14 December 2017

News Flash

कुतूहल – शेतीतील त्याज्य मालापासून ऊर्जानिर्मिती

भारतात कृषी, फलोत्पादन, पशुपालन आणि अन्नप्रक्रिया या उद्योगांमधून दरवर्षी सुमारे ८० कोटी टन इतका

मुंबई | Updated: January 5, 2013 12:01 PM

भारतात कृषी, फलोत्पादन, पशुपालन आणि अन्नप्रक्रिया या उद्योगांमधून दरवर्षी सुमारे ८० कोटी टन इतका त्याज्य जैवभार निर्माण होतो. त्यात आपण सध्या आयात करीत असलेल्या पेट्रोलियमच्या सुमारे अडीचपट ऊर्जा सामावलेली असते, पण प्रत्यक्ष व्यवहारात आपण घरगुती स्वयंपाक, कुंभारांचे आवे आणि वीटभट्टय़ा यांमध्ये इंधन म्हणून आणि शिवाय साखर कारखान्यांद्वारे उसाच्या चोयटय़ा वापरून वीजनिर्मिती आणि त्याज्य शेतमालापासून इंधनविटा अशा काही मोजक्या प्रकारांनीच या जैवभाराचा वापर करतो. १५-२० खेडय़ांमध्ये निर्माण होणारा त्याज्य जैवभार एकत्र केला तर साखर कारखान्यांमध्ये वापरली जाणारी यंत्रणा वापरून आपण या खेडय़ांना वीज पुरवू शकू. या सर्व उपयोगांमध्ये त्याज्य शेतमाल हा सरळ सरळ जाळलाच जातो, परंतु काही विशिष्ट प्रक्रिया करून आपण त्याज्य शेतमालापासून अंतज्र्वलनकारी इंजिनांमध्ये वापरण्याजोगती उच्च प्रतीची इंधनेही निर्माण करून आयात पेट्रोलियमला पर्याय देऊ शकतो. जैवभार तापविल्यास त्यापकी सुमारे ७० टक्के भागाचे ज्वलनशील वायूत रूपांतर होते. या वायूला वुडगॅस असे म्हणतात. मागे राहणाऱ्या ३० टक्के कोळशापासून आपण कोल गॅस निर्माण करू शकतो आणि हिरवी पाने, फळाच्या साली, फळांचा चोथा आणि जनावरांची विष्ठा यांपासून आपण बायोगॅस निर्माण करू शकतो. या तिन्ही इंधनांची निर्मिती करण्याची तंत्रे सुमारे १०० ते १५० वर्षांपूर्वीच विकसित करण्यात आली होती आणि ती आपल्या देशातही उपलब्ध आहेत. मध्यंतरीच्या काळात अभियांत्रिकी, भौतिकविज्ञान, रसायनशास्त्र आणि इतर वेगवेगळ्या तंत्रज्ञानांमध्ये झालेल्या प्रगतीची त्यांच्याशी सांगड घालून आपण ही जुनी तंत्रे खूप सुधारू शकतो. त्यात ताबडतोब करण्याजोगती सुधारणा म्हणजे हे इंधनवायू शुद्ध करून ते सिलिंडरमध्ये भरता आले, तर आपण त्यांच्यावर मोटारगाडय़ासुद्धा चालवू शकू. ही सर्व तंत्रे इतकी सोपी आहेत की त्यांची निर्मिती ग्रामीण भागात लघुउद्योगांद्वारेही करता येईल. अर्थात अशा प्रकारे मोटारगाडय़ांचे इंधन तयार करणे किंवा वर उल्लेखल्याप्रमाणे विकेंद्रित विद्युतनिर्मिती करणे यासाठी आज लागू असणारी धोरणे आणि कायदे बदलावे लागतील आणि त्यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची.
– डॉ. आनंद कर्वे, पुणे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी, मुंबई२२  office@mavipamumbai.org

