कोविड-संकटामुळे शिक्षणपद्धतीत झालेले कळीचे परिवर्तन म्हणजे ऑनलाइन माध्यम. बहुतेक शिक्षकांचे प्रशिक्षण, वर्गात शिकवण्याच्या दृष्टीने झालेले असताना अचानक ऑनलाइन अध्यापन हा त्यांच्यासाठीही फार मोठा बदल आहे. यात अनेक आव्हाने सामोरी आली. गणितासारखे काटेकोर विषय मर्यादित साधने वापरून रंजकतेने मांडण्यासाठी आणि समजावून सांगण्यासाठी फारच द्राविडी प्राणायाम करावे लागतात.

आपल्या पाल्यांना स्वतंत्र स्मार्टफोन किंवा लॅपटॉप देणे सगळ्याच पालकांना शक्य नसते. विद्यार्थी तासिकेच्या विशिष्ट वेळी उपस्थित न राहिल्यामुळे शिक्षणात सातत्य नसणे, पुरेशी बॅण्डविड्थ असलेली इंटरनेट जोडणी सदैव उपलब्ध नसल्यामुळे शिक्षकांचा आवाज आणि लिखाण यातला मेळ कधी कधी न साधणे इत्यादी समस्या भेडसावतात. विद्यार्थ्यांना समजते आहे की नाही हे शिक्षकांना कळत नाही. गणित शिक्षक पुढे पुढे शिकवत जातात तेव्हा त्यांच्या गतीने शिकताना काही मुलांची त्रेधातिरपीट उडते. गणितातील सिद्धांत, समीकरणे फळ्यावर टप्प्याटप्प्याने  समजावून शिकवावी लागतात. भूमितीतील आकृत्या, आलेख प्रत्यक्ष दाखवाव्या लागतात. कलनशास्त्रातील संकल्पना, त्यावर आधारित उदाहरणे समजावणे कठीण जाते. काही कल्पक गणित शिक्षक वेबकॅम, टॅबलेटसारखी अत्याधुनिक साधने वापरून वर्गात शिकवत असल्यासारखी मांडणी करतात तर काही शिक्षक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन/अ‍ॅनिमेशन करून. अशा प्रकारे सर्व अडथळ्यांतून आपापल्या परीने वाट काढत, चाचपडत ऑनलाइन गणित अध्यापन शिक्षकांच्या आता बऱ्यापैकी अंगवळणी पडले आहे.

तरीही सध्याच्या युगात नवनवीन ऑनलाईन शिक्षण साधनसामग्रीची उपलब्ध माहिती मिळवून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, विविध  संगणकप्रणाली, संकेतस्थळे वापरून अध्यापन-अध्ययन पाठ्यपुस्तकापलकडे नेण्याचा प्रयत्न करणे ही आता शिक्षकांची जबाबदारी आहे. ऑनलाईन शिक्षणप्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे गणित शिक्षण सर्वदूर पोहोचवता येऊ शकेल तसेच गणिताबद्दलची भीती/नावड कमी होण्यास मदत होऊ शकेल. कदाचित कमी खर्चात आणि प्रत्येकाला आपापल्या आवड आणि क्षमतेनुसार शिक्षण घेता येईल. मात्र पारंपरिक शिक्षणाला तो संपूर्ण पर्याय ठरेलच असे नाही. गणितातील ऑनलाइन शिकता येऊ शकेल अशा भागांसाठी अभिनव पद्धत तर, प्रत्यक्ष समोर राहून शिकावे अशा भागासाठी आणि वैविध्यपूर्ण मूल्यमापनासाठी शाळांमध्ये येणे, अशी दुहेरी शिक्षण पद्धत उपयुक्त होईल. स्पर्धा (क्विझ), सर्वेक्षण (सर्व्हे), मतचाचणी (पोल), प्रश्नावली (क्वश्चनेअर) यासारखी तंत्रे वापरून मूल्यमापनाच्या पद्धतींचे प्रमाणीकरण केल्यास ऑनलाइन पद्धतीने कोणालाही कुठूनही हव्या त्या गणित अभ्यासक्रमावरील परीक्षा देणे शक्य होईल. ऑनलाइन आणि ऑफलाइन यांचे सुयोग्य मिश्रण असलेली ‘संमिश्र शिक्षण पद्धत’ ही भविष्यातील आनंददायी गणितशिक्षण पद्धत ठरू शकेल. – प्रा. श्यामला जोशी 

 

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : www.mavipa.org      

ईमेल : office@mavipamumbai.org