20 November 2017

News Flash

मनमोराचा पिसारा… : ओबामा ओबामा

असा वक्ता गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही, असा राष्ट्राध्यक्ष दहा हजार वर्षांत झाला

मुंबई | Updated: November 9, 2012 1:10 AM

असा वक्ता गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही, असा राष्ट्राध्यक्ष दहा हजार वर्षांत झाला नाही; अशा हशा, टाळ्या आणखी दहा हजार वर्षे.. आम्हाला सोडून (हशा, टाळ्या) आणखी कोणाला मिळणार नाहीत. पुढील दहा हजार वर्षांत.. इ.
आचार्य अत्रे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं भाषण ऐकून, पाहून असंच काही तरी म्हणाले असते, याची खात्री आहे. आणि फॉर वन्स मित्रा, त्यांनी केलेली अतिशयोक्ती कमी आहे, असं वाटलं असतं..
बराक ओबामा यांनी निवडून आल्यानंतर आपल्या निळ्याभोर डेमोक्रॅट पार्टीच्या पाठीराख्यांना उद्देशून केलेल्या भाषणाचा समस्त मंडळींनी मनापासून अभ्यास करावा. जगातल्या करोडो लोकांनी ते पाहिलं असणार यात शंका नाही. अर्थात, अमेरिकेतील पब्लिक प्लेसमधली प्रत्येक मूव्हमेंट राष्ट्राध्यक्षाकडून गिरवून घेतली जाते, हे तर नक्कीच; परंतु कालच्या भाषणामध्ये ओबामा यांच्या भाषणातल्या कारागिरीपेक्षा स्वयंस्फूर्तीने अधिक बोलले, असं वाटतं.
मुळात, अशा भाषणातून मतदारांचे आभार मानणं, नव्या कालखंडासाठी भरमसाट आश्वासनं देणं आणि विरोधकांचा धुव्वा उडवल्याबद्दल त्यांची व्यक्तिगत पातळीवर खिल्ली उडविणं, भरपूर टाळ्या आणि शाबासकी मिळवणं इतपतच उद्देश समोर ठेवलेला असतो. ओबामा मात्र त्यापलीकडे गेले. ज्या गोष्टी बोलले त्याद्वारे आणि ज्या पद्धतीने त्यांनी आपले विचार मांडले, भावना व्यक्त केल्या ते केवळ अजोड. त्यातले विचार आणि स्वप्नं खास अमेरिकन होते. अमेरिका हा देश केवळ भौगोलिक रिअ‍ॅलिटी नसून तो अभिव्यक्ती, व्यक्तिमत्त्वस्वातंत्र्याचं प्रतीक आहे, असं ठामपणे म्हटलं. ते अर्थातच लोकांना आवडलं. ओबामा यांच्या देहभाषेचं विशेष वाटतं.
मतदारांसमोर येताना, राष्ट्राध्यक्ष पत्नी मिशेल मोठय़ा मुलीबरोबर, तर ओबामा धाकटीबरोबर. (हेदेखील इमेज मेकर्सनी सांगितलं असावं) त्यांच्या चालण्यात आत्मविश्वास होता, त्यापेक्षा कुटुंबमग्नता होती. रविवारी सकाळी चर्चला एकत्रितपणे जाणाऱ्या कुटुंबासारखी ती ‘फर्स्ट फॅमिली’ दिसली. मग स्टेजवर सर्वाना जवळ घेणं आणि त्यानंतर मतदारांना अभिवादन असं करण्यातला विचार विशेष वाटतो. ओबामा यांच्या बोलण्यात सहज आत्मविश्वास, चेहरा ठाम परंतु भावमग्न. त्यांची नजर थेट लोकांपर्यंत पोहोचते. मानेच्या हालचाली सहज होतात. साधारण १५० अंशापर्यंत मान फिरते. विशेष शब्द उच्चारताना ते निमिषभर थांबतात आणि उजवा हात वर उंचावून लोकांपर्यंत ते आपल्या मनातला आत्मविश्वास पोहोचवतात. त्यांचा डावा हात किंचित उंचावला जातो. आपल्या मुद्दय़ाला अधिक ठासून सांगण्याकरिता ते डावा हात वापरतात. त्यांच्या भाषणातली बोलण्याची गती श्रोत्याबरोबर चालते. आपल्या भावना व्यक्त करताना त्यांना गहिवरून येत नाही; परंतु लोकांचे डोळे पाणावतात. (पहिल्या निवडणुकीनंतर जेसी जॅक्सनचा डोळे पुसणारा चेहरा अद्याप डोळ्यासमोर आहे.) ओबामा कोणालाही शिवीगाळ न करता, अचरट नकला न करता, केवळ आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या ठामपणाच्या आधारे लोकांच्या मनाचा ठाव घेतात. भारतीय नेत्यांनो, ऐकताय ना?
डॉ. राजेंद्र बर्वे  
drrajendrabarve@gmail.com