वॉर अँड पीस- अरुचि
सर्व आयुर्वेदीय मान्य ग्रंथांत; सर्व रोगांचे मूळ, अग्निमांद्य म्हणजे भूक न लागणे असे ठामपणे सांगितले जाते. पण मानवी मोठय़ा रोगांचा बारकाईने मागोवा घेत गेले तर, अरुचि – रुची नसणे – तोंडाला चव नसणे याला जास्त महत्त्व द्यायला हवे. सर्वच वैद्यकशास्त्र असे ठामपणे सांगतात, की ‘आपण अन्न घेत नसाल, तर नुसते औषध घेऊ नये. जगभर राजयक्ष्मा (क्षय- टी.बी.) या विकाराचे थैमान प्राचीन काळापासून चालू आहे. गेली तीसपस्तीस वर्षे क्षय या विकाराचाच  भाऊ एच.आय.व्ही.(एड्स) या विकाराने अनेकानेक समाजशास्त्रज्ञांची झोप उडविली आहे. या दोन्ही विकारात अरुचि हे प्रमुख लक्षण असते. या लक्षणाचा यशस्वी सामना केला, तर हे दोन्ही मोठे रोग लवकर आटोक्यात येतात.
‘अन्नं वृत्तिकरणां श्रेष्ठम्।’ या नियमाप्रमाणे प्रत्येक मनुष्यमात्राला आपला रोजचा ‘कारोभार’, धंदा, नोकरी नीट करावयाची असल्यास त्याने पुरेसे अन्न खायला लागते. घरातील गृहिणी भरपूर श्रम घेऊन पतिराजांकरिता किंवा आपल्या कच्याबच्च्यांकरिता चांगले सुग्रास जेवण बनविते. नेहमीच्या जेवणाच्या वेळेस या मंडळींना भूक तर चांगली लागलेली असते. ‘चटकन पानं घ्या, पटपट वाढा.’ अशी स्वयंपाकघरात ऑर्डर मिळते. जेवण समोर येईपर्यत त्यांना अगदी राहावत नाही. पण पानावर बसल्यावर हीच मंडळी तोंडाला चव नाही म्हणून लगेचच जेवणाचा हात आखडता घेतात; जेवणातील पदार्थात खोडय़ा काढतात; हे नको, ते नको असे गाणे म्हणतात. यांच्या मुळाकडे आपण गेल्यास असे लक्षात येते, की पोटात नुसती आग पडून चालत नाही. अन्न पाहिल्याबरोबर जिभेला लाळ सुटली पाहिजे, लाळारस उत्पन्न झाला पाहिजे. म्हणजेच तोंडाला चव हवी.  
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

