News Flash

कुतूहल : वनस्पतीला वाढीसाठी खत कशी मदत करते

वनस्पतीला वाढीसाठी नायट्रोजन, स्फुरद आणि पालाश ही प्रमुख द्रव्ये आणि गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम ही दुय्यम द्रव्ये आवश्यक असतात. तसेच बोरॉन, लोह, जस्त, मंगल, तांबे,

| January 11, 2013 12:07 pm

वनस्पतीला वाढीसाठी नायट्रोजन, स्फुरद आणि पालाश ही प्रमुख द्रव्ये आणि गंधक, कॅल्शियम, मॅग्नेशियम ही दुय्यम द्रव्ये आवश्यक असतात. तसेच  बोरॉन, लोह, जस्त, मंगल, तांबे, मॉलीब्डेनम आणि क्लोरिन या सूक्ष्म द्रव्यांचीही अल्प प्रमाणात त्यांना गरज असते. ही द्रव्ये वनस्पतीची मुळे मातीतून पाण्याद्वारे मिळवतात.
वनस्पतीत असलेले प्रथिनयुक्त पदार्थ (एन्झाइम्स) वनस्पतीच्या वाढीचे नियंत्रण करतात. या पदार्थाचे कार्य योग्य रीतीने चालण्यासाठी दुय्यम व सूक्ष्म द्रव्ये एकमेकांच्या सहकार्याने काम करतात. त्यांच्यापकी एकाचीही उणीव मातीत असेल, तर त्यांच्या कामात अडथळा येतो.
जमिनीतून निसर्गत: सर्वच द्रव्ये वनस्पतीला उपलब्ध होऊ शकत नाहीत. अशा वेळी ही द्रव्ये ज्यात आहेत, असे नसíगक किंवा कृत्रिम पदार्थ वनस्पतीला बाहेरून पुरवावे लागतात हे पदार्थ म्हणजेच खत.
 प्राचीन काळी शेण, इतर प्राण्यांची विष्ठा, सोनखत, मृत प्राण्यांचे अवशेष यांचा उपयोग खत म्हणून करत असत. पेरू देशात पक्ष्यांच्या मलमूत्रापासून खत मिळते म्हणून पक्ष्यांची शिकार हा गुन्हा ठरविलेला होता. रोमन संस्कृतीतील लोकांना पिकांची फेरपालट करण्याबरोबरच जमिनीला खते देण्याचेही ज्ञान होते.  १७ व्या शतकात प्रथमत: वनस्पतींच्या जोमदार वाढीसाठी रसायनांचा खत म्हणून उपयोग केल्याचा उल्लेख सापडतो.
भारतातील शेतजमिनीत नत्राचे प्रमाण कमी आढळते. जमिनीतून स्फुरद शोषण्याचा वेगही फार कमी आहे. त्यामुळे वनस्पतीला स्फुरद व नत्रयुक्त खत देणे आवश्यक ठरते. एकदा वनस्पतीने ही द्रव्ये जमिनीतून शोषून घेतली की जमिनीला पुन्हा त्यांची भरपाईही करायला हवी. त्यासाठी जमिनाला भरखते द्यावी लागतात. खतामध्ये प्रमुख पोषक द्रव्यांचे प्रमाण किती आहे, यावरून खताची प्रत ठरते. घन स्वरूपातील खतासोबतच निर्जल अमोनियासारखी वायू खते तसेच द्रवरूप खतेदेखील असतात. खतांचा अतिरेकी वापर केल्यास वनस्पतीवर आणि त्याचे सेवन करणाऱ्या मानवावर दुष्परिणाम दिसून येतात.   
– प्रतिनिधी,
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी..: ११. पराभवाची चुणूक
१९४८च्या उन्हाळ्यात सातारा अचानक संपले. वडिलांना हुशार असूनही टइइर झाल्यावर पदव्युत्तर शिक्षण गरिबीमुळे घेता आले नव्हते. किंबहुना पदवीचे प्रमाणपत्र घेण्यासाठीही पैसे नव्हते म्हणून त्यांनी रक्तदान केले होते अशी गोष्ट मला आईने सांगितली होती. आता चार पैसे गाठीला होते म्हणूनोफउर होण्यासाठी इंग्लंडला जाण्याचा त्यांचा बेत ठरला होता. मुंबईहून बोटीने जाणार होते. बोटीचे नाव होते आस्टूरियास. कुटुंबातला परदेशी जाणारा पहिला माणूस म्हणून कितीतरी नातेवाईक निरोप घ्यायला आले होते. त्या वेळी दहशतवाद वगैरे