनस्पती भारतात आणल्या. इसवीसन १६२१ ते १६५० या काळात शाहजहानचा मुलगा दाराहशुकोने भारतात फळझाडे वाढविली. त्यात काश्मीरमध्ये सफरचंद, नासपती, डाळिंब, अक्रोड, जर्दाळू, पिस्ता, आलुबुखार, बदाम यांची शेती वाढविली.
सतराव्या शतकात भारतात ईस्ट इंडिया कंपनीचे आगमन झाले. हळूहळू त्यांनी भारतात आपल्या व्यापाराचे जाळे पसरविले. व्यापारामागोमाग इंग्रजांचे सन्य भारतात आले. १८१८ मध्ये भारतात ब्रिटिश राज्य सुरू झाले. लॉर्ड मेकॉलेने आपले वृक्षायुर्वेद, कश्यपीय कृषी पद्धती यांसारखे दुर्मीळ संस्कृत ग्रंथ त्यांच्या देशात नेले. त्यात नक्षत्र, शेती, भूगर्भशास्त्र, जलसंवर्धन व जलशोध घ्यायच्या पद्धती याबाबत सखोल माहिती होती.

जे देखे रवी..   – ८. मालेगाव : अब्दुल आणि पोपट मास्तर
आतापर्यंतच्या माझ्या वडिलांच्या कामगिरीवर कोणीतरी इंग्रज किंवा भारतीय अंमलदार खूष झाला असणार. कारण साबरमतीहून बढती मिळून माझ्या वडिलांची बदली आणि बढती नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावच्या एका मोठय़ा रुग्णालयाच्या अधीक्षकपदी झाली, इसवी सन १९४५, १९४६. इथे मी सर्वप्रथम मुसलमान लोक बघितले. घरात एकदाही त्याचा उल्लेख झाल्याचे आठवत नाही, पण बाहेर मुसलमान आणि हिंदू ही जाणीव बटबटीत होती.
 या मुसलमान मंडळींचा इतिहास पुढे समजला. १८५७ च्या युद्धानंतर इंग्रज लोक उत्तरेत स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतलेल्या हिंदू आणि मुसलमान दोन्ही लोकांच्या मागे लागले. त्याला घाबरून जे मुसलमान लोक हतबल होऊन स्थलांतरित झाले त्यातले हे. काही लोक भिवंडीला स्थिरावले काही मालेगावला पोहोचले. इतिहासात डोकावले की डोके चक्रावते. आमच्याकडे आता मोटारगाडी होती. त्याचा चालक होता अब्दुल. तो एक उंच तपकिरी रंगाची गोंडय़ाची टोपी घालत असे. त्या टोपीलाही इतिहास होता हे हल्ली समजले. मी जो काळ आठवतो आहे त्याआधी तुर्कस्थानमध्ये सुधारणावादी विरुद्ध प्रतिगामी असा वाद सुरू झाला. त्यात महात्मा गांधींनी स्थानिक मुसलमान मंडळींच्या वतीने कोठली तरी बाजू घेतली होती. त्या सगळ्या चळवळीचा प्रतिसाद इथेही उमटला आणि मग इथे तुर्की टोपी घालण्याची प्रथा आली. ही टोपी कोणाच्या बाजूची हे सांगणे मला कठीण आहे. तसेच अब्दुललाही कठीण असणार. पण आपले विचार, धर्म, जात आणि इतिहास यावर आपला पोशाख ठरवला जातो याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे ही टोपी.
मला शाळेत एक शिक्षक होते त्यांचे नाव पोपट. मी त्यांचा लाडका होतो मलाही ते खूप आवडत असत. एकदा मी त्यांच्या मागे लागलो की त्यांनी मला त्यांच्या घरी न्यावे. ते काही तयार होईनात. मी अनेक दिवस त्यांच्यामागे लकडा लावला . शेवटी ते हो म्हणाले. आम्ही दोघे बरोबरच चालत गेलो. एवढय़ा लहानपणीही ते मोठे बेचैन होते हे लक्षात येत होते, शेवटी आम्ही त्यांच्या घरात शिरलो आणि आयुष्यात प्रथमच मी दारिद्रय़ पाहिले. मला काय करावे सुचेना. एवढीशी झोपडी. त्यात म्हातारी आई आणि बायका-मुलं. त्या दिवशी रात्री जेवताना मी आई-वडिलांना म्हटले, आपला बंगला केवढा मोठा आहे. आपण पोपट मास्तरांना आपल्या घरी आणू या. आई-वडील आवाक झाल्याचे आठवते. त्या रात्री मला काहीतरी समजूत घालून झोपवण्यात आले.
दुसऱ्या दिवशी आई मला म्हणाली, ‘या जगात कितीतरी गरीब लोक आहेत. सगळ्यांना आपण कसे पुरे पडणार. शिवाय आपली तर बदली होणार. मग पोपट मास्तरांचे कोण बघणार?’
..माझ्या आयुष्यातला व्यवहारज्ञानाचा हा पहिला धडा.
– रविन मायदेव थत्ते  –rlthatte@gmail.com