जे देखे रवी.. – ५. व्हॉट्स युअर प्रॉब्लेम?
प्रत्येक रुग्णालयात surgeon मंडळींसाठी एक खोली असते. त्या खोलीत वर्तमानपत्रे येतात. ती आल्यानंतर अध्र्या तासातच त्यांची चिरफाड होते.
कोणी भूलतज्ज्ञ बाजारभाव असलेले पान फाडून ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातो. एकदा रुग्णाला बेशुद्ध केले आणि त्यला यंत्रावर अडकवले की, हा कोठले रोखे घ्यावे याचा विचार करतो. जे शिकाऊ तरुण मुलगे असतात ते खेळाची पाने फाडतात आणि कॉमिक्सही वाचतात. जे वयोवृद्ध असतात ते कोण मेले आणि त्यांचे वय काय होते याचे अवलोकन करतात.
बहुतेक मुली किंवा प्रौढा मात्र कोठल्याही वर्तमानपत्राची पुरवणी निवडतात. मग त्या कितीही उच्च विज्ञानविभूषित असोत. या पुरवण्यांमधल्या मुलीचे अवलोकन करतात, त्यांच्या कपडय़ांना नाके मुरडतात. हे काय चालले आहे असे हताश उद्गार काढतात, पण दररोज तेच वाचतात. उरून उरते ते अग्रलेखाचे पान ते कोणीच वाचत नाही. त्यामुळे देश रसातळाला जात आहे. मी शहाणा आहे. मी माझे वर्तमानपत्र staple करून घेऊन जातो म्हणजे सुरक्षित राहते. या खोलीत आम्ही वैद्यकीय मंडळी आमच्या व्यवसायाचा आढावा घेतो. कोणावर काय बेतली याची चर्चा ‘परदु:ख शीतलम’ या न्यायाने करतो. काही काही Nursing Homes  किती बेकार आहेत याबद्दल दबलेल्या आवाजात स्वानुभव सांगतो. वकील लोक कितीतरी जास्त पैसे मिळवतात याबद्दल विषाद व्यक्त करतो. सरकारने काही बंधने आणली तर त्या बंधनामुळे भ्रष्टाचार कसा बोकाळणार आहे याबद्दल मार्मिक टिप्पणी करतो. एखादा उठून गेला तर जवळजवळ लगेच त्याच्या लांडय़ालबाडय़ांबद्दल चवीने चर्चा करतो. अमेरिकेत एका दुकानात ‘आपण कृपा करून स्वत:बद्दल बोलू नका. आम्ही ते काम तुम्ही गेल्यावर करू’, असे लिहिले होते. त्याचे हे उदाहरण.
ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याआधी कपडे बदलावे लागतात. पुरुषांच्या खोलीत कपडे अस्ताव्यस्त फेकलेले असतात आणि कपडे बदलताना समोरचा हडकुळा की ढेरपोटय़ा याची कदर नसते. एकदा चुकून मी बायकांच्या खोलीत शिरलो. आत कोणीच नव्हते, पण सगळे कपडे व्यवस्थित लावलेले होते आणि आत एक पडदा होता. मी मोठय़ा sister ला विचारले, ‘‘हे काय?’’ ती माझ्याकडे वेडा की खुळा अशा तऱ्हेने बघू लागली. कपडे बदलायला पडदा नको का असे विचारू लागली. पडदे के पीछे पडदा. एक दार पुरुषांसाठी आणि तो पडदा बायकांसाठी. माझा एक विद्यार्थी कोठेतरी परदेशात गेला होता. तिथे शिकला, परत आला. म्हणाला, ‘काय सांगू त्या Hospital’ मध्ये दोघांची कपडे बदलायची खोली एकच.. मी ठार लाजलो.’..  त्याला बावचळलेला पाहून एक स्त्रीच अखेर म्हणाली,  What is your problem? You have never seen a woman before?
रविन मायदेव थत्ते –  rlthatte@gmail.com

आजचे महाराष्ट्रसारस्वत – ५ जानेवारी
१९१३ >  कादंबरीकार श्री. ना. (श्रीपाद नारायण) पेंडसे यांचा कोकणातील मुर्डे या गावी जन्म. मुंबईत नोकरीनिमित्त राहणाऱ्या पेंडसे यांनी कोकणच्या निसर्गाला आणि मानवी स्वभावांना त्यांनी शब्दरूप दिले. गारंबीचा बापू या त्यांच्या कादंबरीवरून पुढे नाटक आणि चित्रपटही झाला, तर रथचक्र या साहित्य अकादमी पुरस्कार (१९६३) विजेत्या कादंबरीने नाटकाखेरीज दूरदर्शन मालिकेचाही टप्पा घेतला. एल्गार, हद्दपार, यशोदा, कलंदर आदी कादंबऱ्या, जुम्मन हा कथासंग्रह, तुंबाडचे खोत  ही महाकादंबरी, तसेच अनेक नाटके अशी त्यांची साहित्यसंपदा.  
 १९६१ >  ‘गोटय़ा’, ‘चिंगी’ आदी पात्रे अजरामर करणारे नामदेव धोंडी  ताम्हनकर यांचे निधन. किशोरवयीन मुलांसाठी त्यांनी लेखन केले.
१९९२ >  सिद्धहस्त चित्रकार, संशोधकवृत्तीचे समीक्षक,  इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक दत्तात्रेय गणेश गोडसे यांचे निधन. कला व साहित्य यांची ऐतिहासिक दृष्टिकोनातून मांडणी व मीमांसा करणारी त्यांची ‘गतिमानी’, ‘पोत’, ‘वाक् विचार’ ‘लोकधाटी’ ही पुस्तके गाजली.
– संजय वझरेकर

First Published on January 5, 2013 12:01 pm

Web Title: navneet whats your problem