काही नव्हते. बोट सुटण्यापूर्वी सगळे नातेवाईक शिडीने बोटीवर चढले होते. माझा धाकटा भाऊ, इतर भावंडे आली होती. आम्ही बोटीवर लपाछपीही खेळलो. जरूर जा असे म्हणत आईनेच वडिलांना प्रोत्साहन दिले होते. त्या दिवशी मात्र तिचे डोळे पाणावले. आईने पुण्याला बिऱ्हाड केले. त्या वेळी वडिलांची पत्रे आली की, सगळे एकत्र बसून वाचत असत. काही महिने पत्रे मोठी उत्साहवर्धक होती, पण नंतर नूर पालटू लागला असे आईच्या बोलण्यावरून वाटू लागले. त्या डिसेंबर महिन्यात इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये कडाक्याची थंडी पडली. एकटेपण, जीवघेणी थंडी आणि त्या वयात पुन्हा अभ्यास या त्रिकोणाने वडील आजारी पडले. हृदयाच्या ठोक्याची गती अनियमित झाली आणि त्यांना हृदयरोग तज्ज्ञाकडे जावे लागले. तू तंदुरुस्त आहेस, पण हे सगळे झेपणे तुला अवघड आहे असे निदान/विधान करण्यात आले. माझ्या वडिलांनी डॉक्टरांना फी विचारली तेव्हा तू भारतात डॉक्टरांकडून फी घेतोस का, असा मोठा मार्मिक प्रश्न माझ्या वडिलांना विचारण्यात आला अशी गोष्ट त्यांनी मला बऱ्याच वर्षांनी सांगितली. वडील परत आले तेव्हा, ते हरल्याची भावना मला त्या काळीही जाणवली होती.
पुढे माझ्या आयुष्यात अशाच पराभवाचा सामना मला करावा लागला. मी जनरल सर्जन झालो होतो. मला प्लास्टिक सर्जन व्हायचे होते. मी व्यवसाय करू लागलो होतो. मला मुले होती. पण मनातले खूळ काही जाईना. मी सगळे बाजूला ठेवून अभ्यासाला लागलो आणि काही महिन्यांनी परीक्षेला बसलो आणि नापास झालो. गंमत अशी की त्याच विषयाचा अभ्यास करण्यासाठी पुढे मी परदेशी गेलो. तिथेही काही पदवी वगैरेच्या भानगडीत न पडता मी परत आलो, पण केवळ माझ्या अनुभवाच्या बळावर मी त्याच विषयाचा प्राध्यापक झालो. त्या विषयात नापास झालेल्याला त्याच विषयाचा प्राध्यापक केल्याची मुंबई विद्यापीठातली ही एकमेव घटना होती. पुढे या विषयातल्या संशोधनाबद्दल माझा मोठा गवगवा झाला आणि स्कॉटलंडमधल्याच एडिंबरा महाविद्यालयाने मला  परीक्षेला न बसताच त्यांचीोफउर ही पदवी समारंभपूर्वक दिली. जी वडिलांची हुकली होती.. आणि तीसुद्धा परीक्षा न देता मिळाली. एका पिढीत झाले नाही ते दुसऱ्या पिढीत घडले;  पण तोवर वडील गेले होते.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस : आव-आमांश – जुलाब
आपण मागील लेखात प्रामुख्याने वारंवार होणाऱ्या जुलाब किंवा पोट बिघडण्याच्या तक्रारीकरिता विचार केला. वैद्यकीय चिकित्सकांना नेहमी रुग्णांकडून अशी अपेक्षा असते की रोगाच्या मूळ कारणाकडे; वैद्य डॉक्टरांनी लक्ष न देता प्रथम जुलाब समस्येवर तातडीचा उपचार म्हणून सत्वर ‘रिलीफ’ द्यावा. रुग्णाला त्यामुळे आत्मविश्वास येतो व मग तो ‘लाँग टर्म’ ट्रीटमेंट करिता तयार होतो. यात तथ्यही आहे. परंतु काही कारणे वैद्यांनाही निवारता येत नाहीत.  