पृथ्वीवरच्या सर्व प्राण्यांपेक्षा माणूस हा प्राणी वेगळा आहे. याचं कारण मेंदूच्या त्रिस्तरीय रचनेतला वरचा स्तर – निओ कॉर्टेक्स. आकृतीत हा स्तर गडद दिसत आहे. मानवी मेंदूचे एकावर एक असलेले तीन स्तर लक्षात घेतले तर सर्वात खालच्या सरपट मेंदूस्तरात आहे – स्वसंरक्षण. त्यावरच्या म्हणजेच मधल्या आवरणात आहेत- भावना आणि त्या वरच्या तिसऱ्या आवरणात आहेत – विविध भाषा, कला, खेळ, विचार, नवनिर्मिती, संगीत, चित्रकला, विश्लेषण, विवेक, अमूर्त संकल्पना – मूर्त संकल्पना ओळखण्याची क्षमता, आकडेमोड, वस्तूनिर्मितीची क्षमता, समीक्षा, खेळाचे वा नृत्यांमधले नियम इत्यादी. शाळांमध्ये जे विषय शिकवले जातात, त्या सर्वाचा निओ कॉर्टेक्समधल्या घडामोडींशी संबंध असतो.

ज्ञात संशोधनाच्या आधारे असं दिसून आलं आहे की, आफ्रिकेमधील एका बेटावर राहणाऱ्या एप्स या प्रजातीच्या आहारामध्ये अतिशय उच्च दर्जाची प्रथिने आली. यामुळे लिबिक सिस्टीमवर म्हणजेच भावनिक स्तराच्या वर प्रथिनांचं आवरण तयार झालं. या प्रथिनांच्या आवरणामध्ये उच्च बौद्धिक विचार करणारी अनेक क्षेत्रं निर्माण झाली. ही क्षेत्रं इतर कोणत्याही प्राण्यांमध्ये नाहीत.

प्राण्यांची, पक्ष्यांची, कीटकांची देखील एक विशिष्ट भाषा असते. काही प्राण्यांमध्ये उच्च प्रकारच्या बौद्धिक क्षमतांपकी काही क्षमता आढळून येतात. उदाहरणार्थ डॉल्फिन. परंतु मानवी मेंदूशी बरोबरी करू शकेल अशा क्षमता कोणत्याही प्राण्यात नसतात. कारण मानव उच्च प्रतीच्या कल्पना करू शकतो, कल्पनेवर काम करू शकतो, विचार करू शकतो आणि आपले विचार कृतीत आणू शकतो. विविध शोध लावू शकतो. ही निओ कॉर्टेक्सची देणगी आहे.  ‘सरपट मेंदू’, आणि लिबिक सिस्टीम निओ कॉर्टेक्स ही मेंदूची त्रिस्तरीय रचना आपल्यापकी प्रत्येकाला – लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाना – प्रत्येक क्षणी आणि प्रत्येक विचारात मदतीला येत असते.

– श्रुती पानसे

contact@shrutipanse.com