प्रक्रियेमध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्चप्रक्रिया असे स्तर असतात. प्राथमिक स्वरूपाच्या प्रक्रियांद्वारे (सफाई, वर्गवारी, पॅकिंग, साठवण, वाहतूक, गर किंवा रस काढणे इत्यादी) ३० ते ३५ टक्के मूल्यवर्धन होते. माध्यमिक स्वरूपाच्या प्रक्रियांद्वारे (गर, रस यांपासून प्रक्रिया पदार्थ, फळे सुकवणे, सरबते इत्यादी) १५० ते २०० टक्क्यांपर्यंत मूल्यवर्धन होते. तर उच्च प्रक्रियांद्वारे (पावडर, वाइन, अर्क, फ्रूटबार इत्यादी) ३०० ते ४०० टक्के मूल्यवर्धन होते. हेच प्रमाण प्रगत देशांत ४०० टक्के आहे.
देशातील सध्याचे फळे व भाजीपाला उद्योग प्रामुख्याने लघुउद्योगांच्या माध्यमातून चालत आहेत. बहुतेक उद्योग खासगी, व्यापारी स्वरूपाचे असून त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचा थेट आíथक फायदा होताना दिसत नाही. शेतात तयार होणारी चांगली व उच्च प्रतीची फळे व भाज्या निर्यातीसाठी, मध्यम प्रतीची स्थानिक बाजारपेठांसाठी व कमी प्रतीची प्रक्रियांसाठी वापरली जातात. त्यामुळे प्रक्रियायुक्त पदार्थाचा दर्जा कमी होऊन त्याचा विक्रीवर परिणाम होतो. त्यामुळेच प्रक्रियेसाठीही उच्च प्रतीचाच कच्चा माल वापरणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी तसेच फळे व भाजीपाल्याची काढणीपश्चात नासाडी कमी करून प्रक्रियेद्वारा मूल्यवर्धन करण्यासाठी साखर कारखाने किंवा दूध संघाच्या धर्तीवर तालुका व जिल्हा पातळीवर तसेच फूड पार्कच्या माध्यमातून सहकारी तत्त्वावर फळे व भाजीपाला उद्योग उभारले पाहिजे. उत्पादित मूल्यवíधत पदार्थाना स्थानिक बाजारपेठ तसेच निर्यातीद्वारे जागतिक बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे.
प्रक्रियायुक्त पदार्थाना देशात व परदेशांत मागणी वाढत आहे. फळांचे जॅम, जेली व रस, हवाबंद केलेली फळे, मार्मालेड, स्क्व्ॉशेस तसेच निरनिराळी लोणची परदेशात मोठय़ा प्रमाणावर निर्यात केली जातात. भविष्यात भारतातील फळे आणि भाजीपाला यांच्या प्रक्रियायुक्त पदार्थाना देशात व परदेशात मागणी वाढणार आहे. म्हणून असे प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात सुरू करून त्यामध्ये उच्च दर्जाचे पदार्थ उत्पादित करून देशांतर्गत व परदेशी बाजारपेठा काबीज करण्यास मोठा वाव आहे.

– डॉ. विष्णू गरंडे (कोल्हापूर)
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

आजचे महाराष्ट्रसारस्वत        ९ नोव्हेंबर
१९०७ > कोकणच्या इतिहासाची साधने मोठय़ा प्रमाणावर उजेडात आणणारे इतिहास संशोधक शांताराम विष्णू आवळसकर यांचा जन्म. ‘आंग्रेकालीन अष्टागर’, ‘नागाव : आर्थिक व सामाजिक जीवन’, ‘कोकणातील ऐतिहासिक (दंत)कथा व ऐतिहासिक कथा’ (दोन खंडांत)  अशा पुस्तकांखेरीज चंद्रप्रकाश (कवितासंग्रह) व रायआवळे (ललितलेखसंग्रह) ही पुस्तकेही त्यांचीच.
