17 December 2017

News Flash

कुतूहल -महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणून १९६८ साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना राहुरी, अहमदनगर

-डॉ. सचिन सदाफळ, राहुरी मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई२२ - office@mavipamumbai.org | Updated: January 8, 2013 12:10 PM

महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ म्हणून १९६८ साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना राहुरी, अहमदनगर येथे झाली. विद्यापीठास सरदार वल्लभभाई पटेल सर्वोत्कृष्ट कृषी विद्यापीठ, देशातील उत्कृष्ट संस्था, देशातील सर्वात पसंतीची संस्था यांसारख्या विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. विद्यापीठाचे कार्यक्षेत्र पश्चिम महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या दहा जिल्ह्यांत विस्तारलेले आहे. कृषी विद्यापीठाचे प्रमुख उद्दिष्ट कृषीशिक्षण, कृषीसंशोधन आणि कृषीविस्तार कार्य आहे.
कृषी साक्षरतेसाठी विद्यापीठामार्फत कृषी पदविका, कृषी पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवीचे शिक्षण दिले जाते.
शेतीशी निगडित संशोधन करण्यासाठी विद्यापीठाची २८ संशोधन केंद्रे आहेत. विद्यापीठाने अन्नधान्य, फळे-फुले, चारा-पिके यांचे २००पेक्षा जास्त वाण विकसित केले असून मृद् व जलसंधारण, पीक लागवड पद्धती यांविषयी सखोल संशोधन करून १००० पेक्षा अधिक महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत.
विद्यापीठाने विकसित केलेले विविध पिकांचे वाण संपूर्ण देशातील शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहेत. फुले २६५ या उसाच्या वाणाने उत्पादनाचे नवे उच्चांक गाठले असून क्षारयुक्त जमिनीत ते शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न देत आहे. गव्हाचे ित्रबक, नेत्रावती हे वाण, ज्वारीचे रेवती, चित्रा, सुचित्रा हे वाण, कोरडवाहू फळबागांसाठी वरदान ठरलेला आंब्याचा केशर वाण यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. हरभऱ्याच्या विजय, विशाल, दिग्विजय, विराट या वाणांनी देशातील शेतकऱ्यांची मने जिंकली आहेत.
विद्यापीठाने निर्मिती केलेल्या फुले त्रिवेणी या संकरित गायीत दुसरी धवलक्रांती आणण्याची ताकद आहे. बदलते हवामान, जैविक-अजैविक ताण, पाणीटंचाई या दरवर्षी निर्माण होणाऱ्या समस्यांवर संशोधन करून विद्यापीठ त्यांचे निष्कर्ष वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध करते.
विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी विद्यापीठ आपल्या कार्यक्षेत्रात शेतकरी, कृषी अधिकारी आदींसाठी विविध प्रशिक्षण वर्ग, शेतकरी मेळावे, प्रात्यक्षिके यांचे आयोजन करते. याव्यतिरिक्त आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रे, मासिके आदींमधून हंगामनिहाय, क्षेत्रनिहाय, शेतीविषयक तंत्रज्ञान व विविध कार्यक्रम प्रसारित करते.