इतिहासात आज दिनांक.. ९ नोव्हेंबर
१८७१  आधुनिक असामी साहित्यातील महत्त्वाचे लेखक पद्मनाथ  गोहाहन बरूआ यांचा जन्म. त्यांची आठ नाटके विलक्षण गाजली.
१८९०  पुण्यातील सामाजिक पुढाऱ्यांनी स्वत:हूनच आचरणाचे काही नियम शपथपूर्वक स्वीकारण्याबद्दलचे एक प्रतिज्ञापत्र जाहीर केले. सामाजिक इतिहासातील ही महत्त्वाची घटना होय. लो. टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, नाटककार देवल यांच्या त्यावर सह्या होत्या.
१९७०  फ्रान्सला जागतिक पातळीवर प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करून देणारे फ्रान्सचे नेते चार्लस् द गॉल यांचे निधन. त्यांचा जन्म लिल् प्रांतात झाला. पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून लढताना त्यांना आलेले अनुभव आणि त्यावर गॉल यांनी केलेले चिंतन हे त्यांनी शब्दरूपाने १९३२ मध्ये ‘द आर्मी ऑफ द फ्यूचर’ या ग्रंथात प्रसिद्ध झाले आहे. या ग्रंथाकडे फ्रान्सने दुर्लक्ष केले आणि जर्मनीने या ग्रंथाचा बारकाईने अभ्यास केला. १९४० मध्ये त्यांना जनरल आणि ज्युनिअर वॉर सेक्रेटरी पदी बढती देण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात सुरुवातीला फ्रान्सचे पानिपत झाले. हिटलर फ्रान्सच्या भूमीवर नेतेपदाच्या भूमिकेतून वावरला. युद्धाचे पारडे फिरले. जर्मनी पराभूत झाला. द गॉल फ्रान्समध्ये सत्तेवर आले. सर्व पक्षीयांना एकत्र आणणे ही त्यांच्या पुढील मोठी समस्या होती. पाचव्या प्रजासत्ताकाच्या काळात ते प्रमुख झाल्यावर त्यांत फ्रेंच वसाहतींना मुक्त करण्याचे ठरविले. यातूनच पुढे अल्जिरिया स्वतंत्र झाला. पश्चिम जर्मनीबरोबर त्यांनी संबंध सुधावले. १९६५ मध्ये ते विजयी होऊन पुन्हा सत्ताधीश झाले. त्यांच्या आठवणींचे ३ खंड प्रकाशित झाले आहेत.
प्रा. गणेश राऊत  
ganeshraut@solaris.in

सफर काल-पर्वाची : विजयनगर साम्राज्याची स्थापना
हिंदुस्थानवर इस्लामी हल्ले इ.स. १०००च्या आसपास सुरू झाले. उत्तर हिंदुस्थानला त्यांचे हल्ले पहिली तीनशे वर्षे सहन करावे लागले. त्या काळात विद्वान, पंडित व कलाकार लोक दक्षिणेकडील राजे लोकांच्या आश्रयाला आले. पुढे मुसलमान दक्षिणेकडे येऊ लागले. इ. स. १०२६ ते इ.स. १३४३ या काळात होयसाळ घराण्याची सत्ता कर्नाटक व तामिळनाडूचा काही भाग या प्रदेशात होती. होयसाळांच्या पदरी संगमा हा एक सरदार होता. अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने होयसाळ राज्य पूर्णपणे उद्ध्वस्त केले व त्यानंतर मंदिरांची तोडफोड केली. संगमाचा पाच मुलांपैकी हरिहर राया व बुक्क राया हे दोघे बंधू वारंगळच्या राजाकडे प्रथम नोकरीला होते. ते राज्य मुसलमानांनी खालसा केल्यावर ते दोघे होयसाळांच्या राज्यात कपिल देवाकडे कुम्मटा इथे नोकरीला लागले. कुम्मटाचा पाडाव झाल्यानंतर त्या दोघांना कैद करून दिल्लीला नेण्यात आले. तिथे त्यांना दया दाखवून मांडलिकत्वाची शपथ घेऊन  परत पाठविले. परत आल्यावर हरिहर राया व बुक्क राया या दोघांनी विद्यारण्य या आपल्या गुरूंच्या प्रेरणेने १३३६ साली प्रथम अनीगुंदी येथे व नंतर विजयनगर येथे आपल्या स्वतंत्र राज्याची स्थापना केली.
प्रथम हरिहर हा गादीवर बसला व त्याच्या नंतर बुक्क राया हा राजा झाला. या संगमा घराण्याची राजवट विजयनगरच्या साम्राज्यात इ.स. १३३६ ते १४८५ या काळात होती. संगमा घराण्यानंतर ‘साळुव’ या घराण्याकडे सत्ता आली. साळुव घराण्याचे राज्य इ. स. १४८५ ते १४९१ असे झाले. त्यानंतर ‘तुळुव’ घराण्याचे राज्य इ.स. १४९१ ते १५७० असे झाले. तुळुव घराण्याचा राजा कृष्ण देवराया याची वीस वर्षांची कारकीर्द हा काळ विजयनगरच्या भरभराटीचा व संपन्नतेचा काळ होता.
सुनीत पोतनीस  
sunitpotnis@rediffmail.com