१९६२  > स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते, समाज सुधारक व लेखक महर्षी धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णासाहेब यांचे निधन. ‘आत्मनीतीची तत्त्वे’ आणि ‘नीतिसिद्धान्त’ या हर्बर्ट स्पेन्सरच्या पुस्तकाचा अनुवाद, ‘राजनीतीची मूलतत्त्वे’ हे सिजविकच्या पुस्तकाचे भाषांतर तसेच पुढे ‘आत्मवृत्त’ ही पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
१९७७ > संगीतकार व संगीत-समीक्षक केशवराव भोळे यांचे निधन. अभिजात कंठय़संगीताविषयीचे ‘आजचे प्रसिद्ध गायक’ (१९३३) हे त्यांचे पहिले पुस्तक म्हणजे टोपणनावाने वसुंधरा या साप्ताहिकात लिहिलेल्या लेखांचा संग्रह होता. त्यात काही लेखांची भर घालून   ‘संगीताचे मानकरी’ ही आवृत्ती आली. आवाजाची दुनिया, अस्ताई, वसंतकाकांची पत्रे, अंतरा, माझे संगीत आणि जे आठवते ते ही त्यांची अन्य पुस्तके.
– संजय वझरेकर

वॉर अँड पीस     अंकिलोझिंग स्पाँडिलायटीस: आयुर्वेदीय उपचार-२
अँकिलोझिंग स्पाँडिलायटिसच्या लक्षणांमध्ये प्रामुख्याने कंबरेपासून मानेपर्यंत तीव्र वेदना होणे, पाठीला बाक येणे, हाता-पायांमध्येही वेदना होणे, याचा समावेश होतो. या व्याधीच्या बहुतेक रुग्णांच्या रक्तामध्ये एचएलए-बी २७ ही जनुके आढळून आली आहेत. या व्याधीचा डोके, हृदय, फुफ्फुसे आणि काहीवेळा मूत्रपिंडावरही परिणाम होऊ शकतो. पाठीचा कणा व ओटीपोटाच्या हाडांमध्ये व्याधीची सुरुवात होते. या सांध्यांना सॅक्रोरलीयाक जॉइन्ट असे म्हणतात. या सांध्यात सूज आल्याने पाठीच्या कण्यात ताठरता येते. अनेक दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास तेथील मणके एकमेकांना जोडले जातात. या प्रक्रियेलाच ‘अँकिलोसिस’ म्हणतात. मणके जोडले गेल्याने पाठीची हालचाल अशक्य बनते. कणा बांबूप्रमाणे बनल्यामुळे कण्यापासून दूर असलेल्या सांध्यामध्येही सूज येऊ शकते, त्यांना दुखापत होऊ शकते. वाकण्याचा प्रयास केल्यास खूपच वेदना होतात. हळूहळू मानही अशीच जखडली जाते. काही रुग्णांना तर एका अंशातही मान वळवता येत नाही. वेदनाशामक औषधांचा सुरुवातीला परिणाम होतो; पण हळूहळू या औषधांचाही उपयोग होईनासा होतो. व्याधीचा प्रभाव आणखी वाढू न देता रुग्णाच्या वेदना कमी करणे, एवढेच डॉक्टरांच्या हाती असते.