वॉर अँड पीस
उदरवात     
आयुर्वेदीय तत्त्वज्ञान हे वात, पित्त व कफ या तीन दोषांवर आधारित आहे. ‘कफं पंगू, पित्तं पंगू, पंगवो मलधातव:। वायूना यत्र नीयन्ते तत्र गच्छति मेघवत्।’ आपल्या सृष्टीच्या रोजच्या व्यवहारातही आपण ‘चलती हवा’ याला फार महत्त्व देतो. रोजच्या आपल्या बोलण्यात आपण ‘खेळती हवी’ हा शब्दप्रयोग वापरतो. घरोघर दिवसरात्र पंखे चालू असतात. वीज बंद झाली, पंखा थांबला, की आपण एकदम ‘हश, हुश’ करतो. आपल्या मानवी शरीरातील वायूला, वायूच्या योग्य दिशेने होणाऱ्या अनुलोमनाला, गतीला फारच महत्त्व आहे. आपण जे खातो-पितो ते आपल्या उदरात, आमाशयात जमा होते. ते अन्न किमान चार तास आमाशयात पडून राहते. त्यानंतर त्या अन्नावर पाचक स्रावांचा, पाचक पित्ताचा संस्कार होऊन ते अन्न लहान आतडय़ातून पक्वाशयात जाते. तेथे त्याला मलस्वरूप येऊन त्याचे गुदमार्गे विसर्जन होते. या लांबलचक शरीराला-अवयवांना महास्रोतस अशी संज्ञा आहे. आपण खाल्लेले अन्न आमाशयातून पुढे सरकलेच नाही, गती मंद झाली; किंवा थोडे खाल्ल्याबरोबर जर पोट फुगले व आणखी अन्न नकोसे वाटले तर त्या लक्षणाला किंवा रोगावस्थेला ‘उदरवात’ असे संबोधतात. अशा विकारात पोट फुगणे, ढेकर येणे, उचकी लागणे, पोट गच्च होणे अशी लक्षणे असतात.
उदरवाताची कारणे सामान्यपणे सात प्रकारची असतात. त्यातील हवामान ही आपल्या हातातील गोष्ट नसते. अति पाणी पिणे किंवा खराब पाणी पिणे, चहा-कॉफी किंवा कोल्ड्रिंकसारखी अनावश्यक पेये पिणे, यामुळे पोटात वायू धरणे, गुबारा धरणे अशी पिडा होते. आपण जे अन्न खातो ते आपल्या पोटातील पाचकाग्नी- बेंबीपासचे पित्ताचे स्राव यामुळे पचले जाते. ते पोटाला भारवत होत नाही. पण काही वेळेस जरासे अन्न खाल्ले तरी पोट जड होते. नेहमीच जेवण थोडे जरी जेवले तरी पोट फुगते.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      
साबरमतीचा तात्या
मुंबईहून माझ्या वडिलांची बदली साबरमतीला झाली. तिथे एक बऱ्यापैकी मोठा सरकारी दवाखाना होता, पण त्याहून महत्त्वाचे १९४३-४४ साली साबरमतीच्या कारागृहात अनेक स्वातंत्र्यसैनिक इंग्रजांनी अटक करून ठेवले होते अशी आठवण आहे आणि त्या खास कैद्यांना योग्य वैद्यकीय मदत मिळावी म्हणूनही माझ्या वडिलांची नेमणूक करण्यात आली आहे. कारागृह मोठे प्रशस्त होते. बांधकाम मला वाटते दगडी होते. एक-दोन वेळा हट्ट करून वडिलांबरोबर आत गेल्याचे आठवते. चट्टय़ापट्टय़ाचे कपडे घातलेले त्या वेळचे ते कैदी बघून मला मोठे कुतूहल वाटले कारण ती माणसे इतरांसारखीच होती. घरी येऊन मी आईला विचारले, ‘‘लोकांना कैदेत का ठेवतात?’’ ती म्हणाली होती, ‘‘जी माणसे गुन्हे करतात त्यांना शिक्षा म्हणून इथे डांबून ठेवतात.’’ जेलवर एक मनोऱ्यासारखी जागा होती. त्यात एक भली मोठी घंटा होती. कोणी कैदी पळाला तर ती घंटा वाजवतात, असे तिथल्या एका शिपायाने मला सांगितले होते.
