श्रुती पानसे contact@shrutipanse.com

चेहऱ्यासाठी कितीतरी अ‍ॅन्टी एजिंग क्रीम्स बाजारात उपलब्ध असतात. पण मेंदूसाठी तसं काही क्रीम उपलब्ध नसतं. अशी क्रीम्स लावून तारुण्याचा आभास निर्माण होतो, मात्र मेंदूला तरुण ठेवायचं असेल तर कितीतरी प्रकारच्या युक्ती करता येतात, शिवाय याला कोणतेही चुकीचे साइड इफेक्ट्स नसतात. असलाच तर एकच परिणाम असतो तो म्हणजे आपली बुद्धी शाबूत राहते.

बुद्धीला धार देण्यासाठी याशिवायही कित्येक गोष्टी आपण करत असतो, पण यामुळे आपल्याला मेंदूत रोजच्या रोज नित्यनवे बदल होताहेत, हे आपल्याला माहीत नसतं.

आपण प्रत्येक माणसाच्या स्वभावाशी जुळवून घ्यायला शिकतो, यातली अजून एक गंमत अशी की, आपण आपला स्वभाव न बदलता दुसऱ्यांशी जुळवून घेतो. काहींना हे जमत नाही. जुळवून घ्यायला त्रास होतो. पण हेदेखील एक प्रकारचं सहजशिक्षण असतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आपण नवी पाककृती शिकतो.  व्यवसायानुसार नवी परिभाषा शिकतो. नवीन सॉफ्टवेअर्स शिकून घेतो. ऑनलाइन व्यवहार करणं शिकतो, प्रत्येक बँकेच्या वेगवेगळ्या पद्धती शिकून घेतो. हे लोक आपल्या वेबसाइटवर, अ‍ॅपवर सतत नवीन प्रयोग करत राहतात – तेही आपल्याला शिकून घ्यावे लागतात. ते ‘अपडेट’ झाले की आपल्याला ‘अपडेट’ व्हावंच लागतं. नवी यंत्रं, मोबाइल फोनवरचे नवे फीचर्स शिकतो.

मागील एका वर्षांत आपण किती कौशल्यं नव्याने शिकलो याची यादी करायची. काही गोष्टींची भर यात पडलीच असेल. यापुढची यादी सहा / तीन करायची. आपण किती नवी कौशल्यं शिकलो, नेहमीपेक्षा/आजपर्यंत कधीही केल्या नाहीत अशा किती गोष्टी केल्या – चित्रं काढणं, रांगोळ्या शिकणं, नाटय़छटा सादर करणं, घरातल्या वस्तूंची दुरुस्ती शिकणं.. किंवा किती नव्या माणसांना प्रत्यक्ष भेटलो, त्यांच्याकडून शिकण्यासारखं काय होतं, ज्या ठिकाणी आजवर कधीही गेलो नाही अशा  परिसरातल्या  किती जागांना भेट दिली..?  शाळा सोडल्यानंतर आपण कधीही काहीही पाठ केलेलं नाही.  पण रोज काहीतरी पाठ करण्यामुळे (एखादी आवडेल अशी कविता, एखादा उतारा) स्मरणशक्ती चांगली राहते. यातल्या ज्या गोष्टी शक्य होत्या त्या करून त्याची यादी करत राहायची.  यामुळे मेंदूत नव्या अनुभवांच्या, त्यामुळे न्युरॉन्सच्या जुळण्या तयार होतात.