कुतूहल : मातीच्या संधारणाची गरज
आपण शेतात पिके उभी असताना पाहतो. ही पिके ज्या जमिनीत आपली मुळे धरून ठेवतात, तिचा एक इंच एवढा थर तयार होण्यास अंदाजे शंभर वष्रे लागतात. हाच मातीचा थर उताराच्या भुपृष्ठावरून पावसाच्या जोरदार सरीमुळे काही तासांतच वाहून गेला, तर जमीन नापीक बनू शकते. अशी मातीची धूप पावसाने अथवा वाऱ्याने होऊ नये, म्हणून माती संधारणाचे तंत्र वापरले जाते. या तंत्राची जैविक आणि यांत्रिक अशा दोन भागांत वर्गवारी करता येईल.
जमिनीच्या उतारावरून पावसाच्या वेगाने वाहणाऱ्या पाण्यास गवत, झाडे-झुडपे आदींच्या ओळींचा अडथळा निर्माण करून, शेंगवर्गीय पिकांचे मिश्र पीक घेऊन किंवा अशा पिकांच्या रांगा (पट्टे) पेरून, उताराला समांतर पिकांची पेरणी करून मातीचे संधारण केले असता ते जैविक तंत्रात मोडते. हा एक सोपा आणि कार्यक्षम उपाय शेतकऱ्यांना सहज उपलब्ध असतो.
डोंगरमाथ्यावरील जमिनीस उतार खूप असतो. अशा जमिनीवर ठरावीक अंतरावर टप्पे तयार केले असता पावसाच्या पाण्याचा वेग कमी होतो आणि मातीची धूप कमी होते. शेतात पडलेल्या घळीचे तोंड सुकलेल्या झाडाच्या फांद्या व दगड वापरून बंद केले असता शेतातील माती वाहून जात नाही. ओलितासाठी पाणी देताना शेतात पाणी मोकळे सोडले जाते. अशा ओलितामुळे शेतातील सुपीक मातीचे कण पाण्याबरोबर वाहून जातात. त्यामुळे घळीसुद्धा तयार होतात. हे टाळण्यासाठी सरी पद्धतीने पाणी दिले तर मातीची धूप होत नाही. त्याहीपेक्षा ठिबक सिंचन, तुषार सिंचन वापरले तर जमिनीची झीज होत नाही. मातीच्या संधारणाचे हे उपचार यांत्रिक पद्धतीत मोडतात.
थोडक्यात, जमिनीचे आरोग्य चांगले राखणे हा मातीच्या संधारणाचा मुख्य उद्देश असतो. जमिनीचे नुकसान तिच्या अतिवापरामुळे, वृक्षतोडीमुळे किंवा रासायनिक प्रदूषणामुळेदेखील होऊ शकतो. तेव्हा जमिनीचे असे नुकसान टाळण्यासाठी जे काही उपाय केले जातात, ते मृदा संधारणात मोडतात. अनेक पद्धतींचा अवलंब करून जमिनीचे आरोग्य टिकविता येतो.
– डॉ. विठ्ठल चापके
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी.. :    काळे-गोरे
शिकागो आणि डिट्रॉइट या शहरांत मी, ज्यांना हल्ली आफ्रिकन-अमेरिकन म्हणणे अनिवार्य होत आहे त्या वंशाच्या काळय़ा लोकांना फार जवळून पाहिले. नाचणे, वाजवणे, गाणे या देणग्या त्यांना निसर्गदत्त होत्या. ही मंडळी चालत असे तेव्हा त्या चालण्याला एखादा बाज असल्यासारखे वाटे. ही मंडळी धष्टपुष्ट होती आणि अ‍ॅथलेटिक्स, अमेरिकन फुटबॉल, बेसबॉल या खेळांमध्ये लोकसंख्येने कमी असूनही अग्रेसर होती. मुष्टियुद्ध हा तर त्यांच्या हातचा मळ होता. यांची विनोदबुद्धी वाखाणण्याजोगी मोकळी होती. यांच्या स्त्रियांची जाड होण्याकडे प्रवृत्ती होती. पण त्या कणखर आणि कष्टाळू होत्या. ‘जेवढा समाज मागासलेला तेवढय़ाच प्रमाणात त्या समाजातल्या स्त्रियांचे हाल,’ हा अलिखित नियम या स्त्रियांना लागू होता. कुमारी माता आणि त्यक्ता यांचे प्रमाण या स्त्रियांमध्ये खूपच होते. पण त्या टिकून होत्या, उभ्या होत्या आणि संसार करत होत्या. या मंडळींमध्ये एकाच गोष्टीची उणीव होती ती म्हणजे दूरदृष्टी.