एक दिवस मोठे आश्चर्य घडले. संध्याकाळी चट्टय़ापट्टय़ाचे कपडे घातलेला एक कैदी घेऊन एक शिपाई आमच्या घरी आला. तो आलेला बघून माझे वडील आईला म्हणाले, ‘‘कुसूम (माझ्या आईचे नाव) तात्याला आणला आहे.’’ आई मोठय़ा उत्साहाने बाहेर आली. त्याला चहा देऊन त्याच्याशी मोठय़ा आपुलकीने बोलत बसली. वडीलही थोडा वेळा त्याच्याशी बोलले. मग तो तात्या शिपायाबरोबर परत गेला. मला राहवेना. मी आईला म्हटले, ‘‘हा गुन्हेगार तुझ्या कसा ओळखीचा?’’ ती म्हणाली, ‘‘सगळे कैदी गुन्हेगार असतातच असे नाही. हा तात्या माझ्या वर्गात होता. पुढे तो स्वातंत्र्य चळवळीत उतरला. इंग्रजांनी ताकीद देऊनही स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह करीत राहिला म्हणून त्याला अटक करून इथे पाठवला. इंग्रजांनी आपला देश घेतला आहे. तो आता परत घ्यायचा आहे म्हणून हे असले लोक झगडत आहेत.’’ इतकी जुनी गोष्ट आहे. नऊवारी लुगडे घालून आईला जेलमध्ये त्याला भेटणे शक्यच नव्हते म्हणून ही व्यवस्था करण्यात आली होती. या तात्याचे पुढे काय झाले असेल? याने निवडणूक लढविली असेल का? मंत्री वगैरे झाला की नाही? याचा तपशील उपलब्ध नाही. असे कितीतरी तात्या त्या वेळी होते. काळाच्या प्रवाहात वाहून गेले. काळाच्याच प्रवाहात अहमदाबादला एक भाषण द्यायला मी हल्लीच गेलो होतो. मुद्दाम साबरमतीला गेलो, म्हटले जुन्या आठवणींची जागा बघावी; परंतु सगळेच अनोळखी होते. मी मोठा हतबुद्ध झालो. मनात आले, आठवणी फक्त जपाव्यात, काळाच्या प्रवाहात सगळेच बदलते. असले पुनरागमन शहाण्या माणसाने शक्यतोवर टाळावे. नुसती हुरहुर लागते आणि निष्पन्न काहीच होत नाही.
– रविन मायदेव थत्ते- rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत        
८ जानेवारी
१८५१ >  बाळकृष्ण आत्माराम तथा भाऊसाहेब गुप्ते यांचा जन्म. कृषी, आरोग्य, देशी कारागिरी आदी विषयांची माहितीपर पुस्तके त्यांनी त्या काळात लिहिली.
१९०१ > युद्ध व लष्करविषयक ग्रंथकार यशवंत श्रीधर परांजपे यांचा जन्म. ‘सैनिकांची स्वाक्षरी’, व ‘पूर्व गोलार्धाचे केंद्र : भारत’ ही पुस्तके त्यांनी लिहिली.
१९३४ > अध्यात्मविषयक ग्रंथांचे लेखक परशुराम गोविंद चिंचाळकर यांचे निधन. लोकमान्य टिळकांच्या ‘गीतारहस्या’वरील रहस्यनिरीक्षण हा टीकाग्रंथ त्यांनी लिहिला होता.  
१९५३ > ‘महाराष्ट्र  नाटक मंडळी’चे एक संस्थापक आणि नाटककार त्र्यंबक सीताराम कारखानीस यांचे निधन. त्यांनी जलियनावाला बाग हत्याकांडावर आधारित ‘राजाचे बंड’ हे नाटक लिहिले होते.
१९७३ >  ‘सकाळ’ वृत्तपत्राचे संस्थापक डॉ. ना. भि. तथा नानासाहेब परुळेकर यांचे निधन. ‘निरोप घेता’ हे त्यांचे आत्मचरित्र गाजले.
– संजय वझरेकर
(सरोजिनी बाबर यांचा जन्म ७ जानेवारी १९२२ रोजी झाला, असा उल्लेख सोमवारच्या अंकात हवा होता. संपादनातील अनवधानाने तो चुकला आहे.)
 navnit.loksatta@gmail.com

First Published on January 8, 2013 12:10 pm

Web Title: navneet mahatma phule agricultural university rahuri