दिवसेंदिवस नागरी आरोग्याच्या समस्या बिकट होत चालल्या आहेत. आपल्या रोजच्या पाणी पुरवठय़ात विविध नद्या, नाले, ओढे, विहिरी, जलाशय यांचा समावेश असतो. तुमच्या आमच्या वापरातील पाणी, सांडपाणी स्वरूपात गटार किंवा ड्रेनेज मार्गाने नदी-नाल्यात सोडले जाते. काही ठिकाणी हे पाणी जमिनीत जिरवले जाते. त्यामुळे आसपासच्या संबंधित विहिरींचे पाणी दूषित होते. नदी नाल्यात, ओढय़ात गुरेढोरे, विविध वाहने धुतली जातात. बहुतेक सर्व मंडळी आपल्या घरात नळातून आलेले पाणी सुरक्षित समजून प्यायला वापरतात. ते फडक्याने गाळून घ्यायला पाहिजे; खळखळ मोठे बुडबुडे येईपर्यंत उकळायला पाहिजे, हे माहीत असूनही प्रत्यक्षात सगळ्यांनाच शक्य होत नाही. काही जण आपल्या पिण्याच्या पाण्यात तुरटी फिरवतात. पण असे रोज तुरटी फिरवलेले पाणी दीर्घकाळ घेतल्यास पोटाच्या आतडय़ांची नुकसानी संभवते.
या पाणी समस्येवर माझ्या अनुभवात तीन वेगवेगळे अत्यंत सुरक्षित उपाय जे आहेत ते जर अमलात आणले तर आमांश, आव, जुलाब, पटकी, कॉलरा ग्रस्त रुग्णांना डॉक्टर वैद्यांच्या दवाखान्याची पायरी चढावीच लागणार नाही. १) खळखळून उकळलेले पाणी. २) सुंठ चूर्ण मिसळलेले पाणी. ३) नागरमोथा चूर्ण मिश्रित पाणी. नागरमोथा ही वनस्पती पाणथळ जागेत उगवते. त्याचे कंद अत्यंत सुगंधी असतात. त्याचे चूर्ण विविध उटणी व केश्यचूर्णात वापरतात. त्याचे चूर्ण शंकास्पद पाण्यात मिसळून घेतल्यास आवेचे जंतू, अ‍ॅमिबा, पाण्यातील सूक्ष्म कृमी यांच्यावर निश्चयाने मात करता येते.  
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत :११ जानेवारी
१८९८ >  ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराचे मराठीतील पहिलेच मानकरी, जीवनवादी साहित्यप्रवाह सशक्त करणारे लेखक विष्णु सखाराम (वि. स.) खांडेकर यांचा जन्म. १५ कादंबऱ्या, ३१ कथासंग्रह, लघुनिबंधांचे १० संग्रह, सहा रूपककथ, एक नाटक आणि १८ चित्रपटांच्या कथा लिहिल्या. ‘ययाति’ या त्यांच्या कादंबरीला १९७४ मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. याच कादंबरीला १९६० सालचा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता. खांडेकर यांचे देहावसान २ सप्टेंबर १९७६ रोजी झाले.
१९२८ >  ललित लेखक आणि ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक पं. अरविंद गजेंद्रगडकर यांचा जन्म. संगीताचीही उत्तम जाण असणाऱ्या पं. गजेंद्रगडकरांनी ‘स्वरांच्या वनात’,  ‘स्वरसंगम’, ‘असे सूर, अशी माणसे’ आदी १५ पुस्तके लिहिली.
१९३६ >  वक्ते, लेखक, शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी  यांचा जन्म. साने गुरुजींनी सांगितलेली डॉ. आंबेडकरांची चरित्रकथा  ऐकून बालवयात प्रभावित झालेल्या जोशी यांनी पुढे मुलांसाठी चरित्रपुस्तके लिहिली. २००३च्या बालसाहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
– संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2013 12:07 pm

Web Title: navneethow fertilizer can help to grow plant
टॅग : Kutuhal,Navneet
Next Stories
1 कुतूहल – शेतीसाठी कोणती कीटकनाशके वापरावीत
2 कुतूहल – भारतीय शेतीचा प्रवास कसा होत गेला
3 कुतूहल -महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
Just Now!
X