मानवी संस्कृतीत सगळय़ात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे शेती. आज धान्य पिकवू आणि मग पुरवत पुरवत वर्षभर खाऊ, ही माणूस जातीची सगळय़ात महत्त्वाची ओळख. फक्त माणूसच अनेक दिवस टिकेल असे घर बांधतो. जनावरे घरे बांधत नाहीत आणि पक्षी केवळ एका ऋ तूला पुरेल इतकेच घरटे करतात. या आफ्रिकन माणसांना काही नियोजन करीन, स्वत:चे भले कसे होईल, माझी पुढची व्यवस्था काय, असले प्रश्न पडत नसणार असे मला वाटे.
मी गोराही नव्हतो आणि काळाही. संभाषणाच्या ओघात  एकाने मला विचारले, ‘‘तुमच्याकडे हा काळा-गोरा भेदभाव आहे का हो?’’ तेव्हा मी त्याला सांगितले, ‘‘एका उदारमतवादी कुटुंबात मी वाढलो. मला काही इतिहास आहे याची मला जाणीव आहे आणि त्याबद्दल अभिमान वाटतो. मी मराठी आहे आणि ज्या महाराष्ट्राचा आहे त्या प्रांताने स्वातंत्र्याचा, समतेचा आणि समाजसुधारणांचा पहिला नारा दिला.’’ तेव्हा तो आफ्रिकन अमेरिकन मला म्हणाला, ‘‘आम्हाला काही इतिहासच नाही. कशाच्या जोरावर आम्ही जगायचे?’’
हल्ली माझ्या ओळखीची एक बाई ‘आयसीएसई’ किंवा तत्सम शाळांबद्दल बोलत होती. ती आहे गुजराती. मुले फॅशनेबल महागडय़ा शाळे त गेली. मला म्हणाली, ‘‘यांच्या अभ्यासक्रमात सगळय़ा जगाच्या इतिहासावर भर, परंतु आपल्या इतिहासाबद्दल बोंबच आहे. ज्ञानेश्वर, आंबेडकर आणि शिवाजी यांचीही ओळख नाही. फ्रेंच राज्यक्रांती शिकून ही पोरं काय दिवे लावणार?’’ परदेशात पाठवण्यासाठी एक पिढी आपण तयार करत आहोत. या काळय़ा-गोऱ्यांच्या इतिहासाबद्दल पुढल्या लेखात.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस : कृशता
लक्षणे- गुदाच्या परिसरात एक ते दीड इंचापर्यंत सुरुवातीच्या अवस्थेत लहान आकाराची सूज येणे, काही काळाने त्या सूजेचे रूपांतर छोटय़ा पुटकुळीमध्ये होणे, पुटकुळी ठुसठुसणे व केव्हातरी फुटणे. फुटण्याअगोदर त्या जागेत टोचणी दु:ख, वेदना असते. पुटकुळी फुटल्यानंतर पू, रक्त यांचा निचरा झाल्यानंतर बरे वाटते, ही रोगाची पूर्वरूपे होत. पूर्वरूपानंतर केलेल्या उपचारांनी रोग बरा होऊन जातो. पुन्हा त्रास होत नाही असेही काही वेळा घडते. मात्र बऱ्याच वेळा मूळ कारणे दूर न झाल्यामुळे; तशीच राहिल्यामुळे किंवा त्यात भर पडल्यामुळे, त्याच जागी ती जखम आतमध्ये खोलवर चिरत जाते. वरवर बरे आहे असे दर्शविणाऱ्या पीटिकेचे जुन्या जागी पुन्हा सूज, पुटकुळी व स्राव अशा क्रमाने त्रास सुरू होतो. या प्रकारे भगंदर हा विकार गुदभागी घर करून राहतो. त्याचे वर दिसत असणारे स्वरूप छोटी पुटकुळी सूज जरी दिसत असले तरी प्रत्यक्षात त्याचे खूप खोलवर स्वरूप असल्यामुळे त्याला नाडीव्रण असे म्हणतात. या व्रणाची आंतली गती किंवा मार्ग सरळ किंवा वाकडा असतो. त्यामुळे त्याच्यातून कधी रक्त, पू किंवा मळसुद्धा बाहेर पडतो.