The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
space
एप्रिलमध्ये अवकाशात अपूर्व मनमोहक घडामोडींची रेलचेल; वाचा नेमकं विशेष काय..?
Cooking Competition in Mumbai on the occasion of Loksatta Purnabraham publication Mumbai
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ प्रकाशनानिमित्त आज मुंबईत पाककला स्पर्धा

वॉर अँड पीस  –   उदरवात-  उपाययोजना
शहरी चाकरमान्यांना, नेहमी रात्रपाळी करणाऱ्यांना व नाइलाजाने हॉटेलमध्ये जेवणाऱ्यांना जेवणाचा चॉईस नसतो.  मग तेच तेच अन्न रोज मेसमध्ये वा हॉटेलमध्ये खाऊन माणूस कंटाळतो. या कारणांव्यतिरिक्त टाळता येण्यासारखे आणखी महत्त्वाचे कारण म्हणजे विविध व्यसने. बिडय़ा, सिगारेट, दारू, तंबाखू यामुळे आपल्या ज्ञानतंतूंचा ऱ्हास होतो; पाचक स्राव सुटत नाहीत. खाल्लेले अन्न तसेच्या तसे पोटात डब्ब होऊन पडून राहते. त्याला गती मिळत नाही. स्वाभाविकपणे पोट फुगते, पोट खुटखुटते, अशी व्यक्ती चारचौघांत ऑफिसमध्ये बसली असल्यास पोटातला वायू अडवते. तो माणूस पादायला लाजतो व आपला रोग दुप्पट करतो.
नानाविध अजीर्णावर सांगताना प्राचीन शास्त्रकारांनी ‘उष्णोदकं घृताजीर्णे तैलाजीर्णे च कांजिकम्।’ असे म्हटले आहे.
तूपकट मेवामिठाई खाऊन अजीर्ण झाल्यास, पोटात वायू धरल्यास गरमगरम पाणी प्यावे. तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाऊन पोट डब्ब झाल्यास नेहमीचे जेवण न जेवता आले, लसूण असे मिसळलेली तांदळाची कांजी प्यावी. उदरवात या वातविकारात सर्वानाच माहीत असणारा सोपा उपाय म्हणजे ओवा खाणे हा होय. नुसता ओवा खाल्ला तर काहींना तो खूप तिखट लागतो. त्यामुळे ओवा असणारे हिंगाष्टक चूर्ण, पाचक चूर्ण अशी चूर्णे लगेचच तात्पुरता आराम देतात. पोटात नेहमी वायू धरत असल्यास, थोडय़ाही अन्नामुळे पोट डब्ब होऊन दुखत असल्यास पंचकोलासव, पिप्पलादि काढा, पिप्पल्यासव अशी सुटसुटीत औषधे जेवणानंतर घ्यावीत. लसूण हा उदरवातावरचा ‘अक्सर’ इलाज आहे. पावसाळय़ाच्या दिवसांत आकाश अभ्राच्छादित असते. ढग खाली आलेले असतात. स्वाभाविकपणे वृद्ध माणसांना थोडेही कमीजास्त अन्न पोटात वायू उत्पन्न करते, अशा वेळेस लसणीशी ‘मैत्री’ करावी. आले, लसूण, पुदिना अशी चटणी किंवा मिळाल्यास लसूणादि वटी जेवणात किंवा जेवणानंतर घ्यावी. आगामी आयुष्यात अन्य वातविकार होऊ नये म्हणून वेळीच उदरवात विकाराला लगाम घालावा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत  – ९ जानेवारी
१८५४ >  अनुवादक व कवी म्हणून उल्लेखनीय काम करणारे गोविंद वासुदेव कानिटकर यांचा जन्म. त्यांचे शिक्षण एलएल. बी. पर्यंत झाले. त्यानंतर हायकोर्टात वकिली करीत असताना त्यांनी काव्यलेखनाचा व अनुवादांचा छंद जपला. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘गीतांजली’चे गद्य भाषांतर त्यांनी केले, तसेच जॉन स्टुअर्ट मिल यांचा ‘सब्जेक्शन ऑफ विमेन’ हा पुढे स्त्रीवादी विचारासाठी महत्त्वाचा ठरलेला निबंधही त्यांनी ‘स्त्रियांची परवशता’ या नावाने भाषांतरित केला. मॅक्समुल्लरच्या डिस्कोर्सेसचे भाषांतर ‘भट्ट मोक्षम्युल्लरकृत धर्मविषयक व्याख्याने’ या नावाने त्यांनी केले. शेक्सपियरचा ‘हॅम्लेट’ कानिटकरांच्या भाषांतरात ‘विचित्रपुरीचा राजपुत्र’ झाला.  अन्य नाटकांचीही भाषांतरे त्यांनी केली, तसेच ‘संमोहलहरी’ ‘नारायण पेशवे यांचा वध’ आदी स्वतंत्र खंडकाव्ये रचली.  
१८७७ >  संतकाव्याचे अनुवादक केशवराव रघुनाथ देशमुख यांचा जन्म.
१८९६ >  संपादक, प्रकाशक आणि विनोदी लेखक असा लौकिक मिळवणारे प्रभाकर श्रीपाद कोल्हटकर यांचा जन्म. ‘वायुपुत्र’ या टोपणनावानेही ते लिखाण करीत असत.
– संजय वझरेकर
navnit.loksatta@gmail.com