कुतूहल : गाडीची सुरक्षितता
भीमसेन जोशींना एकदा कोणीतरी विचारले होते की, ‘तुम्ही गायक झाला नसता तर कोण झाला असता?’ त्यावर ते म्हणाले होते, ‘मला मोटार मेकॅनिक व्हायला आवडले असते.’ गाडी ते वेगात चालवायचे तरी सुरक्षितपणे चालवायचे. गाण्यामुळे त्यांना लयीचे उत्तम ज्ञान होते. ते एकदा त्यांच्या मेकॅनिककडे गेले आणि म्हणाले, ‘डावीकडचा पुढचा टायर बदल.’ मेकॅनिक गाडी घेऊन एक चक्कर मारून आला आणि म्हणाला, ‘पंडितजी, टायर आताच बदलायची गरज नाही.’ त्यावर पंडितजी त्याला म्हणाले, ‘मला तुझ्यापेक्षा लयीचे ज्ञान अधिक आहे आणि पैसे मी देणार आहे, तू तो टायर बदलून टाक.’
आपल्या वाहनाचे टायर गुळगुळीत (बाल्ड) झालेत का, त्याला किती वेळा पॅच मारले आहेत. टय़ूब किती वेळा पंक्चर झाल्याने दुरुस्त केली आहे, गाडीचे ब्रेक्स नीट लागतात ना, गाडी चालवताना कोणकोणते भाग आवाज करतात, गाडीचे सर्व दिवे नीट लागतात का- विशेषत: ब्रेक लाइट्स, टर्निग लाइट्स, पार्किंग लाइट्स, हॉर्न वाजतो का, गाडीचे दरवाजे नीट उघडतात-बंद होतात का, त्याची इंटरलॉक्स लागतात ना, वायपर्स चालतात का, गाडीचे विंड शिल्ड्स स्वच्छ आहेत ना, गाडीची मागची काच मागचे दिसण्यासाठी मोकळी आहे की तेथे काही सामान ठेवले आहे, गाडीच्या सगळ्या खिडक्यांच्या सगळ्या काचा नीट खाली-वर होतात ना, ड्रायव्हर आणि त्याच्या शेजारी बसणाऱ्यासाठी सीट बेल्ट्स आहेत ना (किंबहुना गाडीत बसणाऱ्या सगळ्यांसाठी सीट बेल्ट्स हवेत) आणि ते दोघेही जण ते दरवेळी लावतात ना की पोलीस दिसल्यावर लावतात, गाडीतील सगळ्या सीट्स नीट आहेत ना, गाडी वेळच्या वेळी ओव्हरऑल होते का, गाडी बिघडल्यावर लगेच ती दुरुस्त केली जाते ना, गाडीच्या टायरमधील हवा किमान आठवडय़ातून एकदा तरी तपासली जाते का? या सगळ्या गोष्टी वरवर छोटय़ा दिसल्या, तरी गाडी सुरक्षितपणे चालवण्यासाठी आणि चालकाच्या व आत बसणाऱ्या इतरांच्या सुरक्षिततेसाठी ते फार महत्त्वाचे आहे.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी ,
मुंबई २२  
office@mavipamumbai.org

First Published on November 9, 2012 1:10 am

Web Title: navneet news history
टॅग History,Navneet News