‘वेदनायाश्च निग्रह: एतद् वैद्यस्य वैद्यत्वं; न वैद्य: प्रभुआयुष:’ या विकारातील रुग्णाला ‘तत्त्वज्ञानाच्या डोसापेक्षा’ सत्वर आराम मिळणे, वेदनांची तीव्रता कमी होणे; पाठ, मान, कंबर यांच्या हालचाली सुलभ होणे हे प्राथमिक उद्दिष्ट हवे. त्याकरिता रुग्णाने प्रथम कठीण, उबदार अंथरुणाचा आसरा घ्यावा.  गरम सुंठयुक्त पाणी प्यावे. शिळे, खारट आंबवलेले, शंकास्पद व खूप थंड अन्न टाळावे. सर्व हालचाली सावकाश, गोलाकार असाव्या. लाक्षादि, गोक्षुरादि, सिंहनाद, संधिवातारी, आभादि, गणेश, त्रिफळा गुग्गुळ वातगजांकुश, चंद्रप्रभा, सौभाग्यसुंठ या औषधांसोबत गवती चहा तेलयुक्त महानारायण तेल वापरावे.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी..      सतर्कता आणि सकर्म निवृत्ती
ज्ञानेश्वर विनोदाच्या बाबतीत जरा कमीच. तरीही मोक्ष मिळविण्यासाठी गंगातिरी बुडून मरण्याची शक्यता असते आणि या उलट कोठल्यातरी मोठय़ा डोंगरांवरच्या पवित्र स्थानाला भेट देताना घसरून पडणे अशक्य नाही अशा ओव्या त्यांनी सांगितल्या आहेत. संन्यास घेऊन अरण्यात राहणारे तिथल्या पशुपक्ष्यांच्या किंवा वृक्षांच्या प्रेमात पडतात असेही एके ठिकाणी त्यांनी म्हटले आहे. सगळे सोडून पळून जाणाऱ्यांना शेवटी परत यावेसे वाटते किंवा यावे लागते. हा उल्लेख तर मला त्यांच्या वडिलांविषयी असल्याचा भास होतो. अर्थात या किंवा इतर ओव्या गीतेला धरूनच लिहिल्या आहेत. ज्यांना या संसाराचा कदापीही त्रास होत नाही त्यांना माझे शतश: प्रणाम. एका देवळात एक सज्जन आणि एक चोर राहत होते. त्यातला चोर दिवसभर झोपायचा आणि रात्री चोरी करायला जायचा.  सज्जन माणूस चोर चोरी करायला गेला की त्याच्या काळजीने आणि त्याच्या दुर्वर्तनामुळे रात्री झोपू शकत नसे आणि दिवसा झोपणे त्याच्या शिस्तीत बसत नसे. म्हणून तो सज्जन खंगत गेला आणि चोर सुखात राहिला अशी एक गोष्ट मी वाचली आहे. संसाराचा त्रास न होणारे वरच्या चोरासारखे आहेत असे माझे म्हणणे नाही. पण जगात चोर चोऱ्या करतात म्हणून आपण पस्तावणे आणि आपले आयुष्य बरबाद करणे नक्कीच मूर्खपणाचे आहे. आदल्या दोन स्तंभांत काम क्रोध आणि नंतर जगाच्या नदीतले भोवरे, खड्डे, पुराड आणि हिंस्त्र मगरी यांना अलिप्तपणे पहाणे आणि आपल्या स्वभावाप्रमाणे न्यूनगंड किंवा खंत किंवा चिंता नकरता आरामात काहीतरी करत राहणे याच्यापलीकडे आपल्या हातात काही नाही हेच खरे आहे.
याला परमेश्वर लागत नाही. जरी लागत असला तरी त्याने किंवा तिने मी स्वत: अकर्ता आहे असे आधीच म्हणून ठेवले आहे.
 म्हणूनच शंकरराव ऊर्फ मामासाहेब दांडेकरांनी सातव्यातल्या एकशे एकाव्या ओवीचे मुक्त भाषांतर करताना ‘मीच परमात्मा आहे अशी समजूत करून घेऊन हा संसाराच्या नदीला पार करावे असे लिहिले आहे.’ वेदांच्या तराफ्याचा, यज्ञाचा भोपळा पोटाला बांधून पोहण्याचा किंवा कर्माने कमवलेल्या बाहूंचा, अष्टांग योगाचा इथे उपयोग होत नाही अशी विधाने ज्ञानेश्वरांनी या नदीसंबंधात केली आहेत.
कारण या सर्व उपायात ‘मी’ ही गोष्ट गृहीत धरलेली असते. ‘मी’ ‘मी’ पणापासून निवृत्त होणे हाच तो तथाकथित(!) परमात्मा झाल्याचा बोध आहे. कारण परमात्मा जर असेल तर त्याला मी पणाचा स्पर्श नाही. या सगळ्याला गुरू लागतो का? होय लागतो.
पण गुरू फक्त सूचना करतो. मग हळूहळू गोष्टी होतात त्याला क्रमयोग म्हणतात. त्याबद्दल सोमवारी.
– रविन मायदेव थत्ते