एक वा अधिक जागी भगंदराचे व्रण असतात. क्वचित बारीक बारीक शेकडो भोके असलेला भीषण ‘शतपोनक’ भगंदराचा रुग्ण असतो. काही वेळेस भगंदराबरोबर मूळव्याधीचा मोडही असतो. ठणका, सूज, रक्त किंवा पू वाहणे, बसावयास त्रास होणे ही सर्वसामान्य लक्षणे असतात.
शरीर व परीक्षण- भगंदराची नुसती पीटिका बघून ज्ञान होत नाही. व्रण किती खोल आहे याची तपासणी सळई किंवा एषणी घालून बघावी लागते. त्यावरून त्याच्या गतीचा अंदाज येतो. तसेच व्रणातून पू, रक्त अथवा मळ येतो का? त्याचे कितपत प्रमाण आहे याची तपासणी करावी. मलावरोध, कृमी यांचे परीक्षण करताना जीभ व पोट तपासावे. रिकाम्यापोटी गुदभागाचे परीक्षण तज्ज्ञ वैद्यांकडून करून घेणे केव्हाही रुग्णहिताचे होय.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : ९ मे
१३३८ > उपेक्षितांच्या दु:खाचे गाऱ्हाणे अभंगांमधून मांडणारे भगवद्भक्त संत चोखामेळा यांचे मंगळवेढे येथे महाप्रयाण या  झाले (तिथी वैशाख वद्य ५, शके १२६०.)
१८१४ > व्याकरणाचे अभ्यासक, धर्मसुधारक व ग्रंथकार दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म. ‘मराठी भाषेचे व्याकरण’ हे त्यांचे पुस्तक मराठीला मोठे योगदान ठरले. ‘धर्मविवेचन’, ‘इंग्रजी व्याकरणाची पूर्वपीठिका’, ‘मराठी नकाशाचे पुस्तक’, ‘शिशुबोध’, ‘यशोदा पांडुरंगी’ व आत्मचरित्र अशी पुस्तके त्यांनी लिहिली.
१९१४ > वाङ्मय विश्लेषक, समीक्षक दुर्गादास काशीनाथ संत यांचा जन्म. मराठी कादंबऱ्यांतून दिसणाऱ्या स्त्री जीवनावरील प्रबंध, ‘साहित्य संमेलने आणि साहित्यिक प्रश्न’, ‘वाङ्मयीन विद्वत्ता’, ‘ललित कला आणि ललित वाङ्मय’ तसेच ‘संशोधन : पद्धती, प्रक्रिया, अंतरंग’ ही त्यांची ग्रंथसंपदा.
१९१९ > कवी,  धर्मचिंतक रेव्हरंड नारायण वामन टिळक यांचे निधन. काव्यकुसुमांजली हे कवितेला वाहिलेले मासिक त्यांनी काढले. ‘चातुर्वण्र्यनिर्णय, ‘धर्मसुधारणा व धर्मरक्षण’, हे  लेख, ‘सुबोध गीता’ हे भगवद्गीतेवरील भाष्य, ‘माझी भार्या’ आणि ‘सुशीला’ ही दीर्घकाव्ये तसेच अभंगासारख्या ३०० हून अधिक रचना त्यांनी केल्या.
– संजय वझरेकर